Sun, Oct 20, 2019 06:09होमपेज › Kolhapur › काजू कारखानदारांना गंडा घालणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात तक्रार 

काजू कारखानदारांना गंडा घालणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात तक्रार 

Published On: Jul 12 2019 8:44PM | Last Updated: Jul 12 2019 8:13PM
चंदगड (कोल्हापूर) : प्रतिनिधी 

चंदगड तालुका काजू उत्पादनातील महाराष्ट्रातील सधन तालुका म्हणून ओळखला जातो. अनेक सुशिक्षित युवक रोजंदारीचा प्रश्न मिटावा म्हणून काजू कारखानदारीकडे वळले आहेत. गेल्या अनेक वर्षापासून हा धंदा तेजीत चालू असताना मुंबई, जयसिंगपूर येथील दोघा व्यापाऱ्यांनी काजू गरांना चांगला दर मिळवून देतो म्हणून विश्वास संपादन करून ४ कोटी १९ लाख ७६ हजार ७४१ रुपयांची काजू उचल करून तालुक्यातील वीस काजू कारखानदारांना गंडा घातला आहे. वेळोवेळी मागणी करूनही पैसे मिळत नसल्याने आज चंदगड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंद करण्यात आली.

चंदगड तालुक्यात २०० पेक्षा जास्त काजू कारखानदार असून सुमारे वीस हजार महिला आणि तरुणांना या काजू प्रक्रियेतून रोजगार मिळाला आहे. उत्तम प्रतीची आणि चवदार काजू म्हणुन चंदगडच्या काजूला परदेशात मोठी मागणी आहे. काजूला जादा दर मिळवून देतो म्हणून मुंबई येथील उमेश वारसे व जयसिंगपूर येथील प्रदीप पाटील या दोन भामट्या व्यापाऱ्यानी चंदगड तालुक्यातील २० काजू कारखानदारांना ४ कोटी १९ लाख ७६ हजार ७४१ रुपयांचा गंडा घातला आहे. याबाबत तुडये येथील कारखानदार विनोद खाचू पाटील यांनी पोलिसात तक्रार नोंदवली आहे. 

तालुक्यातील कारखानदारांनी राष्ट्रीयकृत बँका, पतसंस्थांची कर्ज काढून काजू खरेदी केली त्यावर प्रक्रिया करून उत्पादित केलेल्या मालाला मुंबई-गुजरात बाजारपेठेतून चांगली मागणी असल्याने गेल्या पाच-सहा वर्षांत या धंद्याने चांगली उभारी घेतली होती. परंतु सतत मुंबई, पुणे, गुजरात बाजारपेठेतून मला विक्री करण्यास वेळ मिळत नसल्याने चंदगड तालुक्यात सतत वावर असणाऱ्या उमेश वारसे आणि प्रदीप पाटील या दोघांनी संगनमताने तालुक्यातील वीस-वीस काजू कारखानदारांना चांगला भाव देतो असे सांगून ४ कोटी १९ लाख ७६ हजार ७६१ काजूगर १९ ऑगस्ट २०१८ ते २४ ऑक्टोंबर २०१८या कालावधीत उचल केली. त्यानंतर  काजूगराच्या पैशांची मागणी केली असता उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने वरील दोघांविरोधात चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलिस निरीक्षक ए.एन.सातपुते करत आहेत.