Tue, Sep 17, 2019 04:47होमपेज › Kolhapur › पर्यटन स्थळांवर मूलभूत सुविधांचा अभाव

पर्यटन स्थळांवर मूलभूत सुविधांचा अभाव

Published On: Mar 15 2018 1:18AM | Last Updated: Mar 14 2018 10:02PMकोल्हापूर : सागर यादव 

पंचगंगा नदीच्या अस्तित्वामुळे आणि लोकराजा राजर्षी छत्रपती शाहूंनी दूरद‍ृष्टीने उभारलेल्या राधानगरी धरणामुळे कोल्हापूर पाण्याच्या खजिन्यासह निसर्ग संपत्तीने संपन्‍न आहे. मात्र, अशा कोल्हापुरात येणार्‍या पर्यटकांना विविध ठिकाणच्या पर्यटन स्थळांवर पाण्यासह विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध होत नसल्याचे वास्तव आहे. बहुतांशी पर्यटन स्थळांवर अधुनिक सुविधा तर सोडाच; पण स्वच्छतागृहे व पार्किंगसारख्या मूलभूत सुविधाही उपलब्ध नसल्याचे वास्तव आहे. 

धार्मिक, ऐतिहासिक, सामाजिक चळवळीची, कला आणि क्रीडा अशा विविधतेने नटलेली नगरी म्हणून कोल्हापूरचा सर्वदूर नावलौकीक आहे. अंबाबाई व जोतिबा मंदिर, लोकराजा राजर्षी शाहूंच्या दूरद‍ृष्टीच्या कार्याने आणि नैसर्गिक साधनसामग्रीने संपन्‍न अशा कोल्हापूर बद्दल जगभरातील पर्यटकांचे आकर्षण आहे. यामुळे वर्षभर कोल्हापूरला भेट देणार्‍या पर्यटकांची संख्या मोठी आहे.

प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचिन अशा शेकडो वर्षांचा वारसा करवीर काशी-छत्रपतींची राजधानी असणार्‍या कोल्हापूरने जपला आहे. विविध देवदेवतांची मंदिरे, गडकोट-किल्ले, ऐतिहासिक वाडे, वस्तू संग्रहालये, महापुरुषांच्या वास्तव्याने आणि विचाराने वैशिष्ट्यपूर्ण ठरणार्‍या वास्तू यांची विविधता पाहण्यासाठी, अभ्यासनासाठी दरवर्षी लाखो पर्यटक कोल्हापूरला भेट 
देतात. 

पिण्याचे पाणी अन् स्वच्छता गृहांचा अभाव

कोल्हापूर जिल्ह्यातील धार्मिक स्थळांना भेटी देणार्‍या पर्यटकांची संख्या मोठी आहे. अंबाबाई मंदिर, जोतिबा यांच्यासह शहरातील नवदुर्गा, ओढ्यावरचा गणेश मंदिर, टेंबलाई टेकडी या ठिकाणी पर्यटक-भाविकांची दररोज गर्दी असते. असे असतानाही या परिसरात पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे यांची वाणवा आहे. काही ठिकाणी तुरळक सुविधा आहेत; पण त्याही कधी बंद कधी सुरू असतात. यामुळे पर्यटक भाविकांना या सुविधांसाठी भटकावे लागते. काही ठिकाणी तात्पुरत्या फायबर स्वच्छतागृहांची उपाय-योजना करण्यात आली आहे. मात्र, त्यांची स्वच्छता होत नसल्याने त्यांचा वापर होत नसल्याचे चित्र 
आहे. 


 


WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex