होमपेज › Kolhapur › डालडामिक्स आइस्क्रीमचीच चलती!

डालडामिक्स आइस्क्रीमचीच चलती!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : सुनील कदम

जिल्ह्याच्या अनेक भागांत काही बोगस कंपन्यांनी दुधाऐवजी डालडामिक्स आइस्क्रीमचा पुरवठा सुरू केल्याचे दिसत आहे. खरे आइस्क्रीम आणि हे डालडामिक्स आइस्क्रीम यांच्यातील फरक चटकन लक्षात येत नसल्याने ग्राहकही या बनावट आइस्क्रीमला बळी पडत आहेत. ही डालडामिक्स आइस्क्रीम्स आरोग्याच्या द‍ृष्टीने अत्यंत अपायकारक असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.

ही बनावट डालडामिक्स आइस्क्रीम्स संबंधित कंपन्यांच्या द‍ृष्टीने विविधांगी फायद्याची ठरत आहेत. एकतर दुधाच्या मलईपेक्षा डालडा स्वस्त आहे. दुसरी बाब म्हणजे दूध मलईपासून बनवलेली खरी आइस्क्रीम्स सर्वसाधारण तापमानात जास्त काळ राहू शकत नाहीत, ती लगेच विरघळतात. ती सुरक्षित ठेवायची असतील तर नेहमी उणे तपमानातच ठेवावी लागतात. उणे तपमानात जरी ठेवली तरी दुधाच्या मलईपासून बनवलेली आइस्क्रीम्स फार फार तर महिनाभर टिकतात. त्यानंतर त्याचा स्वाद बदलून ती खराब होऊन जातात. दुधाच्या आइस्क्रीम्ससाठी अखंडित वीज पुरवठ्याची सोय असावी लागते. वीजपुरवठा काही काळ खंडित झाला तर दुधापासून बनवलेली खरी आइस्क्रीम्स खराब होऊ लागतात.  त्याचप्रमाणे खर्‍या आइस्क्रीम्सची वाहतूकसुद्धा वातानुकूलित यंत्रणा असलेल्या वाहनातून करावी लागते.

डालड्यापासून बनविण्यात येत असलेल्या बनावट आइस्क्रीम्सना यापैकी कशाचीच आवश्यकता लागत नाही. सर्वसाधारण तपमानातसुद्धा डालड्यापासून  बनविलेली आइस्क्रीम्स न विरघळता सुरक्षित राहू शकतात, सर्वसाधारण तपमानात ती विरघळण्याचा धोका नसतो. ही बनावट आइस्क्रीम्स नेहमी उणे तपमानातच ठेवली पाहिजेत अशातलाही भाग नाही, अगदी दीर्घ काळपर्यंत ती सर्वसाधारण तपमानात न विरघळता सुरक्षित राहतात. त्यामुळे बनावट कंपन्यांच्या द‍ृष्टीने त्यांची वाहतूकही जोखमीची ठरत नाही, साध्या वाहनातूनसुद्धा त्यांची कितीही दूरच्या अंतरावर वाहतूक करता येते. वर्षभर जरी ठेवली तरी ही डालड्यापासून बनविलेली आइस्क्रीम्स खराब होण्याचाही धोका नसतो. वीजपुरवठा सुरळीत असला काय आणि नसला काय, या आइस्क्रीम्सवर त्याचा फार काही परिणाम होत नाही. त्यामुळे या बनावट आइस्क्रीम कंपन्यांचा वीज खर्च कमी होतो. कच्चा मालाचा दर कमी, वाहतूक खर्च कमी, विजेचा खर्च कमी या कारणांमुळे डालडामिक्स आइस्क्रीम कंपन्यांना अधिक नफा मिळत आहे. त्यामुळेच या कंपन्या दुधाऐवजी डालडामिक्स आइस्क्रीम्स बनविताना दिसत आहेत.

आज बाजारात अनेक खाद्यपदार्थांमध्ये वेगवेगळ्या फ्लेवर्सचा वापर केला जातो. असेच वेगवेगळे फ्लेवर्स आणि अन्य काही खाद्यपदार्थांचा वापर या बनावट आइस्क्रीम्समध्ये करण्यात येतो. खाण्याच्या वेळेस ही बनावट आइस्क्रीम्स अतिशीत असल्यामुळे आणि त्यातील वेगवेगळ्या फ्लेवर्समुळे खरी की खोटी, अथवा मलईमिक्स की डालडामिक्स ते सहजासहजी समजून येत नाही. अगदी चांगल्या चांगल्या आणि नामवंत कंपन्यांच्या फ्लेवर्सपेक्षाही अधिक चांगले फ्लेवर्स या बनावट आइस्क्रीम्समध्ये वापरण्यात येतात. त्यामुळे ग्राहकही त्याकडे आकर्षित होताना दिसत आहेत. आइस्क्रीम बनविण्याची थोडीफार प्रक्रिया आणि डालड्यासह अन्य काही खाद्यपदार्थांची भेसळ करून ही बनावट आइस्क्रीम्स तयार होत आहेत.

नामवंत कंपन्यांच्या आइस्क्रीम्सच्या फ्लेवर्सपेक्षा चांगले फ्लेवर्स आणि किंमतही कमी असल्यामुळे ग्राहकही या बनावट आइस्क्रीम्सना बळी पडताना दिसत आहेत; मात्र आइस्क्रीमची चव चाखण्याच्या नादात आपण डालडा खात आहोत, याची ग्राहकांना जाणीवही होताना दिसत नाही. तसेच या डालडामिक्स बनावट आइस्क्रीम्समुळे ग्राहकांच्या आरोग्यावर जे विपरीत परिणाम होत आहेत ते वेगळेच. त्यामुळे प्रशासनाने कारवाई करून या डालडामिक्स बनावट आइस्क्रीम्सचे उच्चाटन करण्याची गरज आहे.
WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex