Fri, Sep 20, 2019 22:14होमपेज › Kolhapur › साहसी खेळांना मार्गदर्शक नियम बंधनकारक

साहसी खेळांना मार्गदर्शक नियम बंधनकारक

Published On: Jul 30 2018 1:29AM | Last Updated: Jul 29 2018 11:43PM
कोल्हापूर : संग्राम घुणके

साहसी क्रीडा प्रकारातील गिर्यारोहण, माऊंटनिअरिंग, स्किईंग, स्नोबोर्डिंग, पॅरासेलिंग हवाई क्रीडा स्पर्धा  (हॅग्लायडिंग, पॅराग्लायडिंग) जलक्रीडा आयोजित करणार्‍या संस्थांसाठी राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने नवीन नियम व मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. यानुसार या क्रीडा प्रकारांचे आयोजन करताना संबंधित केंद्र व राज्य शासनाच्या संस्थांची परवानगी बंधनकारक असणार आहे. 

हिमालयात गिर्यारोहकाच्या अपघाती मृत्यूनंतर एका संस्थेमार्फत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. याबाबत निर्णय देताना उच्च न्यायालयाने माऊंटनिंअरिंगमध्ये भाग घेणार्‍या गिर्यारोहकांच्या सुरक्षेबाबत राज्य शासनाने काळजी घ्यावी,  या खेळांचे आयोजन करणार्‍या नोंदणीकृत नसणार्‍या संस्थांना आळा घालावा असे सुचित केले होते. त्यानुसार यावरील नियंत्रणासाठी संस्थाची नोंदणी करण्यासाठी जिल्हा स्तरावर समिती, पुढील नियंत्रणासाठी आयुक्त, क्रीडा व युवक सेवा यांच्या अध्यक्षेतखाली शिखर समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनामार्फत घेण्यात आला व या साहसी क्रीडाप्रकारांचे आयोजन करण्यासाठी मार्गदर्शक सुचना जून 2014 मध्ये निर्गमित केल्या.  शासनाच्या या निर्णयासंदर्भातही मुंबईत क्रीडाप्रेमींनी रिट याचिका दाखल केली. या निर्णयामध्ये त्रूटी असून याची अंमलबजावणी करणे शक्य नसल्याचे याचिकेमध्ये नमूद केले. तसेच साहसी क्रीडा प्रकारातील खेळाडूंच्या सुरक्षितेबाबत तज्ञांची समिती नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर राज्य शासनामार्फत 26 जून 2014 च्या निर्णयामध्ये आवश्यक ते बदल करण्यासाठी आयुक्त, क्रीडा व युवक सेवा यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. या समितीने शिफारस केलेला सुधारीत मसूदा शासनाने नुकताच निर्गमित केला आहे.

या सुधारीत आदेशानुसार गिर्यारोहण, हवाई व जल यामधील साहसी क्रीडा प्रकाराची व्याप्ती व योजनाबाबत सुचना अनुक्रमे परिशिष्ठ अ, ब, क, ड, यामध्ये अंतर्भुत केल्याप्रमाणे राहील. या क्रीडा प्रकारांचे आयोजन करणार्‍या संस्थांना नोंदणी आवश्यक राहील.जमिनीवरील क्रीडा प्रकारातील गिर्यारोहण, गिरीभ्रमण अशा क्रीडाप्रकारांचा राखीव संरक्षित वने, सार्वजनिक उद्याने, अभयारण्ये या ठिकाणी उपक्रम राबवावयाचा असल्यास वन खात्याची परवानगी बंधनकारक राहील. हवाई साहसी क्रीडा प्रकाराकरीता (डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हीएशन ) नागरी विमान महानिदेशालय, नवी दिल्ली यांची परवानगी घेणे बंधनकारक राहील. समुद्र व खाडीवरील साहसी क्रीडा प्रकाराकरिता महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांची व त्यांची जलक्रीडा धोरणातील नियमावली बंधनकारक असणार आहे.