Tue, Sep 17, 2019 03:39होमपेज › Kolhapur › तरुणाला बंदूक रोखून पट्ट्याने मारहाण

तरुणाला बंदूक रोखून पट्ट्याने मारहाण

Published On: Mar 14 2018 8:38PM | Last Updated: Mar 14 2018 8:39PMकुरूंदवाड : प्रतिनिधी

औरवाड (ता. शिरोळ) येथे चारचाकी गाडी मागे घेत असताना गाडी खड्ड्यात जाईल, असे सांगणार्‍या महंमदशाहिक साबीर पटेल (वय 20, रा. औरवाड) या युवकाला सात जणांनी मिळून शिवीगाळ व मारहाण करून छातीवर बंदूक रोखून धरत जखमी केले. याप्रकरणी संशयित ऋतुराज जगदाळे, पृथ्वीराज जगदाळे, रणजित जगदाळे (सर्व रा. नृसिंहवाडी) व अनोळखी चार अशा सात जणांविरुद्ध  कुरूंदवाड पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, मंगळवारी मध्यरात्री औरवाड स्मशानभूमीजवळ पांढर्‍या रंगाची स्कॉर्पिओ वळवून घेत असताना, रस्ता अरुंद असल्याने गाडी मागे घेताना गाडी खड्ड्यात जाईल, असे महंमदशाहिक पटेल याने ओरडून सांगितले.गाडी वळवून घेतल्यानंतर ती बाजूला उभी करून संशयित ऋतुराज जगदाळे, पृथ्वीराज जगदाळे यांच्यासह अनोळखी दोघांनी गाडीतून उतरून पटेल याला शिवीगाळ केली. पृथ्वीराजने तोंडावर मारले, तर ऋतुराजने हातातील बंदुकीच्या दस्त्याने तोंडावर मारहाण करून छातीवर बंदूक रोखून धरत चुपचाप गाडीत बस, असे सांगून गाडीत बसवून नृसिंहवाडी येथे घरी आणले.

दरम्यान, रणजित जगदाळे याला घराबाहेर बोलावून आणून त्याच्यासमोर पटेल यास उभे करून हा मला शहाणपण शिकवत होता. म्हणून त्याला आणले आहे, असे ऋतुराजने सांगितले. नंतर पृथ्वीराजने कमरेचा पट्टा काढून पुन्हा पाठीवर मारहाण करायला सुरुवात केल्यानंतर ऋतुराज व अनोळखी चार जणांनी मारहाण केली. रणजितने घाला याला गोळी, असे सांगितल्यानंतर ऋतुराजने पटेलच्या छातीवर बंदूक रोखून धरली असे फिर्यादीत पटेल याने म्हटले आहे.

दरम्यान, पटेलने आपला जीव वाचविण्यासाठी त्यांच्याशी झटापट करून त्यांच्या तावडीतून निसटून पळून जाऊन घडला प्रकार घरच्यांना सांगितल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. जखमी महंमदशाहिक पटेल यास सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.


 


WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex