Mon, Sep 16, 2019 05:30होमपेज › Kolhapur › ‘कॉम्बिनेशन रिझल्ट’ राखीव ठेवल्याने शेकडो मुलांचे नुकसान

‘कॉम्बिनेशन रिझल्ट’ राखीव ठेवल्याने शेकडो मुलांचे नुकसान

Published On: Jul 11 2018 1:36AM | Last Updated: Jul 11 2018 12:14AMकोल्हापूर : विजय पाटील

शिवाजी विद्यापीठाच्या पदवीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचा ‘कॉम्बिनेशन रिझल्ट’ राखीव ठेवल्याने शेकडो मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया गेले आहे. रिझल्ट लावा किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश द्या, अशी मागणी करूनही याबाबत प्रशासनाकडून कसलीही कार्यवाही होत नाही. विद्यार्थ्यांच्या या शैक्षणिक नुकसानीस जबाबदार कोण? असा प्रश्‍न विद्यार्थ्यांकडून विचारला जात आहे. 

सुजित (नाव बदलेले आहे) याने बीएस्सी (फिजिक्स) अंतिम वर्षाची अडीच महिन्यापूर्वी परीक्षा दिली. सुजितचे द्वितीय वर्षाचे दोन विषय राहिले आहेत. तसेच तृतीय वर्षाच्या सेमिस्टरमध्ये एक विषय राहिला आहे. वरवर पाहता सुजितचे प्रकरण कॉमन आहे. पण आता गोची अशी झाली आहे की, सुजितला एमएस्सीला प्रवेश घ्यायचा होता; पण तो मिळत नाही. कारण त्याचा एकत्रित निकाल (कॉम्बिनेशन रिझल्ट) अद्याप लागलेला नाही. त्यामुळे एमएस्सीसाठी प्रवेश परीक्षा दिली तरी गुणवत्ता यादीत त्याचे नाव आपोआप मागे गेले आहे. कारण बीएस्सीचे गुण यामध्ये समाविष्ट करता आलेले नाहीत. 

सुजित हे एक उदाहरण झाले. अशा शेकडो सुजितचे वर्ष वाया गेले आहे, अशी सध्याची स्थिती आहे. याबाबत परीक्षा विभागाने नियमावर बोट ठेवून कानावर हात ठेवले आहेत. प्रशासनाकडून जुन्या नियमांची री ओढली जात आहे. मुलांचे  वर्ष वाया जाऊ नये म्हणून दहावीची परीक्षा दुसर्‍यांदा घेतली जाते. पण पदवीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत मात्र उलटा प्रकार सुरू आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष कोणत्याही स्थितीत वाया जाऊ नये यासाठी कॉम्बिनेशन रिझल्टबाबत किमान धोरण ठरवायला हवे. विद्यापीठाचे धोरण हे ‘विद्यार्थीकेंद्रीत’ आहे असे जाहीरपणे सांगताना दुसरीकडे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असेल तर तत्काळ दुरुस्ती केली पाहिजे. 

अजूनही वेळ गेलेली नाही, आमचा निकाल तत्काळ जाहीर करा किंवा आम्हाला प्रवेश परीक्षेच्या गुणांवर पदव्युत्तर अभ्यासक्रमास तात्पुरता प्रवेश द्यावा. जर कॉम्बिनेशन रिझल्टमध्ये विषय राहिला तर याबाबत कार्यवाही करता येईल. पण गरज नसताना वर्ष वाया जाते याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांकडून व्यक्‍त केला जात आहे.याबाबत परीक्षा विभागाशी संपर्क साधला असला त्यांनी स्पष्ट केले की, दरवर्षी असा प्रकार होतो. याबाबत अद्याप काही मार्ग काढण्यात आलेला नाही. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अखत्यारीतील हा विषय आहे.