होमपेज › Kolhapur › 'राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना भारतरत्न द्या' 

'राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना भारतरत्न द्या' 

Last Updated: Feb 26 2020 4:28PM
कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना “भारतरत्न” पुरस्कार देऊन सन्मानित करावे. याबाबत केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन कोल्हापूर उत्तरचे आमदार चंद्रकांत जाधव व कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिले. यावेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी पाटील आदी उपस्थित होते.  

या निवेदनात आमदार चंद्रकांत जाधव व आमदार ऋतुराज पाटील यांनी, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या लोककल्याणकारी कार्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली. राजर्षी छत्रपती शाहू महाराज बहुजनांना शिक्षण, जातीभेद निर्मूलन, नोकऱ्यांमध्ये आरक्षण आणि स्त्रीमुक्तीसाठी कायदे करणारे सुधारणावादी समाजसुधारक होते. आरक्षणाचे जनक, समतावादी लोकराजे राजर्षी शाहू महाराज हे २० वर्षाचे असताना कोल्हापूर संस्थानचे राजे झाले. 

महात्मा ज्योतिबा फुलेंच्या मानवतावादी कार्याचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव होता. त्यामुळे कोल्हापूर संस्थानची गादी हाती आल्यानंतर त्यांनी सामाजिक सुधारणांचे कार्य केले. शिक्षणावरील उच्चवर्णीय मक्तेदारीस विरोध करून बहुजन समाजातील लोकांना शिक्षण घेता यावे यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी केलेल्या ऐतिहासिक कार्याचा गौरव म्हणून त्यांना “भारतरत्न” देण्यासाठी दोन्ही सभागृहाकडे ठराव करून केंद्र सरकारकडे शिफारस करावी, अशी मागणी आमदार चंद्रकांत जाधव यांनी केली आहे.