होमपेज › Kolhapur › तेलनाडेच्या बेनामी मालमत्तांची चौकशी; प्रसंगी टाच

तेलनाडेच्या बेनामी मालमत्तांची चौकशी; प्रसंगी टाच

Published On: May 23 2019 1:41AM | Last Updated: May 23 2019 12:28AM
कोल्हापूर : प्रतिनिधी

सर्वसामान्यांची पिळवणूक आणि दहशतीच्या बळावर काळ्याधंद्यांचे साम्राज्य उभारलेल्या इचलकरंजी येथील नगरसेवक संजय तेलनाडे, भाऊ सुनील तेलनाडेसह टोळीतील साथीदारांच्या बेनामी मालमत्तांचा विशेष पथकामार्फत शोध घेण्यात येत आहे. ज्ञातस्रोतांपेक्षा बेहिशेबी मालमत्ता, हॉटेल्स, फार्महाऊस, शेतजमिनींवर टाच आणण्यात येईल, असे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले.

खासगी सावकारी, काळ्याधंद्यांतील उलाढालीचा पसारा वाढवीत तेलनाडे टोळीने इचलकरंजीसह ग्रामीण भागातील असहाय्य, गरजूंच्या कोट्यवधी रुपये किमतीच्या शेतजमिनी बळकावल्याच्या असंख्य तक्रारी पुढे येत आहेत. मटका, क्रिकेट सट्टा, सावकारीतून बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याचीही माहिती चौकशीतून पुढे येत आहे. सक्‍त वसुली संचालनालय (ईडी) व प्राप्‍तिकर विभागाचीही मदत घेण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.

जेरबंद साथीदार व तक्रारदारांच्या माहितीतून तेलनाडे बंधूंचे अनेक कारनामे उघड होत आहेत. संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर कारनाम्याची व्याप्‍ती वाढण्याची शक्यता आहे. म्होरक्याला ताब्यात घेण्यासाठी विशेष पथकामार्फत प्रयत्न सुरू आहेत. अन्याय झालेल्यांनी थेट पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असेही त्यांनी आवाहन केले आहे.

मटकाबुकी मुल्लाची एक कोटीची मालमत्ता उघड

मटकाबुकी सलीम मुल्ला व राकेश अग्रवाल यांनी काळ्याधंद्यांतून कमावलेल्या बेहिशेबी संपत्तीची चौकशी सुरू आहे. मुल्लाची उजळाईवाडी येथील एक कोटी किमतीची मालमत्ता उघडकीला आली आहे. यादवनगर येथील चौकातील सार्वजनिक शौचालय पाडून त्यावर मुल्लाने राहते घरवजा मटका उलाढालीसाठी आलिशान अड्डा उभारला आहे, असेही चौकशीत निष्पन्‍न झाले आहे, असे पोलिस अधीक्षकांनी सांगितले. 

नातेवाईकांचीही होणार चौकशी : उपअधीक्षक गणेश बिरादार

‘मोकां’तर्गत कारवाई करण्यात आलेल्या संजय तेलनाडे व सुनील तेलनाडे या दोघा बंधूंनी अवैध व्यवसायातून गेल्या दहा वर्षांत मिळवलेल्या सर्व मालमत्तेची चौकशी केली जाणार असल्याची माहिती बुधवारी पोलिस उपअधीक्षक गणेश बिरादार यांनी पत्रकारांना दिली. तेलनाडे बंधूंसह फरार असणार्‍या संशयितांचा विविध पथकांद्वारे कसून शोध घेण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

अवघ्या 18 तासांत ‘मोका’चा प्रस्ताव करण्यात आल्याने तेलनाडे टोळीला ‘मोका’ लागला. तेलनाडे गँगवर मोका लावण्यासाठी यापूर्वीच प्रस्ताव तयार करण्यात आला होता. अप्पर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाडगे व तत्कालीन उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी हा प्रस्ताव तयार केला होता. मात्र, फिर्यादीसाठी कोणी पुढे येत नसल्याने हा प्रस्ताव प्रलंबित होता. त्यामुळे तो एका बँकेच्या लॉकरमध्ये ठेवण्यात आला होता. या प्रस्तावामुळेच 18 तासांत तेलनाडे टोळीवर ‘मोका’ लावण्यात मोठा हातभार लागला; अन्यथा ‘मोका’ कारवाईला आणखीन विलंब झाला असता.