Wed, Jun 19, 2019 08:31होमपेज › Kolhapur › प्राधिकरणासाठी शेतजमीन घेणार नाही

प्राधिकरणासाठी शेतजमीन घेणार नाही

Published On: Oct 12 2018 1:29AM | Last Updated: Oct 12 2018 1:28AMकोल्हापूर : प्रतिनिधी

प्राधिकरणासाठी शेतकर्‍यांची एक सेंटिमीटरही जमीन घेतली जाणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी बैठकीत दिली. प्राधिकरणाने शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे, यामुळे विरोधच राहील, असे हद्दवाढविरोधी कृती समितीने स्पष्ट केले. दसर्‍यानंतर सरपंच, ग्रामसेवक यांची बैठक होेईल, असेही पाटील म्हणाले.

पाटील यांनी कृती समितीचे नाथाजी पोवार, करवीर पंचायत समितीचे सभापती राजेंद्र सूर्यवंशी, नारायण पोवार, बी. जी. मांगले, राजू माने आदींशी चर्चा केली. प्राधिकरणाबाबत गैरसमज दूर केल्याचा दावाही त्यांनी केला.

पालकमंत्री म्हणाले, प्रकल्प, योजना  शासकीय जागेवर होतील, प्राधिकरणातील गावात शुद्ध पाण्यासाठी ‘आरओ’चा प्रकल्प, पाचगाव, उचगाव, गांधीनगरसारख्या गावात स्वतंत्रपणे सांडपाणी व घनकचरा प्रक्रिया प्रकल्प, चार-पाच लहान गावांसाठी क्लस्टर करून, एसटीपी सुरू केले जातील. प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, सहायक संचालक नगररचना मोहन यादव, नगररचनाकार संजीव आंबेकर, हद्दवाढविरोधी कृती समिती पदाधिकारी उपस्थित होते.

विरोध कायम; कृती समिती 

बैठकीनंतर हद्दवाढविरोधी कृती समितीने प्राधिकरणाला विरोध कायम असल्याचे सांगितले. नियोजन, निधी आणि अंमलबजावणी या सूत्रावर आधारित काम व्हावे, ते दिसत नसल्याचे बी. जी. मांगले म्हणाले. वडणगेचे सरपंच सचिन चौगुले म्हणाले, पालकमंत्री म्हणाले तसे कायद्यात रूपांतर झाले, तर विचार करू. प्रादेशिक योजनेसह अनेक प्रकल्पांत जमीन जात आहे. प्राधिकरण म्हणजे आम्ही भूमिहीनच होणार, त्यात दिलेला शब्द पाळतीलच असे नाही, यामुळे प्राधिकरणाला विरोधच राहील, असे निगवे दुमालाचे माजी उपसरपंच दिनकर आडसूळ म्हणाले. राजेंद्र सूर्यवंशी यांनी, प्राधिकरणाने शेतकरी उद्ध्वस्तच होणार असल्याने त्याला विरोधच राहील, असे सांगितले. राजू माने यांनी लोकांच्या हरकती, सूचना मागवून निर्णय घ्यावा, असे सांगितले. पालकमंत्री जे आश्‍वासन देतात, त्याचे कायद्यात रूपांतर करावे, असे अशोक पाटील म्हणाले. निगवे दुमालाचे विक्रम कराडे, उपसरपंच पंडित लाड, वाशीचे संदीप पाटील उपस्थित होते.

हद्दवाढ कृती समितीलाही बोलविण्यात येणार होते. निरोप न मिळाल्याने समितीचे निमंत्रक आर. के. पोवार संतप्त झाले. त्यांनी पालकमंत्री पाटील यांची स्वतंत्रपणे भेट घेतली.