होमपेज › Kolhapur › दहा लाख रोपे जगविण्याचे आव्हान

दहा लाख रोपे जगविण्याचे आव्हान

Published On: May 22 2019 1:37AM | Last Updated: May 22 2019 12:18AM
कागल : बा. ल. वंदूरकर

येथील शासकीय रोपवाटिकेमधील कूपनलिका आणि विहीर कोरडी पडू लागल्यामुळे  दहा लाख रोपांना सध्या खासगी टँकरने पाणीपुरवठा करून जगविण्याचे काम सुरू आहे. तर, उत्तर भारतातील बांबूंची 79 दुर्मीळ रोपे सध्या रोपवाटिकेत पानगळ होऊन मरणासन्‍न अवस्थेत उभी आहेत. आणखी काही दिवस पाऊस आलाच नाही तर प्रचंड भयाण पाणी संकट निर्माण होणार आहे.

कडाक्याच्या उन्हामुळे सध्या जनजीवन विस्कळीत झाले. नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटू लागले आहेत. धरण, विहिरी, कूपनलिका, तलावांनी तळ गाठला आहे. वैशाख वणव्यात पिण्याच्या पाण्याच्या स्रोतातील पाणी झपाट्याने घटू लागले आहे. अनेक तलावांतील पाण्याचा केवळ मृत साठा उरला आहे. कागल येथील सरकारी रोपवाटिकेमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या रोपांची निर्मिती केली जाते. 

महाराष्ट्र आणि केंद्र शासनाच्या विविध उपक्रमासाठी रोपे तयार करण्यात येतात. यंदाच्या पावसाळ्यात शासनामार्फत 33 कोटी वृक्ष लागवड योजना राबविण्यात येणार आहे, त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला 3 हजार 201 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यासाठी या रोपवाटिकेमध्ये 10 लाख रोपांची निर्मिती करण्यात येत आहे. सध्या कडाक्याच्या उन्हामध्ये या रोपांना जगवायचे कसे? असा प्रश्‍न पडला असून सध्या रोपवाटिकेतील विहिरींनी तळ गाठला आहे. तर कूपनलिकेचे पाणी कमी झाले आहे. त्यामुळे रोपांना जगविण्यासाठी सध्या खासगी पाण्याच्या टँकरचा आधार घ्यावा लागत असून रोज दहा टँकर पाणीपुरवठा केला जातो आहे. यंदा 33 कोटी वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टामुळे रोपांची संख्या वाढविण्यात आली आहे. त्यामुळे या रोपांना जगविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.

बांबूच्या रोपांपासून आणखी रोपांची निर्मिती करण्यात येणार आहे. मात्र, त्यातील काही रोपांची वाढ होऊन नष्ट झाली आहे. तर सध्या या रोपांना पुरेसे पाणी नसल्यामुळे पूर्ण पानगळ होऊन मरणासन्‍न अवस्थेत आली आहेत. वाळून गेली आहेेत.  

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex