Tue, Sep 17, 2019 03:37होमपेज › Kolhapur › कोल्हापुरी राजकीय खिचडीचा राज्यभर दरवळ !

कोल्हापुरी राजकीय खिचडीचा राज्यभर दरवळ !

Published On: Apr 17 2019 2:06AM | Last Updated: Apr 16 2019 9:06PM
सुनील कदम

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी माजलेली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीसह 56 पक्षांची आघाडी आणि भाजप-शिवसेना युती यांच्यात घमासान सुरू आहे. निवडणुकीच्या तोंडावर अधूनमधून राजकीय पक्षांमध्ये आयाराम-गयारामांचा खेळही रंगताना दिसत आहे. मात्र या सगळ्या हातघाईत लक्ष वेधून घेत आहे ती ‘कोल्हापूरची राजकीय खिचडी’! कुणाचाही राजकीय पायपोस कुणाच्याही पायाला नसलेल्या आणि तत्त्व-पक्षीय निष्ठा वगैरे खुंटीला टांगून ठेवलेल्या कोल्हापूरच्या या राजकीय खिचडीचा दरवळ आजकाल अवघ्या राज्यभर दरवळताना जाणवत आहे.

कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाला अनेक पदर आहेत. सर्वच राजकीय पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते इथे गुण्यागोविंदाने नांदताना दिसत असले तरी ऐन निवडणुकीत ज्या त्या पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते ज्या त्या राजकीय पक्षाचेच काम करतील, याची कुणीही ठामपणे खात्री देऊ शकत नाही. अर्थात याच्या मुळाशी आहे ‘सर्वपक्षीय आणि सर्वव्यापी महादेव’! कुणी कोणत्याही राजकीय पक्षाचे काम करीत असला तरी या ना त्या निमित्ताने, गोकुळसह वेगवेगळ्या सहकारी संस्थांतर्गत राजकारण व अन्य काही प्रसंगपरत्वे त्यांचा माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याशी  संबंध येतोच येतो. त्यामुळे साहजिकच काही वेळा राजकीय पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांना आपापल्या पक्षीय निष्ठा काही काळ बाजूला ठेवून महाडिक यांच्या भूमिकेशी मिळतीजुळती भूमिका निभावावी लागते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही याचा प्रकर्षाने प्रत्यय येताना दिसतो आहे.

महादेवराव महाडिक हे काँग्रेसचे विधान परिषदेतील माजी आमदार असले तरी कोणत्याही एका पक्षाचा शिक्‍का त्यांच्यावर मारला जाऊ शकत नाही. काँग्रेसच्या पाठबळावर आमदार झालेल्या महाडिकांनी कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत मात्र ताराराणी आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसशी उभा दावा मांडलेला असतो. त्यांचे पुतणे धनंजय महाडिक हे राष्ट्रवादीचे  खासदार असून राष्ट्रवादीचे  उमेदवार आहेत. महादेव महाडिक यांचे चिरंजीव अमल महाडिक हे दक्षिण कोल्हापूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार आहेत; तर स्नुषा शौमिका महाडिक या कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षा असून त्यादेखील भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या आहेत. अशाप्रकारे आजरोजीला पूर्वाश्रमीच्या काँग्रेसवासी महादेवराव महाडिक यांच्या एकाच घरी राष्ट्रवादी आणि भाजप हे राजकीय पक्ष ‘संगनमताने’ एकत्र नांदताना दिसतायत. राहता राहिली शिवसेना; पण शिवसेनेचेही महाडिक यांना वावडे आहे, अशातला भाग नाही. युती शासनाच्या कालावधीत काही काळ त्यांनी शिवसेनेशीही जवळीक साधलीच होती की! शिवाय वेगवेगळ्या निवडणुका असतील किंवा काही कार्यक्रमाच्या निमित्ताने महाडिकांच्या अखत्यारीतील ‘गोकुळा’तील चार शिंतोडे शिवसेना नेत्यांच्याही अंगावर उडले नसतील, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. एकूणच काय तर सर्वपक्षीय आणि सर्वव्यापी महाडिकांच्या राजकारणाची कमाल कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत बघायला मिळत आहे.

