होमपेज › Kolhapur › पर्यटनाला जाताय...

पर्यटनाला जाताय...

Published On: Sep 27 2018 1:25AM | Last Updated: Sep 27 2018 12:03AMकुटुंबाबरोबर किंवा मित्र-मैत्रिणींसोबत सहलीला जाण्याची मजा काही औरच असते. रोजच्या धावपळीच्या जीवनातून विसावा मिळण्यासाठी सहलीसारखा दुसरा उत्तम उपाय नाही. रोजच्या चिंता, कामाचा ताण या गोष्टींमुळे आलेला मानसिक थकवा घालविण्यासाठी छानशा निसर्गरम्य ठिकाणी जाणे किंवा अन्य आवडत्या ठिकाणी फिरायला जाणे हे नक्‍कीच सुखद असते. अलीकडे मध्यमवर्गीयांकडे सुद्धा चांगला पैसा येऊ लागला आहे. त्यामुळे वर्षातून किमान एखादी तरी मोठी सहल करण्याकडे त्यांचा कल असल्याचे मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. भारतातील वेगवेगळ्या प्रेक्षणीय स्थळांबरोबरच परदेशातही फिरायला जाण्याची क्रेझ मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. या सहलींचे नियोजन करण्यासाठी अलीकडे वेगवेगळ्या टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्या मोठ्या संख्येने असल्याचे दिसते. या कंपन्या तुम्हाला थेट घरापासून पुन्हा घरापर्यंत असे संपूर्ण पॅकेजसुद्धा उपलब्ध करून देतात. 

बरेचजण अशा कंपन्यांचा फायदा सहलीसाठी करून घेताना दिसतात. या कंपन्यांचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्या बजेटनुसार त्या आपल्याला वेगवेगळे पर्याय सुचवतात. म्हणजे बजेट मोठे असेल तर उत्तम हॉटेल्स, उत्तम प्रवास व्यवस्था, त्यामध्ये येणे- जाणे विमानाने, तसेच साईड सीनसाठी हॉटेलपासून गाडीची व्यवस्था, जेवण खाण्याची, न्याहारीची व्यवस्था अशा सर्व पद्धतीची सोय त्यामध्ये असते. या क्षेत्रामध्ये स्पर्धा वाढल्यामुळे ग्राहकवर्ग आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजना देखील या कंपन्यांतर्फे राबविल्या जातात. 

यामध्ये कौटुंबिक सहल, हनिमून पॅकेज, फक्‍त महिलांसाठीची सहल, ज्येष्ठ नागरिकांसाठी सहल अशा वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या पॅकेजचे आयोजन केले जाते. या पॅकेजमध्ये तिकीट बुकिंगपासून हॉटेलचे बुकिंग, त्या-त्या ठिकाणच्या प्रवासादरम्यानचे बुकिंग, गाईड अशा सर्व बुकिंगचा समावेश असतो. अनेक कंपन्या प्रवासादरम्यान आपल्या कंपनीकडून जाणार्‍या व्यक्‍तींच्या मनोरंजनाचीही सोय करतात. त्यामध्ये वेगवेगळे खेळ, गप्पा, गाणी, गोष्टी यांचा अत्यंत कल्पक पद्धतीने समावेश केलेला असतो. 

भारतातील सहलींसाठी रेल्वे बुकिंगचे सर्व पर्याय उपलब्ध असतात. म्हणजे आपल्या बजेटनुसार थ्री टायर, टू टायर अथवा जनरल असे बुकिंग करता येते. अनोख्या ठिकाणी गेल्यानंतर तेथील माहिती आपल्याला नसते. अशावेळी त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर लगेचच संबंधित कंपनीची गाडी तुम्हाला घ्यायला येते आणि राहण्याच्या ठिकाणी पोहोचवते. ग्राहकांना कुठल्याही पद्धतीचा त्रास होणार नाही, याची संपूर्ण काळजी प्रवासादरम्यान घेतलेली असते. 

परदेशातील सहल असेल तर बर्‍याच कंपन्या व्हिसासाठीसुद्धा मदत करतात. परदेशातल्या किंवा देशातल्या अनेक चांगल्या ठिकाणांची माहिती जमा करून पर्यटकांना ती देण्याची तजवीज करतात. आपल्याला संपूर्ण पॅकेज घ्यायचे नसले तरी इतरही पर्याय या पर्यटन कंपन्यांकडून दिले जातात. म्हणजे जाण्या-येण्याचे रेल्वेचे अथवा विमानाचे बुकिंग आपण काढले तरी सहलीच्या ठिकाणी गेल्यानंतर पुढील सर्व प्रवासाची, राहण्याची, तेथील ठिकाणे बघण्याची व्यवस्था या कंपन्यांतर्फे केली जाते. म्हणजे जाण्या-येण्याचा खर्च या पॅकेजमध्ये धरला जात नाही. आपल्याला टू स्टार हॉटेल हवे आहे की फाईव्ह स्टार हॉटेल हवे आहे, हे विचारून जास्तीत जास्त चांगले पर्याय कमीत कमी खर्चामध्ये या कंपन्या आपल्या समोर ठेवतात. तसेच फक्‍त प्रवासाची व्यवस्था कंपनीकडून आणि आपल्याला हवे ते हॉटेल आपण निवडणे असाही पर्याय उपलब्ध असतो. म्हणजे यामध्ये फक्‍त त्या-त्या ठिकाणी घेऊन जाण्याची आणि आणण्याची व्यवस्था कंपनीतर्फे केली जाते. राहण्याची व्यवस्था आपण आपल्या सोयीनुसार करू शकतो. आपल्या बजेटनुसार पॅकेज निवडीचे स्वातंत्र्य आपल्याकडे असते. 

