Mon, Sep 16, 2019 06:19होमपेज › Kolhapur › दलित वस्ती सुधारणा निधीसाठी ‘फिल्डिंग’

दलित वस्ती सुधारणा निधीसाठी ‘फिल्डिंग’

Published On: Jan 09 2018 1:33AM | Last Updated: Jan 08 2018 11:27PM

बुकमार्क करा
कोल्हापूर : नसिम सनदी 

गेले दहा महिने निधीची चणचण अनुभवणार्‍या जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला दलित वस्ती सुधारणा योजनेंतर्गत 14 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. निधी वाटपावरून सदस्यांमध्ये चढाओढ सुरू झाली असून, सत्ताधार्‍यांनी निधी पळवण्यासाठी ‘फिल्डिंग’ लावल्याचे लक्षात आल्याने विरोधकही सावध झाले आहेत. 

अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्तीचा विकास करणे, या कामासाठी शासनाकडून 14 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. 20 कोटींची अपेक्षा असताना 30 टक्क्यांची कात्री लागून 14 कोटींचाच निधी आला आहे. प्रस्ताव मात्र 20 कोटींप्रमाणे नियोजन डोळ्यासमोर ठेवून मागवले होते. 640 प्रस्ताव समाजकल्याण विभागाकडे प्राप्त झाले आहेत. 6 कोटी रुपये कमी झाल्याने आलेल्या 14 कोटींच्या रकमेतून दोन-अडीचशे प्रस्तावांनाही निधी पुरणार नाही, अशी परिस्थिती आहे.

निधीच्या उपलब्धतेच्या तुलनेत तिप्पट प्रस्ताव आल्याने आपलाच प्रस्ताव अंतिम यादीत घ्यावा, यासाठी सदस्यांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. शनिवारी यासंदर्भात समाजकल्याण सभापतींच्या दालनात बैठकही झाली. येथे एकमत न झाल्याने सीईओंच्या कानावर सर्व वृत्तांत घालण्यात आला आहे. मार्चपर्यंत हा निधी खर्च करणे बंधनकारक असल्याने याद्या लांबवू नयेत, असे त्यांनी बजावल्याने येत्या दोन-तीन दिवसात यावर निर्णय घेण्याचे सूतोवाच समाजकल्याण सभापतींनी केले आहे. समितीच्या बैठकीत यावर आवाज उठवण्याचे संकेत सदस्यांनी दिले आहेत.

काही कामे अद्याप अपूर्ण

दलित वस्ती सुधार योजना निधीतून रस्ते, गटार, समाजमंदिर, वीज कनेक्शन, शौचालये आदी कामे केली जातात. गेल्या दोन वर्षात यासाठी 23 कोटींचा निधी समाजकल्याण विभागाला आला आहे. 2015-16 या वर्षात 14 कोटी निधीतून 299 कामे हाती घेण्यात आली होती. 2016-17 मध्ये 9 कोटीच निधी आला, त्यातून 202 कामे हाती घेण्यात आली. यातीलही काही कामे अजून अपूर्ण असल्याने निधीचे काही प्रमाणात वितरणही होऊ शकलेले नाही.