Wed, Jun 19, 2019 08:15होमपेज › Kolhapur › बनावट सोने तारण; कर्जदार टोळी जेरबंद

बनावट सोने तारण; कर्जदार टोळी जेरबंद

Published On: Oct 12 2018 1:29AM | Last Updated: Oct 12 2018 1:29AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

बनावट सोने देऊन बँका, पतसंस्थांकडून लाखो रुपयांची कर्जे उचलणारी टोळी करवीर पोलिसांनी जेरबंद केली. दोन महिलांसह नऊ जणांचा या टोळीत समावेश आहे. जिल्ह्यातील 4 बँका, 1 पतसंस्था आणि 3 सराफांना त्यांनी गंडा घातल्याचे उघडकीस आले. प्राथमिक तपासात 40 लाखांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले असून, याची व्याप्ती सांगली, सातारा जिल्ह्यांतही पसरल्याचे पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

याप्रकरणी टोळीचा म्होरक्या चंद्रकांत शिवराम भिंगार्डे (वय 55, रा. फुलेवाडी) याच्यासह अतुल निवृत्ती माने (29), विलास अर्जुन यादव (45, दोघे रा. गणेशवाडी, ता. करवीर), अमर दिनकर पाटील (28, रा. शिरोली दुमाला), भारती श्रीकांत जाधव (45, रा. पाचगाव, ता. करवीर), कविता आनंदराव राक्षे (38, रा. कोरेगाव, सातारा), विक्रम मधुकर कोईंगडे (30, रा. शिरोली दुमाला), राकेश रजनीकांत रणदिवे (41, गंगावेस), पृथ्वीराज प्रकाश गवळी (28, रा. गणेशनगर, शिंगणापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आटणी कारागीर तानाजी केरबा माने (वय 46, रा. गणेशवाडी, ता. करवीर) पसार झाला आहे.

बँका व पतसंस्थांकडे सुमारे 2 किलो बनावट सोने तारण म्हणून ठेवण्यात आले होते. या सोन्याच्या दागिन्यांना 1 ते 3 ग्रॅमचा मुलामा चढविण्यात आला होता. फसवणूक झालेल्या तीन सराफांच्या तपासणीतही हे दागिने बनावट असल्याचे समजून न आल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

भिंगार्डे मुख्य सूत्रधार
फुलेवाडीत राहणारा चंद्रकांत भिंगार्डे याने सातारच्या कविता राक्षे हिच्याकडून बनावट सोने खरेदी केले. त्याने ग्रामीण भागातील काही साथीदारांना हाताशी धरून बँकांकडे सोने तारण ठेवले. याआधारे त्याने कर्जे उचचली आहेत. संशयितांपैकी भिंगार्डे व तानाजी माने हे दोघे सोनारकामाशी संबंधित आहेत. त्यामुळे या दोघांनीच काही सोनारांच्या मदतीने हा कट रचल्याचा पोलिसांना संशय आहे. सातारच्या कोरेगावमधील सुभाषनगरात राहणारी कविता राक्षे या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. तिचा पती अर्धांगवायूने आजारी आहे. ती स्वत: राजस्थानसह बाहेरील राज्यातून बनावट सोने मागवीत होती. तिच्याकडूनच कोल्हापुरात बनावट सोने आल्याचे तपासात पुढे आले आहे. तिच्या मागे आणखी कोणाचा हात आहे, याचा तपास सुरू आहे. 
 

राजस्थान व्हाया सातारा
एक ग्रॅमचे दागिने सर्वच सराफांकडे विक्रीसाठी ठेवण्यात येते. एक ग्रॅमचे दागिने तपासणीत बनावट उघड होण्याच्या भीतीने संशयितांनी विशिष्ट दागिन्यांचा शोध सुरू केला होता. यातच राजस्थानमध्ये 3 ग्रॅमचे दागिने बनविल्याची माहिती त्यांना मिळाली. या टोळीतील महिला कविता हिने थेट राजस्थानातून 3 ग्रॅम सोन्याचा मुलामा असणारे दागिने मागविले.

जमीन विकून पैसे फेडले

सहा महिन्यांपूर्वी कोतोलीतील राष्ट्रीयीकृत बँकेच्या ऑडिटमध्ये बनावट सोने ठेवल्याचे उघड झाले. या सोन्याची बँकेच्या सराफाने तपासणी केली होती; पण ही बाब त्याच्या निदर्शनास आली नव्हती. याची कुणकुण लागताच संबंधित खातेदाराने स्वत:ची जमीन विकून बँकेचे कर्ज फेडले. यामुळे याची नोंद पोलिसांत झाली नव्हती.


सोनारांना क्लीन चिट?

बँकेच्या पॅनेलवर असणारे सोनार सोने तारणावेळी दागिने तपासतात. त्यांच्याकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतरच सोने तारण कर्ज दिले जाते. चार बँका व एका पतसंस्थेकडे असणार्‍या एकाही सोनाराच्या निदर्शनास बनावट सोन्याची बाब न येेणे हे विशेष आहे. यापूर्वी कसबा बावड्यातील एका सराफाला अटक झाली होती. मात्र, या प्रकरणात सर्व सोनारांना क्लीन चिट मिळाल्याची चर्चा आहे.

फसवणूक झालेल्या बँका व सराफ
  जिल्हा मध्यवर्ती बँक, शिरोली दुमाला, कसबा बीड शाखा (30 तोळे)
  आयसीआयसीआय बँक, कोतोली, बाजारभोगाव शाखा (80 तोळे)
  वीरशैव बँक साने गुरुजी वसाहत, राशिवडे शाखा (22 तोळे)
  राजे विक्रमसिंह घाटगे बँक कागल, बाचणी शाखा (30 तोळे)
  दर्शन सहकारी पतसंस्था, महाराणा प्रताप चौक (35 तोळे)
  भाग्यलक्ष्मी ज्वेलर्स, पाचगाव (9 तोळे)
  शंकर गणपतराव शेळके ज्वेलर्स, माळ्याची शिरोली (7 ग्रॅम)
  महालक्ष्मी ज्वेलर्स, बालिंगा (11 ग्रॅम)