होमपेज › Kolhapur › मूल्यांकन वाढवले; उचल घटवली

मूल्यांकन वाढवले; उचल घटवली

Published On: Sep 10 2018 1:16AM | Last Updated: Sep 09 2018 11:05PMकोल्हापूर : निवास चौगले 

राज्य बँकेने साखर मूल्यांकनात वाढ केली; पण त्याचवेळी त्यावर दिली जाणारी उचल पाच टक्क्यांनी कमी केली. मूल्यांकन वाढूनही कारखान्यांना मात्र प्रतिक्‍विंटल 65 रुपये कमीच मिळणार आहेत.

साखरेचे मूल्यांकन राज्य बँक ठरवते व त्यावर उचल किती द्यायची, याचाही निर्णय हीच बँक घेते. त्यानुसार साखर कारखान्यांना कर्जपुरवठा करणार्‍या कारखान्यांनाही कर्जपुरवठा करावा लागतो. गेल्या हंगामाच्या सुरुवातीला साखरेचे दर चांगले होते, त्या तुलनेत दिली जाणारी उचलही चांगली होती. साखरेचे दर कोसळले, तसे राज्य बँकेने मूल्यांकन कमी केले. त्यामुळे कारखान्यांनी एफआरपी अधिक 200 रुपये या ठरलेल्या फॉर्म्युल्याप्रमाणे तर नाहीच; पण एकरकमी एफआरपीही दिली नाही. बहुतांशी कारखान्यांनी प्रतिटन 2,500 रुपये याप्रमाणेच ऊस उत्पादकांच्या खात्यावर पैसे जमा केले. अजूनही राज्यात एफआरपीपोटी 536 कोटी रुपये कारखान्यांकडून देय आहेत. 

जून 2018 मध्ये केंद्र सरकारने या उद्योगाला दिलासा देण्यासाठी काही चांगले निर्णय घेतले. त्यात साखरेचा हमीभाव प्रतिक्‍विंटल 2,900 रुपये निश्‍चित करण्यात आला. या दरापेक्षा कमी दराने साखर विक्री व खरेदी गुन्हा ठरवण्यात आला. त्याचा चांगला परिणाम साखर दरावर झाला. आज बाजारातील साखरेचे दर प्रतिक्‍विंटल 3,450 ते 3,500 रुपयांच्या आसपास आहेत. त्यामुळेच राज्य बँकेने साखरेवर दिल्या जाणार्‍या उचलीत प्रतिक्‍विंटल 100 रुपयांची वाढ करून हा दर प्रतिक्‍विंटल 3,100 रुपये केला. 

मूल्यांकनात 31 ऑगस्ट रोजी वाढ केली, त्याच दिवशी या मूल्यांकनावर दिल्या जाणार्‍या उचलीत मात्र कपात केली. मूल्यांकन वाढण्यापूर्वी उचल 90 टक्के दिली जात होती, आता ती 85 टक्के मिळणार आहे. मूल्यांकन वाढले असले, तरी कारखान्यांना मात्र 3,000 हजार मूल्यांकन असताना जी उचल मिळत होती, त्यापेक्षा प्रतिक्‍विंटल 65 रुपये कमीच मिळणार आहेत. परिणामी, कारखान्यांना उर्वरित एफआरपी देण्यात अडचणी निर्माण होणार आहेत.