आपल्या आवडत्या ठिकाणी गेल्यानंतर तेथील प्रेक्षणीय स्थळांपर्यंत पोहोचवणे, त्या स्थळांची माहिती देण्यासाठी उत्तम गाईड नियुक्‍त करणे याची व्यवस्था देखील सहलीदरम्यान केलेली असते. सहलीच्या काळात आपल्या कुटुंबाप्रमाणे कंपन्यांचे कर्मचारी आपली काळजी घेतात. आपत्कालीन परिस्थितीमध्ये तत्काळ मदत उपलब्ध करून देतात. अतिशय काळजीपूर्वक पद्धतीने परिस्थिती हाताळतात आणि आपल्या पर्यटकांना कुठलाही त्रास होणार नाही याची पुरेपूर व्यवस्था करतात. सहलीदरम्यान एखाद्या व्यक्‍तीला मधुमेहाचा, हृदय विकाराचा किंवा प्रवासाचा त्रास झाल्यास सोबत एक डॉक्टरदेखील असतो. प्रवासाला निघण्यापूर्वीच सर्व प्रवाशांची संपूर्ण माहिती अतिशय व्यवस्थितपणे घेतली जाते आणि त्यानुसार उपचारांची व्यवस्था देखील अनेक कंपन्यांकडून केली जाते. 

या ट्रॅव्हल्स कंपन्यांतर्फे महाराष्ट्र दर्शन, अष्टविनायक, बारा ज्योतिर्लिंग, चार धाम यात्रा यासारख्या धार्मिक सहलींबरोबर गड-किल्ल्यांची सफर, प्राचीन मंदिरे, जंगल सफारी, समुद्र किनारे, निसर्गरम्य ठिकाणे, थंड हवेची ठिकाणे इत्यादी अनेक वेगवेगळ्या पर्यायांचे सहल नियोजन केले जाते. एक दिवसाच्या सहली 

पासून महिनाभराच्या सहलीपर्यंत सर्वप्रकारचे नियोजन यामध्ये असते. प्रतिव्यक्‍ती याप्रमाणे दर आकारले जातात. लहान मुले असल्यास दहा वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी विशेष सूट असते. तसेच तुम्ही ग्रुप बुकिंग केले म्हणजे त्यातही मोठी सूट मिळते. दहा ते बारा जणांचा ग्रुप असल्यास आपला भरपूर फायदा होतो. 

हल्‍ली नेटवरून सुद्धा कंपन्यांद्वारे संपूर्ण माहिती दिली जाते. तसेच त्यांच्याकडील प्रशिक्षित व्यक्‍ती आपल्या घरी येऊन आपल्या सोयीनुसार सहलीची संपूर्ण माहिती देखील देत असतो. आपल्या मनातील सर्व शंकांचे निरसन त्यांच्याद्वारे केले जाते. शिवाय वेगवेगळ्या पॅकेजेसची माहितीसुद्धा सचित्र पद्धतीने सांगितली जाते. त्यामुळे आपल्याला कोणता पर्याय निवडायचा हे ठरविणे सोपे जाते. तीन महिने आधी बुकिंग केल्यास विशेष सवलत मिळते. उन्हाळ्यांच्या सुट्ट्यांमधील किंवा दिवाळी, नाताळच्या सुट्ट्यांमधील नियोजन आपण आधी नक्‍कीच करू शकतो आणि या सुविधेचा लाभ उठवू शकतो. 

मुलांच्या शाळांचा किंवा कॉलेज परीक्षांचा अडसर नसेल तर आपण इतर वेळीसुद्धा सहलीचे नियोजन करू शकतो. यावेळी तर किमतीमध्ये अधिक सूट असते. त्यामुळे असाही फायदा आपल्याला घेता येऊ शकतो. या कंपन्यांकडून जाण्यापूर्वी कोणते आवश्यक सामान आणि वस्तू, औषधे बरोबर घ्यावीत याचीही सविस्तर माहिती दिली जाते. त्यामुळे आपण जाणार आहोत त्या ठिकाणचे हवामान कसे असेल याची पूर्वसूचना मिळाल्यामुळे त्यानुसार कपडे व इतर सामान घेता येतात. 

सहल म्हणजे, आनंद, बदल, उत्साह, कुुटुंब मित्रपरिवार एकत्र येण्याचे माध्यम आणि त्याचबरोबर दुसर्‍या प्रदेशातील राहणीमान, तेथील माणसे, संस्कृती, खान-पान, जीवनमान जाणून घेण्याचे अत्यंत सुंदर माध्यम होय. एक उत्तम सहल वर्षभरासाठी पुरेल इतकी ऊर्जा आपल्याला देत असते. म्हणूनच अशा सहलीचे नियोजन उत्तम प्रकारेच होणे आवश्यक असते. वेगवेगळ्या पर्यटन कंपन्यांद्वारे हे आयोजन अतिशय उत्तम आणि सोयीस्कर ठरेल, अशा पद्धतीने केले जात असते. आपण योग्य ती माहिती घेऊन या कंपन्यांद्वारे उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या पॅकेजचा लाभ घेऊन आपली सहल संस्मरणीय करू शकतो.