Sun, Jun 07, 2020 12:08होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : शाहू टोल नाक्याजवळ स्फोट; ट्रकचालकाचा मृत्यू

कोल्हापूर : शाहू टोल नाक्याजवळ स्फोट; ट्रकचालकाचा मृत्यू

Last Updated: Oct 19 2019 10:12AM
कोल्हापूर / उजळाईवाडी : प्रतिनिधी

शाहू टोल नाक्यानजीक उड्डाणपुलाखाली अज्ञात वस्तूचा शुक्रवारी रात्री 11 च्या सुमारास स्फोट झाला. त्यात ट्रकचालकाचा मृत्यू झाला. दत्तात्रय गणपती पाटील (वय 56, न्यू गणेश कॉलनी, जाधववाडी) असे त्यांचे नाव आहे. स्फोटाच्या तीव्रतेने ट्रकच्या काचा फुटल्या. गंभीर जखमी अवस्थेत पाटील यांना उपचारास नेताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. 

पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्यासह तज्ज्ञांचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी मिळालेल्या वस्तू ताब्यात घेण्यात आल्या असून त्याची तपासणी करण्यात येत आहे.

गोकुळ शिरगाव येथे माल पोहोचवण्यासाठी ट्रक (एमएच 09 एल 9357) घेऊन दत्तात्रय पाटील गेले होते. तिकडून घरी परतत असताना शाहू टोल नाक्याजवळील पुलाजवळ ट्रकचा रॉड तुटल्याने त्यांनी ट्रक रस्त्याकडेला लावला. घरी येण्यासाठी वाहन मिळत नसल्याने त्यांनी सहकारी आशिष चौगले (रा. रुईकर कॉलनी परिसर) यांच्याशी मोबाईलवरुन संपर्क साधला. काही वेळात आशिष आपल्या दुचाकीवरुन तेथे पोहोचले. पाऊस आल्याने दोघे पुलाखाली थांबलेले होते. यावेळी दत्तात्रय पाटील यांना मोबाईलवर कोणाचा तरी फोन आला. ते काही अंतर पुढे गेले. याचवेळी अचानक मोठा स्फोट झाला. पुलाखाली अंधार असल्याने नेमका कशाचा स्फोट झाला हे समजू शकले नाही. 

काचांना तडे 

स्फोटाची तीव्रता मोठी असल्याने दहा फुट लांब असणार्‍या ट्रकच्या पुढील काचांना तडे गेले. तसेच आशिष चौगलेही बाजूला पडले. स्फोटाचा आवाज ऐकून शेजारील महामार्ग पोलिस चौकीतील पोलिस, वाहनधारक तातडीने घटनास्थळी धावले. त्यांनी गंभीर जखमी अवस्थेत पाटील व आशिष चौगले यांना रुग्णवाहिकेतून शासकीय इस्पितळात पाठविले. 

पाटील यांचा वाटेतच मृत्यू 

पाटील यांच्या दोन्ही पायाच्या पिंढर्‍या व मांडीला गंभीर दुखापत झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्रावही झाला. कानठळ्या बसल्याने आशिष यांनाही अस्वस्थ वाटू लागले. त्यांना बेशुद्धावस्थेत उपचारासाठी सीपीआरमध्ये आणण्यात आले. मात्र, त्यांचा वाटेतच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पाटील यांच्या मागे पत्नी, मुलगा, नातवंडे असा परिवार आहे. उत्तम ट्रकचालक म्हणून त्यांची ओळख होती. 

स्फोट नेमका कशाचा?

घटनेची माहिती समजताच सहायक निरीक्षक सुशांत चव्हाण घटनास्थळी दाखल झाले. त्?यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभीनव देशमुख, पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांना दिली. दोघेही  याठिकाणी आले. स्फोट नेमका कशाचा झाला हे स्पष्ट होत नसल्याने स्फोटकांची माहिती असणार्‍या तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. त्यांनी घटनास्थळी पडलेल्या वस्तूंची तपासणी केली. मात्र, स्फोटके नसावीत असा कयास काढण्यात आला. 

मोबाईल की अन्य काही

पोलिसांना अल्युमिनीअमचे तुकडे मोठ्या संख्येने मिळून आले आहेत. पाटील यांच्या मोबाईलचा स्फोट झाला असावा. त्यामुळे त्याच्या पिशवीतील डबा फुटून त्याचे तुकडे मांडीत घुसले असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच औद्योगिक वसाहतीतील इलेक्ट्रीक वस्तूचा स्फोट झाला असावा का?  याचीही माहिती घेण्याचे काम पोलिस करीत आहेत.

अफवांना ऊत

विधानसभा निवडणूक अवघ्या दोन दिवसांवर येवून ठेपली आहे. या घटनेबाबत उलटसुलट चर्चा रात्री सर्वत्र सुरु होती. स्फोटके शहरात आणण्याचा प्रयत्न असावा का अशा अफवाही सर्वत्र पसरल्या होत्या. तसेच जिलेटीनच्या कांड्यांचा स्फोट झाला असावा अशीही चर्चा घटनास्थळी सुरु होती. 2014 साली या घटनास्थळापासून 500 मीटर अंतरावरील एका चायनीज गाडीवर स्फोट होवून दोघे जखमी झाले होते.