होमपेज › Kolhapur › सीपीआरमधील रुग्ण वेटिंगवर !

सीपीआरमधील रुग्ण वेटिंगवर !

Last Updated: Nov 09 2019 1:38AM
कोल्हापूर : एकनाथ नाईक 

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाच्या (सीपीआर) मुख्यशस्त्रक्रिया गृहाला विद्युतपुरवठा करणार्‍या वाहिनीत बिघडा झाला आहे. सीपीआर प्रशासनाने खबरदारी म्हणून पर्यायी विद्युत वाहिनीद्वारे वीज पुरवठा केला होता. मात्र, तो देखील कुचकामी ठरला. त्यामुळे अ‍ॅर्थोपेडिक, सर्जरीच्या शस्त्रक्रिया गेल्या तीन दिवसांपासून खोळंबल्या असून रुग्ण उपचारांच्या प्रतीक्षेत आहेत. 

जिल्ह्यातील रुग्णांना सीपीआरचा मोठा आधार असून कोल्हापूरसह सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि सीमाभागातील रुग्ण उपचारासाठी येथे दाखल होतात. दररोज सुमारे 700 ते 800 रुग्णांची बाह्य नोंदणी होते. बाह्य नोंदणी झाल्यानंतर रुग्णांना त्या-त्या विभागात उपचारासाठी पाठविले जाते. प्राथमिक उपचार करून रुग्णांना सोडले जाते. काही रुग्णांना पुढील निदान व उपचारासाठी रुग्णालयात दाखल करून घेतले जाते. काही रुग्णांवर प्रसंगी छोट्या-मोठ्या शस्त्रक्रिया कराव्या लागतात. सध्या छोट्या शस्त्रक्रिया सुरू आहेत; पण  मुख्यशस्त्रक्रिया गृहातील विद्युत वाहिनीत बिघाड झाल्याने जोखमीच्या शस्त्रक्रिया बंद आहेत. सीपीआरच्या मुख्यशस्त्रक्रिया गृहात  महिन्याला सुमारे 300 ते 400 छोट्या-मोठ्या शस्त्रक्रिया होतात. 

गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेसाठी तेथे ओटीलाई, व्हेंटिलेटर, अ‍ॅनास्थेशिया अशी महत्त्वाची उपकरणे बंद आहेत. त्यामुळे डॉक्टरांना येथे रुग्णांवर शस्त्रक्रिया करताना अडथळा निर्माण होऊ लागल्याने अर्थोपेडिक सर्जरीच्या शस्त्रक्रिया थांबल्या आहेत. शस्त्रक्रिया झाल्यानंतर अ‍ॅपरेशन थेटर पूर्णतः स्टरलाईज (निरजंतूक) करावे, मात्र  विद्युतपुरवठ्यामध्ये वारंवार बिघाड होऊ लागल्याने  अतिजोखमीच्या शस्त्रक्रिया डॉक्टरांनी थांबविल्या आहेत. सीपीआर प्रशासनाने पर्यायी विद्युतपुरवठ्याची सोय केली होती, ती देखील अपयशी ठरली आहे.