Mon, Sep 16, 2019 11:41होमपेज › Kolhapur › दोन दिवसांत ‘हमीदवाडा’ने एफआरपी दिली नाही, तर शेतकर्‍यांनी मंडलिक यांना मतदान करू नये

दोन दिवसांत ‘हमीदवाडा’ने एफआरपी दिली नाही, तर शेतकर्‍यांनी मंडलिक यांना मतदान करू नये

Published On: Apr 22 2019 1:33AM | Last Updated: Apr 22 2019 1:13AM
कोल्हापूर :

कितीही सारवासारव केली तरी हमीदवाडा कारखान्याने अजूनही शेतकर्‍यांना एफआरपीची रक्‍कम दिलेली नाही. शब्दांचे खेळ करून, शेतकर्‍यांना फसवण्याचे दिवस आता संपले आहेत. येत्या दोन दिवसांत एफआरपीची रक्‍कम दिली नाही, तर शेतकर्‍यांनी संजय मंडलिक यांना मतदान करू नये, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी केले. 

हमीदवाडच्या कामगारांचा 4 महिन्यांचा पगार थकीत आहे. शेतकरी संघटना या विषयात लक्ष घालत आहे, हे समजल्यावर केवळ महिन्याचा पगार कामगारांच्या खात्यावर जमा करण्यात आला. त्याबद्दल कारखान्याच्या संचालकांचे अभिनंदन करावे, असे वाटत असतानाच कामगारांच्या पगाराची रक्‍कम परस्पर निवडणूक खर्च म्हणून घेण्यात आली. त्यामुळे कामगारांच्या हाती काहीच लागले नाही. असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा सज्जड इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे. 

काँग्रेस -राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार खा. धनंजय महाडिक यांच्या प्रचारासाठी वसगडे येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सरपंच नेमगोंडा पाटील यांनी महाडिक यांच्या विजयात वसगडे गावचा हातभार असेल, असे स्पष्ट केले. धनंजय महाडिक यांनी स्वत:ची क्षमता आणि काम करण्याची इच्छाशक्‍ती सिद्ध केली आहे. त्यामुळे त्यांनी प्रचार केला नाही, तरी आम्ही त्यांनाच निवडून देऊ, असे तानाजी पाटील म्हणाले.

काटे म्हणाले, शेतकरी संघटना नेहमीच शेतकर्‍यांच्या हितासाठी लढते. शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक केवळ बाता मारण्यात पटाईत आहेत. त्यांच्या हमीदवाडा कारखान्याने अजूनही शेतकर्‍यांना एफआरपीची रक्‍कम दिलेली नाही. येत्या दोन दिवसांत एफआरपीची रक्‍कम दिली नाही, तर शेतकर्‍यांनी मंडलिक यांना मतदान न करता, शेतकर्‍यांच्या पाठिशी राहणार्‍या राष्ट्रवादीच्या धनंजय महाडिक यांना मतदान करावे. 

भीमा कारखान्याबद्दल सोलापूर जिल्ह्यातील संघटनेचे कार्यकर्ते निर्णय घेतील; मात्र हमीदवाडा कारखान्याने एफआरपीची रक्‍कम आणि कामगारांचा थकीत पगार येत्या दोन दिवसांत द्यावा, अशी आग्रही मागणी काटे यांनी केली. वळिवडेचे सरपंच अनिल पंढरे, चिंचवाडचे सरपंच सुदर्शन उपाध्ये, शेतकरी संघटनेचे संजय चौगुले, रामगोंडा पाटील, विद्याधर पाटील, वर्षा कांबळे, योगिता बागडे, नीलम कांबळे, सरिता कोळी, कोलम कोळी, रावसाहेब झोरे, सुरेश नवले, प्रकाश शिंदे यांच्यासह वसगडे, चिंचवाड, वळिवडे गावातील नागरिक उपस्थित होते.