Tue, Jul 07, 2020 20:49होमपेज › Kolhapur › ‘गोकुळ’ मल्टिस्टेट होऊ देणार नाही : चंद्रकांत पाटील 

‘गोकुळ’ मल्टिस्टेट होऊ देणार नाही : चंद्रकांत पाटील 

Published On: Apr 21 2019 1:40AM | Last Updated: Apr 21 2019 1:40AM
कोल्हापूर : प्रतिनिधी

माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा जीव ‘गोकुळ’मध्ये आहे. त्यामुळे ‘गोकुळ’ मल्टिस्टेट करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. परंतु, ‘गोकुळ’ मल्टिस्टेट करण्यासाठी आवश्यक असणारा ‘ना हरकत’ दाखला (एन. ओ. सी.) राज्य शासन देणार नसल्याने महाडिक यांचे ते दिवास्वप्नच राहील. पोपटाचा जीव अडकलेल्या ‘गोकुळ’मधील महाडिकांचा प्राणही आगामी काळात निघून जाऊन, त्यांचे राजकीय अस्तित्व नगण्य होईल, असा टोला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी लगावला. 

आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या तीव्र विरोधाला न जुमानता निव्वळ ‘गोकुळ’साठीच माजी आमदार महाडिक यांनी आपले कुटुंब पणाला लावले आहे. ‘गोकुळ’मधील गणित बिघडू नये म्हणूनच राष्ट्रवादीचे तिकीट सक्‍तीने घ्यायला लावून खा. धनंजय महाडिक यांचे राजकीय भवितव्य धोक्यात आणले असल्याचा गौप्यस्फोटही पालकमंत्र्यांनी केला. 

गारगोटी येथे शुक्रवारी झालेल्या सभेत मंत्री पाटील यांनी महाडिक यांच्यावर तोफ डागली होती. महाडिक व त्यांच्या बगलबच्च्यांनी चुकीच्या बातम्या व अफवा पसरविणे बंद करावे, अथवा बॉम्ब फोडला, तर महाडिकांना प्रचार थांबवावा लागेल. त्यामुळे पालकमंत्री कोणता बॉम्ब फोडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. 

राजारामपुरीतील पदयात्रेच्या समारोपात आणि त्यापाठोपाठ झालेल्या मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, रंकाळा तलाव परिसर, नष्टे इस्टेट लॉन, सदर बाजार येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पालकमंत्री पाटील यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, पक्षाने दिलेल्या जबाबदारीनुसार बारामती आणि माढा लोकसभा मतदार संघातील प्रचार नियोजनात व्यस्त असल्याने कोल्हापुरात नसल्याचा फायदा घेत महाडिक परिवाराने आपल्याविषयी जाणीवपूर्वक गैरसमज पसरवले आहेत. पराभव दिसत असल्याने ते आता अफवा व गैरसमज पसरवून मतदारांत मानसिक गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. लवकरच आपल्याला पालकमंत्री यांच्याकडून निरोप येईल असे सांगत आहेत. याचा उल्लेख करून पालकमंत्री पाटील यांनी, आपला राजकीय धर्म शिवसेना-भाजप युतीचाच आहे. कोणत्याही परिस्थितीत आपण तो पाळणारच. त्यामुळे पालकमंत्र्यांचा निरोप फक्‍त प्रा. संजय मंडलिक आणि धन्युष्यबाण यांना मते देण्यासाठीच येईल.

पवार, मुश्रीफ व सतेज पाटील यांनी प्लॅनिंग करून महाडिकांना तिकीट घ्यायला भाग पाडले

माजी आमदार महाडिक यांचा  ‘गोकुळ’ प्राण असल्यानेच धनंजय महाडिक यांनी जर शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढविली, तर ‘गोकुळ’ फुटेल हे महादेवराव महाडिक यांना माहिती होते. त्यामुळे धनंजय यांना जाणीवपूर्वक राष्ट्रवादीची उमेदवारी घ्यायला भाग पाडले. शरद पवार, हसन मुश्रीफ व सतेज पाटील यांनी सर्व प्लॅनिंग करून धनंजय महाडिक यांना राष्ट्रवादीचे तिकीट घ्यायला भाग पाडले. या सर्वांची जाणीव असूनही धनंजय महाडिक काही करू शकत नाहीत. कारण आज जे आहेत, ते महादेवराव महाडिक यांच्यामुळेच आहेत. धनंजय यांनी शिवसेनेचे चिन्ह घेतले असते, तर सगळेच वणवे झाले असते. कारण धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविल्यामुळे संपूर्ण महाडिक कुटुंब डिस्टर्ब झाले आहे. 

