Mon, Jun 17, 2019 10:21होमपेज › Kolhapur › कोल्‍हापूरच्या नवदुर्गा : नेमबाज राही सरनोबत, क्रिकेटपटू अनुजा पाटील

कोल्‍हापूरच्या नवदुर्गा : नेमबाज राही सरनोबत, क्रिकेटपटू अनुजा पाटील

Published On: Oct 12 2018 10:48PM | Last Updated: Oct 12 2018 10:48PMशिक्षण असो वा खेळाचे मैदान, नोकरी असो वा उद्योग-व्यापार, कोणतेही क्षेत्र असो, तेथे प्रत्येक स्त्रीने आत्मविश्‍वासाने उतरावे, असा संदेश कोल्हापूरच्या कन्या आंतरराष्ट्रीय खेळाडू राही सरनोबत व अनुजा पाटील यांनी नवरात्रौत्सवानिमित्त दिला. शिवछत्रपतींनी निर्माण केलेल्या रयतेच्या स्वराज्याचे प्राणपणाने रक्षण करणार्‍या रणरागिणी ताराराणी यांच्या जाज्वल्य पराक्रमाचा वारसा जपत क्रीडा क्षेत्रात मुलूखगिरी करून जग जिंकण्यासाठीची घोडदौड नेमबाजपटू राही सरनोबत व क्रिकेटपटू अनुजा पाटील यांनी आपापल्या क्षेत्रात सुरू ठेवली आहे. 

जोखीम घेतल्याशिवाय प्रगती नाही : राही 

कोणतेही क्षेत्र असो त्यात जोखीम घेतल्याशिवाय प्रगती नाही. आत्मविश्‍वासाने आणि थोड्याशा धाडसाने आपणास आवडत असणार्‍या क्षेत्रात जोखीम घेतल्यास यश निश्‍चित मिळते. किंबहुना, जोखीम घेतल्याशिवाय प्रगती नाही, असे राहीने सांगितले. बहुतांश महिला-मुलींना समाजातून दुर्लक्षित केले जाते. त्यांना दुय्यम समजले जाते. यामुळे हताश न होता, खचून न जाता जिद्द-कष्ट आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी काही तरी करून दाखविल्यास त्यांचा भविष्यकाळ उज्ज्वल ठरतो.  स्त्रियांनी आपल्या कार्यातून टीकाकारांना उत्तर देणे गरजेचे असल्याचे राही सरनोबत हिने सांगितले. 

द‍ृष्टिक्षेपात राहीची कामगिरी....

खेळ प्रकार : 25 मीटर पॉईंट 2-2 पिस्तूल
(2007 ते 2018 कालावधीत 100 हून अधिक पदके)
2018 : भारत सरकारचा अर्जुन पुरस्कार 
2018 : जकार्ता आशियाई स्पर्धेत सुवर्ण 
2014 : राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धेत सुवर्ण 
2014 : आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्य 
2014 : उपजिल्हाधिकारीपदावर नियुक्‍ती 
2014 : शिवछत्रपती पुरस्काराने सन्मान 
2013 : विश्‍वचषक नेमबाजी स्पर्धेत सुवर्ण 
2011 : विश्‍वचषक नेमबाजी स्पर्धेत कांस्य 
2010 : राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक 
2010 : राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक 

अथक प्रयत्नाने यश निश्‍चित : अनुजा 

प्रतिकूल परिस्थितीला तोंड देऊन अथक प्रयत्न केल्यास यश निश्‍चित मिळते. परिस्थितीचा बाऊ केल्यास प्रयत्नांना मर्यादा येतात. यामुळे अपेक्षित ध्येयप्राप्तीसाठी अडथळ्यांना धैर्याने तोंड देणे गरजेचे आहे. कोणत्याही क्षेत्राला सामोरे जाताना स्त्री म्हणून कमीपणा न समजता, काही तरी करून दाखवायचेच या ध्येयाने अखंड वाटचाल ठेवल्यास यश निश्‍चित मिळते. छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापुरात क्रीडानगरीचा भक्‍कम पाया रोवला. विविध खेळांना त्यांनी प्रोत्साहन आणि आर्थिक पाठबळ दिले. छत्रपती राजाराम, छत्रपती शहाजी महाराज यांनी हा वारसा पुढे अखंड सुरू ठेवला आणि विद्यमान छत्रपतींनी त्यावर विकासाचा कळस चढविला.  

द‍ृष्टिक्षेपात अनुजाची कामगिरी...

राष्ट्रीय कामगिरी 
रणजी ट्रॉफी : 6 वर्षे
रणजी ट्रॉफी कर्णधार : 4 वर्षे 
16 वर्षांखालील महाराष्ट्र टीम : 2 वर्षे
16 वर्षांखालील महाराष्ट्र टीम कर्णधार : 1 वर्ष 
19 वर्षांखाली महाराष्ट्र टीम कर्णधार : 2 वर्षे 
आंतरराष्ट्रीय कामगिरी 
आशिया कप : 2012-13 
वर्ल्ड कप टी-20 : 2012-13 
वर्ल्ड कप : 2015-16, ट्राय सिरीज : 2018
आशिया कप टी-20 : 2018
साऊथ अफ्रिका दौरा : इंडिया ए टीम कॅप्टन 
ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंका दौरा 

शब्दांकन : सागर यादव