आज कोल्हापुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे धनंजय महाडिक विरुद्ध भाजप-शिवसेना युतीचे प्रा. संजय मंडलिक अशी घनघोर लढाई सुरू आहे. अर्थात महाडिक सर्वपक्षव्यापी असले तरी हे रणांगण त्यांच्यादृष्टीने सोपे आहे, अशातला भाग नाही. उलट या पद्धतीच्या राजकारणामुळेच आज त्यांचे पुतणे धनंजय महाडिक यांना स्वकीयांच्या विरोधाचा सामना करावा लागत आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी राजेश क्षीरसागर (शिवसेना - कोल्हापूर उत्तर), चंद्रदीप नरके (शिवसेना - करवीर), प्रकाश आबिटकर (शिवसेना - राधानगरी) आणि अमल महाडिक (भाजप - कोल्हापूर दक्षिण) असे चार आमदार युतीचे आहेत; तर संध्यादेवी कुपेकर (राष्ट्रवादी - चंदगड) आणि हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी - कागल) असे दोन आमदार आघाडीचे आहेत. मात्र या कागदावरील संख्याबळावर विसंबून राहून कोल्हापूरच्या राजकारणाचा अंदाज बांधता येत नाही.

गेल्यावेळी धनंजय महाडिक हे जरी राष्ट्रवादीचे खासदार असले तरी पाच वर्षे त्यांचा घरोबा जणू काही भाजपशीच होता. त्यांच्या काकांच्या अखत्यारीतील गोकुळसह वेगवेगळ्या संस्थांची अपरिहार्यता असेल किंवा अन्य काही कारणांमुळे असेल; पण धनंजय महाडिक यांची उठबस स्वकीयांपेक्षा परकीयांशी म्हणजे भाजपच्या नेते-कार्यकर्त्यांमध्येच अधिक होती, हे अनेक प्रसंगांतून दिसून येत होते. याच विषयावरून वेळोवेळी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी खासदारांच्या कार्यपद्धतीविरुद्ध पक्षश्रेष्ठींकडे जाहीर कागाळ्या केल्या होत्या. एवढेच नव्हे तर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांना उमेदवारी देण्यासही विरोध केला होता. असे असतानाही नाराजांची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत पक्षश्रेष्ठींनी धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली असली तरी त्यांची वाट वाटते तितकी सोपी राहिलेली नाही. 

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या आदेशानुसार हसन मुश्रीफ यांच्यासह पक्षाचे काही नेते महाडिक यांच्या प्रचारात सक्रिय झाले असले तरी अजून काही प्रमुख कार्यकर्ते अलिप्त राहून पक्षविरोधी भूमिका पार पाडताना दिसत आहेत. जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्तेही आघाडी धर्माचे पालन करीत महाडिक यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. मात्र असे असले तरी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची आतली व बाहेरची भूमिका वेगवेगळी असल्याची शंका महाडिकांच्या गोटातूनच व्यक्‍त होताना दिसत आहे. काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी तर आघाडी धर्म बासनात गुंडाळून महाडिकांच्या विरुद्ध उघड दंड थोपटलेले आहेत. साहजिकच त्याचे पडसाद जिल्हाभर उमटल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे महाडिकांच्या दृष्टीने ही निवडणूक वाटते तेवढी सोपी राहिलेली नाही. त्यामुळे आजघडीला तरी त्यांच्यावर ‘काका, मला वाचवा’, अशी आरोळी ठोकण्याची वेळ आली आहे. कारण सरतेशेवटी सर्वपक्षीय महादेवराव महाडिक यांच्यावरच त्यांची भिस्त असणार आहे. आता हे काका या प्रसंगातून पुतण्याला कसे तारून नेतात, ते निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

