होमपेज › Kolhapur › देशात महाराष्ट्र सर्वाधिक ‘हॉट’

देशात महाराष्ट्र सर्वाधिक ‘हॉट’

Published On: Apr 27 2018 12:44AM | Last Updated: Apr 27 2018 12:38AMकोल्हापूर : राजेंद्र जोशी

पर्यावरणाचा र्‍हास, बेसुमार जंगलतोड आणि जमिनीतील पाण्याची खालावलेली पातळी या ग्लोबल वॉर्मिंगला पोषक गोष्टींमुळे सारा देश उष्णतेनेे होरपळून निघत असताना यंदा एप्रिलमध्ये उष्णतेच्या स्पर्धेत महाराष्ट्र अव्वल ठरला आहे. महाराष्ट्रात चंद्रपूरमध्ये 20 एप्रिल रोजी सर्वाधिक 45.9 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले असून, देशातील सर्वाधिक उष्म्याचे राज्य म्हणून शिक्‍का बसल्याने महाराष्ट्राची जबाबदारी वाढली आहे.

एप्रिल महिन्यात यंदा राज्यात उष्म्याने कहर केला आहे. भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार चंद्रपूर, वर्धा, मालेगाव, ब्रह्मपुरी, अकोला आणि परभणी या सहा ठिकाणी यंदा सर्वाधिक तापमान नोंदविले गेले. यातील काही ठिकाणी सलग 16 दिवस उष्णता ठाण मांडून बसली होती. ही केवळ सहा ठिकाणेच नाहीत, तर देशाच्या हवामानाचा विचार करता यंदाच्या एप्रिलमध्ये देशातील सर्वाधिक उष्ण ठिकाणांमध्येही महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, देशातील राजस्थानामधील फालोडी, चारू आणि बारमेल या नेहमी अतिउष्ण तापमान नोंदविणार्‍या ठिकाणांमध्ये सलग सहा दिवस उष्ण तापमानाचा मुक्‍काम होता, तर गुजरातमधील अमरेली आणि सुरेंद्रनगर या ठिकाणी तर अवघ्या दोन दिवसांच्या मुक्‍कामानंतर तापमानाचा आलेख खाली आला. महाराष्ट्रात मात्र 16 दिवसांच्या मुक्‍कामामुळे चिंतेत मोठी भर पडली आहे.

उष्ण हवामानाच्या या तडाख्यामुळे नागरिक हैराण होत असतानाच फळबागायती करणार्‍या शेतकर्‍यांनाही मोठा तडाखा बसला आहे. कोकणात फेब्रुवारी आणि मार्चच्या मध्यापर्यंत उन्हाबरोबर सायंकाळपासून पहाटेपर्यंत थंडी मुक्‍काम करून होती. यामुळे काही ठिकाणी आंब्याचा मोहोर जळून गेला, तर बहुतांश ठिकाणी आंबा पूर्ण क्षमतेने पिकलाच नाही. या स्थितीने आंबा उत्पादकांचे 50 टक्क्यांहून अधिक पीक हातातून निसटले. आता उशिरा येणारा आंबा कडक उन्हामुळे परिपक्‍व होत असला, तरी आता बाजारात मोठ्या प्रमाणात आंबा येऊन भाव कोसळण्याच्या भीतीने उत्पादकांना ग्रासले आहे.

 आंब्याबरोबर उन्हाचा मोठा तडाखा टोमॅटोला बसला आहे. सर्वसाधारणपणे एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला बाजारात टोमॅटोची आवक कमी झाल्याने किमती वाढतात, असा अनुभव आहे; पण यावर्षी भाज्यांच्या किमती इतक्या कोसळल्या की, त्यामुळे टोमॅटोला भावच मिळत नाही, अशी व्यथा आहे. या भावात उत्पादन खर्चही निघत नाही.

Tags : Kolhapur, Maharashtra, tops, most, hot