Fri, Jun 05, 2020 02:00होमपेज › Kolhapur › कोल्हापूर लवकरच होणार कोंडाळामुक्‍त शहर

कोल्हापूर लवकरच होणार कोंडाळामुक्‍त शहर

Published On: May 17 2019 1:45AM | Last Updated: May 17 2019 1:45AM
कोल्हापूर :  सतीश सरीकर

कोल्हापूर शहरात जमा होणारा कचरा आता थेट दारात येऊन उचलला जाणार आहे. महापालिका प्रशासनाने त्यासाठी 104 टिपर (छोटा हत्ती वाहन) वाहने घेतली आहेत. त्यापैकी 50 वाहने महापालिकेच्या ताफ्यात गुरुवारी दाखल झाली. परिणामी, लवकरच कोल्हापुरातील तब्बल 770 कोंडाळे (कंटेनर) हटवून शहर कोंडाळामुक्‍त होणार आहे. घंटागाडीही बंद होणार असून, एक जूनपासून नागरिकांनी टिपर वाहनातच ओला व सुका असा वेगवेगळा करून कचरा टाकायचा आहे. टिपरमधून कचरा थेट प्रक्रिया केंद्रावर नेला जाणार आहे.  

कोल्हापूर शहरात दररोज निर्माण होणार्‍या सुमारे 200 टन कचर्‍याची शास्त्रोक्‍त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी राज्य व केंद्र शासनाने गेल्यावर्षी 37 कोटी 17 लाखांचा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 6 कोटी 69 लाखांची टिपर वाहने घेण्यात आली आहेत. सद्यस्थितीत कोल्हापूर शहर कचरा कोंडाळ्यांनी व्यापले आहे. 66.82 किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या शहरात 770 कोंडाळे आहेत. शहराच्या ठराविक भागात 240 घंटागाडीद्वारे कचरा गोळा करून, तो कोंडाळ्यात टाकला जातो. कोंडाळे उचलण्यासाठी 14 आर. सी. (कचरा नेणारे वाहन) वाहने आहेत. घंटागाडीचा कर्मचारी जास्तीत जास्त एक ते दोन किलोमीटर चालून कचरा गोळा करतो. त्यामुळे प्रक्रिया केंद्रावर नेऊन कचरा टाकणे शक्य होत नाही. परिणामी, ते कोंडाळ्यातच कचरा टाकतात. काहीवेळा आर. सी. वाहन आले नाही, तर कोंडाळा ओसंडून रस्त्यावर पडलेला दिसतो.

आता 104 टिपरसह इतर वाहने येणार आहेत. घंटागाडी बंद करून टिपर वाहनेच शहरात फिरणार आहेत. प्रत्येक वाहनाला स्पीकर बसविण्यात आले असून, त्याद्वारे संबंधित वाहन दारात किंवा गल्लीत आल्याची माहिती नागरिकांना मिळणार आहे. कचरा गोळा करून टिपरमधूनच तो प्रक्रिया केंद्रावर नेला जाणार आहे. झूम प्रकल्पाजवळील 30 प्रभागातील कचरा गोळा करून, तेथीलच बायोगॅस प्रकल्पात दिला जाणार आहे. पुईखडीजवळील पाच प्रभागांतील कचरा तेथील प्रकल्पात नेला जाणार आहे. आयसोलेशन परिसरातील पाच प्रभाग, लक्षतीर्थ वसाहत परिसरातील पाच प्रभाग व साळोखेनगर परिसरातील पाच प्रभागातील कचराही अशाच पद्धतीने टिपरमधून जमा करून प्रक्रियेसाठी देण्यात येणार आहे.

अशाप्रकारे पहिल्या टप्यात 50 प्रभागातील कचरा थेट टिपर वाहनातून गोळा करून प्रक्रियेसाठी देण्यात येईल. परिणामी, या प्रभागातील कचरा कोंडाळे हटविण्यात येणार आहेत. त्यानंतर दुसर्‍या टप्प्यात 65 टिपर वाहने येणार आहेत. त्यावेळी उर्वरित 31 प्रभागांतील कचराही अशाच पद्धतीने जमा करून, कोंडाळेमुक्‍त शहर केले जाणार आहे. सध्या घंटागाडीसाठी 200 कर्मचारी व साफसफाईसाठी 300 कर्मचारी आहेत. त्यातील काहींना टिपर वाहनांवर हेल्पर म्हणून घेण्यात येणार आहे. तर उर्वरित कर्मचार्‍यांना त्या-त्या प्रभागात साफसफाईचे काम दिले जाणार आहे.

टिपर म्हणजे काय?

कचरा नेण्यासाठी एका विशिष्ट पद्धतीने तयार केलेल्या वाहनाला टिपर असे म्हटले जाते. कचरा टाकण्यासाठी आणि तो वाहून नेण्यासाठी त्याची साध्या पद्धतीने रचना करण्यात आली आहे. एका टिपरमधून सुमारे 800 किलो कचरा एकावेळी वाहून नेला जाऊ शकतो. घंटागाडीपेक्षा जास्त कचरा एका टिपरमध्ये जमा होणार आहे. मनुष्यबळाची बचत होणार आहे. टिपरमध्ये अशाप्रकारे ओला व सुका कचरा टाकण्याची सोय केली आहे.

मनपा हिस्सा वित्त आयोगातील रकमेतून...

स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत कोल्हापूर महापालिकेचा प्रस्ताव शासनाने
मंजूर केला आहे. त्यासाठी महापालिकेचा हिस्सा तब्बल 15 कोटींच्यावर
असणार आहे. चौदाव्या वित्त आयोगातील सुमारे 20 कोटींच्यावर रक्‍कम
महापालिकेकडे शिल्लक आहे. त्यातून महापालिकेच्या हिश्श्याची रक्‍कम
दिली जाणार आहे. परिणामी, स्वहिश्श्यासाठी महापालिकेला पुन्हा नव्याने
कर्ज काढावे लागणार नसल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

निधीचा हिस्सा असा...

केंद्र शासन - 13 कोटी 1 लाख (35 टक्के)
राज्य शासन - 8 कोटी 67 लाख (23.33 टक्के)
महापालिका - 15 कोटी 49 लाख (41.67 टक्के)