Sun, Aug 18, 2019 06:22होमपेज › Kolhapur › पानसरे हत्येच्या कटात काळेसह चौघांचा सहभाग; चारशे पानी दोषारोपपत्र

पानसरे हत्येच्या कटात काळेसह चौघांचा सहभाग; चारशे पानी दोषारोपपत्र 

Published On: Feb 11 2019 7:54PM | Last Updated: Feb 11 2019 7:49PM
कोल्हापूर : प्रतिनिधी

ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी जेरबंद संशयित अमोल अरविंद काळे (वय ३५, पिंपरी चिंचवड, पुणे) याच्यासह चौघांविरुध्द ‘एसआयटी’ने १५ वे सहदिवाणी न्यायाधीश एस. एस. राऊळ यांच्या न्यायालयात सोमवारी चारशे पानी दोषारोपपत्र दाखल केले. खून, खुनाचा प्रयत्न, साथीदारांच्या मदतीने हत्येचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. भक्कम पुराव्यांसह ८५ साक्षीदारांचा अंतर्भाव यात करण्यात आला आहे.

काळेसह साथीदार वासुदेव भगवान सूर्यवंशी (वय २९, रा. यावल, जि. जळगाव), भारत उर्फ भरत जयवंत कुरणे (३७, महाद्वार रोड, बेळगाव), अमित रामचंद्र देगवेकर (३८, दोडामार्ग, सिंधुदुर्ग) अशी संशयिताची नावे आहेत. चारही संशयित सनातन संस्थेशी संबंधित असल्याचे नमूद करण्यात आले आहे. डॉ. विरेंद्रसिंह तावडे, समीर गायकवाड, सारंग अकोळकर, विनय पवारविरुध्द यापुर्वीच दोषारोपपत्र दाखल झाले आहे. त्यामुळे दोषारोपपत्र दाखल आरोपींची संख्या आठ झाली आहे.

विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी सायंकाळी साडेचार वाजता दोषारोपपत्र दाखल केले. काळेच्या अटकेला मंगळवारी ९० दिवसाचा कालावधी होत आहे. तत्पुर्वीच एसआयटीने ही प्रक्रिया पूर्ण केली आहे, असेही राणे यांनी सांगितले. 

हत्येप्रकरणी काळेसह चौघांचा सहभाग निष्पन्न

कॉ. पानसरे हत्येप्रकरणी डॉ. तावडे, गायकवाडच्या चौकशीतून सारंग अकोळकर, विनय पवारसह अन्य चार संशयिताची नावे निष्पन्न झाली होती. त्यानुसार एसआयटीने अमोल काळेला दि. १५ नोव्हेंबर २०१८, वासुदेव सुर्यवंशीला १ डिसेंबर २०१८, भरत कुरणेला १ डिसेंबर २०१८, अमित देगवेकरला १५ जानेवारील २०१९ मध्ये अटक केली होती.

हत्येसाठी संशयितानी संगनमताने रचला कट

कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येसाठी मास्टरमाईंड डॉ. तावडे यानी अमोल काळेसह चारही मारेकर्‍यावर वेगवेगळी कामगिरी सोपविण्यात आली होती. बाँबस्फोट घडविण्यासह अग्नीशस्त्र चालविण्याच्या प्रशिक्षणाचीही जबाबदारी देण्यात आली होती. तर देगवेकरवर कॉम्रडे पानसरे यांचे निवासस्थान, बिंदूचौकातील कार्यालयाच्या रेकीची जबाबदारी सोपविण्यात आल्याचेही निष्पन्न झाले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

... तर फाशी अथवा आजन्म कारावास

संशयिताविरुध्द १२०(ब) कट रचणे, १०९ मदत करणे, ३०२ हत्या, ३०७ खुनाचा प्रयत्न, ३४ संगनमत करणे, याशिवाय घातक शस्त्रे बेकायदा कब्जात बाळगल्याप्रकरणी आरोप ठेवण्यात आले आहेत. संशयितावरील न्यायालयात दोष सिध्द झाल्यास आजन्म कारावास अथवा फाशीची कायद्यात तरतूद असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.