Sat, Jul 04, 2020 04:41होमपेज › Kolhapur › शांततेच्या निर्देशांकाच्या कसोटीवर भारत 137व्या स्थानी!

शांततेच्या निर्देशांकाच्या कसोटीवर भारत 137व्या स्थानी!

Published On: Jun 13 2018 1:33AM | Last Updated: Jun 13 2018 1:14AMकोल्हापूर : राजेंद्र जोशी

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर देशात जातीय दंगली वाढण्याविषयीची भीती विरोधी पक्षांकडून व्यक्त केली जात असली, तरी जागतिक शांततेच्या सारिपाटावर भारताने चार घरे पुढे मजल मारली आहे. जागतिक शांततेच्या निर्देशांकात भारत 137 व्या क्रमांकावर गेला असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला असून, भारतामध्ये कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी ही अशांततेला लगाम घालण्यास कारणीभूत ठरत असल्याचे जागतिक शांततेवर काम करीत असलेल्या ऑस्ट्रेलियन अभ्यासगटाने आपल्या अहवालात नमूद केले आहे. 

सिडनी येथील इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पीस या संस्थेेचा हा निष्कर्ष आहे. या संस्थेने जगातील 163 देशांमध्ये सर्वेक्षणाची आपली प्रक्रिया नुकतीच पूर्ण केली. या प्रक्रियेनंतर 2018 सालातील जागतिक शांतता निर्देशांकाचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये गतवेळी 141 व्या स्थानावर असलेला भारत चार घरे पुढे सरकून 137 व्या क्रमांकावर आला आहे. तर अमेरिकेबरोबर दोन हात करण्यासाठी सज्ज झालेला सिरीया हा चिमुकला देश सर्वांत शेवटच्या स्थानी म्हणजेच जगातील सर्वाधिक अशांत देश म्हणून नोंदविला गेला आहे. 

जागतिक शांतता निर्देशांकाच्या कसोटीवर आईसलँड या देशाने आपले सर्वाधिक शांततेचा देश हे स्थान कायम ठेवले आहे. या यादीमध्ये पहिल्या पाच देशांत न्यूझिलंड, ऑस्ट्रेलिया, पोर्तुगाल आणि डेन्मार्क या अन्य चार देशांचा समावेश आहे. तर यादीच्या शेवटच्या स्थानांवर अफगाणिस्तान, दक्षिण सुदान, इराक आणि सोमालिया हे देश सिरीयाबरोबर अशांततेची भागिदारी करताना दिसत आहेत. दरम्यान, भारतातील काश्मीरमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता ही भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये तणाव निर्माण करण्यास आणि पर्यायाने बाह्य शक्तींच्या आक्रमणांनी अधिक मृत्यूला कारणीभूत होत असल्याचा एक निष्कर्षही या अहवालात नमूद करताना अशांततेममुळे सिरीया, मॅक्सिको, अफगाणिस्तान, इराक आणि यमेन या देशांमध्ये सर्वाधिक मृत्यू नोंदविल्याचे हा अहवाल सांगतो आहे. गेल्या तीस वर्षांमध्ये जगातील विविध देशांमध्ये मोठ्या पद्धतीचे युद्ध साहित्य धारण करण्याची क्षमताही जगाला तणाव आणि अशांततेच्या खाईमध्ये ढकलत असल्याचे या अहवालात नमूद केले आहे. तसेच या स्थितीने जागतिक शांततेच्या निर्देशांकाच्या कसोटीवर 0.27 टक्क्याने घसरण झाली असली तरी 92 देशांच्या स्थितीमध्ये अनुकूल बदल नोंदविताना 71 देशांमध्ये ही स्थिती आणखी खराब होत चालल्याचाही या अहवालाचा निष्कर्ष आहे.