Sat, Sep 21, 2019 06:01होमपेज › Kolhapur › कोल्हापुरात तासभर वळवाचा पाऊस

कोल्हापुरात तासभर वळवाचा पाऊस

Published On: Jun 13 2019 1:33AM | Last Updated: Jun 13 2019 1:17AM
कोल्हापूर : प्रतिनिधी

शहरात बुधवारी तासभर दमदार पाऊस झाला. दिवसभराच्या ढगाळ वातावरणानंतर सायंकाळी झालेल्या पावसाने जनजीवन काही काळ विस्कळीत झाले. शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागांत, धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस झाला. पंचगंगेच्या पाणी पातळीतही आज एक फुटाने वाढ झाली.

शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस होत आहे. बुधवारी शहरात सलग पाचव्या दिवशी मान्सूनपूर्वच्या सरी कोसळल्या. ‘वायू’ चक्रीवादळाचा काहीसा परिणाम शहर आणि जिल्ह्यात जाणवला. आज सकाळपासून वातावरण ढगाळ होते, हवेत वार्‍याचेही प्रमाण अधिक होते. यामुळे सकाळपासून हवेत गारवा जाणवत होता.

शहरात सायंकाळी सहाच्या सुमारास पावसाला प्रारंभ झाला. काही वेळात पावसाचा जोर वाढला. अनेक भागात सुमारे तासभर पावसाचा जोर कायम होता. यानंतर रात्री उशिरापर्यंत पावसाच्या तुरळक सरी कोसळत होत्या. पावसाने जनजीवनावर परिणाम झाला. सायंकाळी कार्यालयाबाहेर पडणार्‍यांची तसेच घराकडे जाणार्‍यांना पावसाचा फटका बसला. अनेकांनी भिजतच जाणे पसंत केले, तर अनेकांनी पाऊस थांबण्याची वाट पाहणे पसंत केले. यामुळे काही कार्यालयात सायंकाळनंतरही गर्दी होती.

सायंकाळी झालेल्या पावसाने व्यापारी पेठा, खाद्यपदार्थ विक्री करणारे स्टॉल, फेरीवाले आदींनाही फटका बसला. बाजारपेठांतील गर्दी कमी झाली. अनेकांनी लवकरच दुकाने बंद केल्याने काही भागात तुलनेने लवकरच शांतता जाणवत होती. पावसाने शहराच्या अनेक सखल भागात पाणी साचले. या पाण्यातून मार्ग काढताना वाहनधारकांना विशेषत: दुचाकीस्वारांना मोठी कसरत करावी लागत होती. पावसाने शहराच्या प्रमुख मार्गावरील वाहतूकही कोलमडली. काही ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली.

शहरासह जिल्ह्यातही पाऊस झाला. बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 2.47 मि.मी.पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस राधानगरी तालुक्यात सहा मि.मी. इतका नोंदवला गेला. चंदगडमध्ये 5.83 मि.मी., भुदरगडमध्ये 4.40 मि.मी., गगनबावड्यात 3 मि.मी., पन्हाळ्यात 1.86 मि.मी., गडहिंग्लजमध्ये 1.71 मि.मी., कागलमध्ये 1.29 मि.मी., करवीरमध्ये 1.09 मि.मी., यांच्यासह हातकणंगले व शाहूवाडीत प्रत्येकी एक मि.मी.पाऊस झाला. कोल्हापूर शहरात दोन मि.मी.पावसाची नोंद झाली.

जिल्ह्याच्या धरण क्षेत्रातही पाऊस झाला. पाटगाव धरण परिसरात गेल्या 24 तासात 34 मि.मी. पावसाची नोंद झाली. राधानगरीत 15 मि.मी., दूधगंगा परिसरात 11 मि.मी., चित्रीत 12 मि.मी., कुंभीत पाच मि.मी., तुळशीत चार मि.मी., तर वारणा धरण परिसरात दोन मि.मी. पावसाची नोंद झाली. पाऊस सुरू झाल्याने तुळशी धरणातील विसर्ग वाढवण्यात आला आहे. यामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. मंगळवारी 7.3 फुटावर असलेली पंचगंगेची पातळी आज सकाळी 8.3 फुटांपर्यंत वाढली.