Fri, Sep 20, 2019 22:25होमपेज › Kolhapur › लोकसभा आखाड्यात मुन्‍ना-बंटी यांचीच लढत

लोकसभा आखाड्यात मुन्‍ना-बंटी यांचीच लढत

Published On: Apr 09 2019 1:48AM | Last Updated: Apr 09 2019 1:57AM
कोल्हापूर : सतीश सरीकर 

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे खा. धनंजय  ऊर्फ मुन्‍ना महाडिक व भाजप-शिवसेना युतीचे प्रा. संजय मंडलिक यांच्यात निवडणूक होत असली तरी खरी ‘ईर्ष्या’ खा. महाडिक व काँग्रेसचे नेते आ. सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्यातच सुरू आहे. पक्षश्रेष्ठींचे आदेश धुडकावून आ. पाटील यांनी प्रा. मंडलिक यांच्या प्रचारप्रमुखपदाचे ‘धनुष्यबान हाती’ घेतले आहे. खा. महाडिक व आ. पाटील यांच्यातील लढतीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

आ. पाटील यांचा विरोध प्रा. मंडलिक यांना जिंकून देणार की महाडिक हेच पुन्हा खासदार होणार, हे मतदारच ठरवतील. एकंदरीत दोघांतील लढतीमुळे निवडणुकीतील चुरस वाढली आहे. प्रा. मंडलिक यांचा शिवसेना-भाजपच्या वतीने प्रचार सुरू असला तरी कोल्हापूर उत्तर व दक्षिण विधानसभा मतदारसंघात आ. पाटील यांचे समर्थक उघडपणे प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. पाटील यांचे कार्यकर्ते व नगरसेवक थेट भाजप-शिवसेनेच्या व्यासपीठावर जाऊन बसली होती. आता तर स्वतः पाटील हेच कटवडा, मिसळ पे चर्चा घेत मंडलिकांना मतदान करण्यासाठी फिल्डिंग लावताना दिसत आहेत. महाडिक यांच्यावरील टीकेची एकही संधी सोडत नसल्याचे दिसत आहे. ‘आमचं आता ठरलंय...’ असे म्हणून सोशल मीडियातून त्यांचे समर्थक महाडिक यांच्याविरुद्ध रान पेटवत आहेत. कोल्हापूर उत्तर व दक्षिणमधून मंडलिक यांना जास्तीत जास्त लीड देण्यासाठी धडपडत आहेत. त्यांच्या साथीला काँग्रेससह राष्ट्रवादीतील नगरसेवकांची फौज आहे. जिल्ह्यातील काँग्रेसची आपल्या गटाची ताकदही त्यांनी मंडलिकांच्या पाठीशी उभी केली आहे. 

खा. महाडिक यांनी पाटील यांच्या टीकेचा खरपूस समाचार घेत प्रचाराचा धडाका लावला आहे. भाजप-ताराराणी आघाडीचे नगरसेवक त्यांच्यासाठी कोल्हापूर शहरात मोठ्या प्रमाणात प्रचारात गुंतले आहेत. भागीरथी महिला संस्था, युवाशक्‍तीचे कार्यकर्तेही महाडिक यांच्या विजयासाठी रान करत आहेत. सोशल मीडियावर आ. पाटील यांच्या समर्थकांच्या टीकेला चोख उत्तर देत आहेत. खा. महाडिक हे जिल्ह्याच्या प्रगतीसाठी आणलेला निधी आणि केलेला विकास जनतेसमोर मांडत आहेत. याचवेळी ते प्रा. मंडलिक यांच्यासह भाजप-शिवसेनेवर टीकास्त्र सोडताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे नेते आ. हसन मुश्रीफ हे महाडिक यांच्या प्रचारात सरसेनापतीची भूमिका बजावत आहेत. कागलसह इतर तालुक्यातील गावे पिंजून काढत आहेत. 

जिल्ह्यातील महाडिक गटाचीही ताकद धनंजय महाडिक यांच्यासाठी राबत आहे. 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत खा. महाडिक यांनी ‘कोल्हापूर दक्षिण’मध्ये चुलतभाऊ अमल महाडिक यांच्या पाठीशी सर्व शक्‍ती पणाला लावली. 

पहिल्यांदाच विधानसभा लढविलेल्या अमल यांनी त्या निवडणुकीत मंत्री असलेल्या पाटील यांचा पराभव केला. ज्यांना खासदारकीसाठी रात्रंदिवस प्रचार केला त्यांनीच विरोधी भूमिका घेतल्याने हा पराभव पाटील यांच्या जिव्हारी लागला. त्यानंतर ते काही महिने राजकीयद‍ृष्ट्या अज्ञातवासात गेले होते; परंतु 2015 मध्ये झालेल्या कोल्हापूर महापालिकेतील निवडणुकीने त्यांना हात दिला. कोल्हापूर शहरात महालिका निवडणुकीत काँग्रेसला मोठे यश मिळाले. त्यातून पाटील यांना पुन्हा उभारी मिळाली आणि त्यांनी डिसेंबर 2015 मध्ये विधान परिषद निवडणूक लढविली. अमल महाडिक यांनी केलेल्या पराभवाचा बदला माजी आमदार महादेवराव महाडिक यांना पराभूत करून घेतला. त्यानंतर आता पुन्हा लोकसभा निवडणूक आली आहे. पाटील व महाडिक या दोघांचाही जिल्ह्यात प्रभाव असून दोघांनाही मानणारा एक मोठा वर्ग आहे. परिणामी कोण कुणाचा बदला घेणार? हे लवकरच कळेल. 

अन् दोघांतील वितुष्ट वाढतच गेले!

खा. महाडिक व आ. पाटील यांच्यातील दुश्मनी अख्ख्या जिल्ह्याला माहीत आहे. 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाडिक हे राष्ट्रवादीचेच उमेदवार होते. त्यावेळी पाटील हे गृह राज्यमंत्री होते; परंतु त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी असूनही महाडिक यांचा प्रचार करण्यास नकार दिला होता. अखेर तत्कालीन मंत्री व राष्ट्रवादीचे नेते आ. हसन मुश्रीफ यांनी मध्यस्थी केली. अखेर त्यांची शिष्टाई फळास आली अन् पाटील यांनी महाडिक यांचा प्रचार करण्यास होकार दिला. महाडिक विजयी झाले. पाटील यांच्या कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून कमी लिड मिळाल्याचे महाडिक यांनी जाहीर कार्यक्रमात सांगितले. त्यानंतर पुन्हा दोघांत ठिणगी पडली. तेव्हापासून दोघांत टोकाची ईर्ष्या व खुन्‍नस निर्माण होऊन वितुष्ट वाढत गेले.