आ. अमल महाडिक, जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक, धनंजय हे सर्वच डिस्टर्ब आहेत. इंटेलिजन्स ब्युरोच्या अहवालानुसार लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर मतदार संघात प्रा. संजय मंडलिक 90 हजार मतांनी आघाडीवर असल्याचेही पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. असे असले तरीही यामध्ये चढ-उतार होत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी गाफील न राहता पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेली कामे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावीत, असे आवाहनही केले. 

महादेवराव महाडिक यांच्याकडूनकुटुंबाचे नुकसान 

‘गोकुळ’ दूध संघ उभारणीत महादेवराव महाडिक यांचे काय योगदान, असा सवाल करून पालकमंत्री म्हणाले, संचालकही नसताना महादेवराव महाडिक किंगमेकरच्या भूमिकेत तेथे वावरतात. ‘गोकुळ’ हातातून जाईल या भीतीनेच त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना हाताशी धरून, धनंजय महाडिक यांना उमेदवारी मिळवून दिली. मुलगा अमल महाडिक भाजपच्या तिकिटावर निवडून आला. सून शौमिका महाडिक भाजपच्याच पाठिंब्यावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष झाल्या; पण युतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ आ. अमल महाडिक व शौमिका महाडिक कोठेच दिसले नाहीत. केवळ ‘गोकुळ’वरील प्रेमापोटी महादेवराव महाडिक यांनी आपल्या कुटुंबाचे नुकसान केल्याचा टोलाही त्यांनी 
लगावला. 

मजबूर नको मजबूत सरकार द्या

1989 ते 2014 या पंचवीस वर्षांच्या काळात अनेक अल्पायुषी सरकार सत्तेवर होती. त्यांच्या काळात बाहेरील देशांना हवा तसा कारभार करता आला; पण 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एक मजबूत सरकार सत्तेवर आले. यामुळे पाकिस्तानसारख्या देशात घुसून भारतीय सैन्य कारवाई करू शकले. आगामी निवडणुकीत नागरिकांनी मोदींचे हात बळकट करण्यासाठी युतीचे उमेदवार निवडून येतील, यासाठी प्रयत्न करावेत आणि ‘मजबूर’ नव्हे, तर ‘मजबूत’ सरकार सत्तेवर आणावे, असे आवाहन मंत्री पाटील यांनी केले. देशाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी बहुमतातील पक्ष गरजेचा असतो. दुहेरी आकड्यातील खासदार नसणार्‍या राष्ट्रवादीचा प्रतिनिधी निव्वळ प्रश्‍न मांडण्याशिवाय काहीही करू शकत नाही. त्यासाठी भाजपचे नैसर्गिक साथीदार असलेल्या प्रा. मंडलिक हेच मोलाची भूमिका निभावू शकतात, असेही ते 
म्हणाले.

ना. चंद्रकांत पाटील काय म्हणाले...

खा. धनंजय महाडिकांचे राजकीय भवितव्य धोक्यात
  महाडिकांच्या हातून ‘गोकुळ’ गेल्यास त्यांचे 
     अस्तित्व नगण्य राहणार
  महाडिक कुटुंबाने जाणीवपूर्वक गैरसमज पसरविले
  पराभव दिसू लागल्याने महाडिक अफवा पसरवू 
     लागले आहेत
  युती धर्म भविष्यातही पाळणारच
  प्लॅनिंग करून खा. महाडिकांना राष्ट्रवादीचे तिकीट 
     घेण्यास भाग पाडले
  संपूर्ण महाडिक कुटुंब डिस्टर्ब