या लोकसभा मतदारसंघात युतीचे चार-चार आमदार असले तरी त्यामुळे युतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना अनुकूल वातावरण आहे, असे म्हणण्यासारखीही अवस्था नाही. कारण कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक आणि जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक हे आधीच धर्मसंकटात अडकले आहेत. घरचा उमेदवार म्हणून धनंजय महाडिक यांना साथ द्यायची की युती धर्माचे पालन करीत मंडलिकांचा झेंडा खांद्यावर घ्यायचा, याचा उघड खुलासा करणे त्यांना अशक्य होऊन बसले आहे. अर्थात त्यांची खरी भूमिका काय असणार आहे, हे जगजाहीर आहे. त्यामुळे राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके आणि प्रकाश आबिटकर या तिघांवर मंडलिक यांना मोठी भिस्त ठेवावी लागत आहे. अर्थात या तिघांच्या भूमिकासुद्धा एकाच प्रकारच्या असतील याचीही खात्री देता येणार नाही. अर्थातच याचे कारण कोल्हापूरच्या खिचडी राजकारणातच दडले आहे. त्यामुळे त्यांच्या उघड आणि छुप्या भूमिका काय असतील किंवा ज्या काय असतील त्या एकच असतील, असेही ठामपणे सांगता येत नाही. त्यामुळे कागदावरच्या गणितात मजबूत दिसणारे मंडलिक प्रत्यक्षातही मजबूत असतीलच, असे म्हणणेही धाडसाचे ठरेल.

कोल्हापूरच्या राजकारणाचा अशा पद्धतीने सगळा जांगडगुत्ता झालेला दिसतो. त्यामुळे इथे पक्षीय निष्ठा-तत्त्वे यांना अनेकवेळा मुरड घालून परस्पर सोयीचे राजकारण करावे लागते. त्यामुळे राज्यभर आघाडी विरुद्ध युती असा घनघोर संग्राम सुरू असताना कोल्हापुरात मात्र सर्वपक्षीय राजकीय खिचडीचा प्रयोग रंगलेला बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे अवघ्या राज्यातून या जगावेगळ्या लढतीबद्दल कुतूहल जाणवतानाही आढळून येत आहे. अर्थात निकालानंतरच कोल्हापूरच्या या अंतरंगी राजकारणाचे पदर उलगडलेले दिसणार आहेत.

पक्षनिष्ठा आणि तत्त्वनिष्ठा झाल्या इतिहासजमा!

कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात फार पूर्वी एक काँग्रेसचा आणि दुसरा शेतकरी कामगार पक्षाचा असे दोन मुख्य राजकीय प्रवाह होते. अर्थात त्यावेळीसुद्धा काँग्रेस अंतर्गत दोन गट होतेच; पण या गटातटाच्या राजकारणात कधी पक्षीय राजकारणाचा बळी देण्याचे फारसे प्रकार बघायला मिळायचे नाहीत. पण जसजशी जिल्ह्याच्या राजकारणातील जुने नेते-कार्यकर्त्यांची फळी लयाला जाऊन महाडिक-नरके-पाटील गटाने राजकारणावर आपली मांड ठोकली, तेव्हापासून खर्‍या अर्थाने पक्षीय आणि तत्त्वनिष्ठ राजकारणाला तिलांजली मिळाल्याचे दिसते. कालांतराने हळूहळू जिल्ह्यातील शेकापचा ठाव उठून त्याठिकाणी शिवसेनेचे बस्तान बसले. पण जिल्ह्याच्या राजकारणात अनेकवेळा शिवसेनेच्या नेत्यांनासुद्धा पक्षीय राजकारण गुंडाळून प्रचलित झालेल्या सर्वपक्षीय राजकीय प्रवाहात सामील व्हावे लागत आले आहे. एकूणच काय तर जिल्ह्याच्या राजकारणातील पक्षनिष्ठा आणि तत्त्वनिष्ठा इतिहासजमा झालेल्या आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex