होमपेज › Kolhapur › दिव्यांगांना मिळणार सहा हजार मदतनीस भत्ता

दिव्यांगांना मिळणार सहा हजार मदतनीस भत्ता

Published On: Jan 13 2019 1:37AM | Last Updated: Jan 13 2019 1:13AM
कोल्हापूर : प्रवीण मस्के

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या मदतनीस भत्त्यात वाढ करून तो आता दहा महिन्यांसाठी सहा हजार रुपये करण्यात आला आहे. यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांसोबत शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून राहण्यासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांना मदत होणार आहे. 

दिव्यांग विद्यार्थी नियमितपणे शाळेत येऊन त्यांना शिक्षणाची आवड निर्माण होण्याच्या उद्देशाने दरमहा मदतनीस भत्ता देण्यात येतो. मागील वर्षी 250 प्रमाणे दहा महिन्यांसाठी अडीच हजार रुपये भत्ता देण्यात येत होता. यात 3500 रुपयांची वाढ झाली आहे. प्राथमिक शिक्षण समिती, समग्र शिक्षा अभियानांतर्गत समावेशित शिक्षण अंतर्गत 21 प्रवर्गांतील सुमारे 1650 दिव्यांग विद्यार्थी आहेत. 90 दिव्यांग विद्यार्थ्यांना मदतनीस भत्ता दिला जाणार आहे. यासंदर्भात शाळांकडून अर्ज घेण्यात आले आहेत. 

शहरातील शाळांत शिकणार्‍या दिव्यांग विद्यार्थ्यांना सीपी चेअर, व्हिल चेअर, ट्रायसिकल, हिअरिंग एड, एमआर कीट, ब्रेल पुस्तिका दिली जातात. काही मुलांना शाळेत बसता येत नाही त्यांच्यासाठी स्थानिक स्तरावरून मोडीफाईड चेअर बनविण्यात येणार आहेत. 

मनपाकडे सात विशेष शिक्षक आणि एक विशेष तज्ज्ञ आहे. 0 ते 6, 1 ली ते 8 वी आणि 9 ते 12 वीपर्यंतच्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी हे शिक्षक काम करीत आहेत. मागील वर्षी या शिक्षकांना 21, 500 रुपये मानधन होते. चालू वर्षी मानधनात कपात करून 20 हजार रुपये करण्यात आले असून, कामाचा व्याप वाढविण्यात आला आहे. राज्यस्तरावर सुमारे अडीच लाख दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 1946 शिक्षक कार्यरत आहेत, असे समावेशित शिक्षणचे समन्वयक राजेंद्र आपुगडे यांनी सांगितले.