Fri, Jun 05, 2020 01:26होमपेज › Kolhapur › अल्पवयीन मुलीशी पोलिस ठाण्यात असभ्य वर्तन : पोलिसावर गुन्हा

अल्पवयीन मुलीशी पोलिस ठाण्यात असभ्य वर्तन : पोलिसावर गुन्हा

Published On: May 17 2019 1:45AM | Last Updated: May 17 2019 12:55AM
कोल्हापूर : प्रतिनिधी

राजारामपुरी पोलिस ठाण्यात जबाब नोंदविताना अल्पवयीन मुलीशी असभ्य वर्तन करून तिला लज्जा उत्पन्‍न होईल, असे कृत्य केल्याच्या आरोपाखाली पोलिस नाईकवर गुन्हा दाखल करण्यात आला. चेतन दिलीप घाटगे (वय 34, रा. मंडलिक पार्क) असे पोलिसाचे नाव आहे. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केले असता, त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. दरम्यान, पोलिस ठाण्यातील अंतर्गत वादातून एका वरिष्ठाकडून घाटगे याला यामध्ये गोवण्यात आल्याची चर्चा पोलिस वर्तुळात सुरू आहे.

पीडित मुलगी घरातून बेपत्ता झाल्याची वर्दी तिच्या आईने पाच मे रोजी राजारामपुरी पोलिसांत दिली होती. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक मीनाक्षी माळी करीत होत्या. मंगळवारी (दि. 14) ही मुलगी स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर झाली. आपण स्वत:हून एका मैत्रिणीकडे निघून गेल्याचे तिने पोलिसांना सांगितले. परंतु, या दिवशी तपासी अधिकारी माळी सुट्टीवर असल्याने सहायक निरीक्षक रवींद्र कदम यांनी पीडित मुलगी व तिच्या आईचा जबाब घेण्यास महिला पोलिस कर्मचारी कांबळे यांना सांगितले. कांबळे या तळमजल्यात जबाब नोंदवित होत्या. त्यांना संगणक मदतनीस म्हणून चेतन घाटगे उपस्थित होता.

बुधवारी सकाळी सीपीआर रुग्णालयात पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी आणण्यात आले होते. मंगळवारी सायंकाळी पोलिस ठाण्यात जबाब नोंदविताना पोलिस नाईक घाटगे याने तिच्याशी असभ्य वर्तन केल्याचे तिने आईला सांगितले. यानंतर दोघींनी ही बाब पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांना सांगितली. घटनेचे गांभीर्य ओळखून याची माहिती तत्काळ शहर उपअधीक्षक प्रेरणा कट्टे व पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या निदर्शनास आणण्यात आली. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने तिच्या आईच्या फिर्यादीवरून पोलिस नाईक घाटगे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. भा.दं.वि.सं. कलम 354 (विनयभंग) व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला.

अंतर्गत वादाचा बळी ?

राजारामपुरी पोलिस ठाण्यातील एका वरिष्ठ अधिकार्‍याशी असलेल्या वादातून पोलिस नाईक घाटगे याला या प्रकरणात गोवण्यात आल्याची चर्चा दबक्या आवाजात पोलिस वर्तुळात सुरू आहे. या गुन्ह्याची माहिती समजताच पोलिस ठाण्याबाहेर अनेकांनी गर्दी केली होती. 

सखोल चौकशी करू : डॉ. अभिनव देशमुख 

पीडित मुलीचा जबाब व तिच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याची सखोल चौकशी करून शहानिशा करण्यात येईल. पोलिस नाईक चेतन घाटगे याचीही बाजू समजून पुढील तपास करण्यात येईल. पोलिस ठाण्यातील अंतर्गत वादाची कोणती किनार याला आहे का? याचीही माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.