Sun, Jul 05, 2020 12:27होमपेज › Kolhapur › कोल्हापुरात तब्बल ३१ कोरोनाग्रस्त सापडले; बाधितांची चारशेकडे वाटचाल 

कोल्हापूर : कोरोनाबाधितांची चारशेकडे वाटचाल 

Last Updated: May 25 2020 4:36PM
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा 

कोल्हापुरात तब्बल 31 कोरोनाग्रस्त सापडले आहेत. त्यामुळे बाधितांची चारशेकडे वाटचाल सुरु झाली आहे. जिल्ह्यातील बाधितांचा आकडा 372 वर पोहोचला आहे.  भुदरगड तालुक्‍यात आज 12 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे पुन्हा एकदा भुदरगड तालुका हादरून गेला.

आज अखेर भुदरगड तालुक्याच्या खात्यावर ४७ रुग्णांची नोंद झाली आहे. तालुक्यातील लहान बारवे, पळशिवणे, नवले, गिरगाव, देऊळवाडी, वाघापूर या गावात प्रत्येकी एक तर अंतुर्लीत तीन, सुक्याचीवाडी, शिवडाव मध्ये दोन रूग्ण आढळले आहेत. रविवारी अंतुर्ली व चाफेवाडीत प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला होता. प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी यांनी या सर्व गावात कटेन्मेंट झोन जाहीर केला आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, बाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. रविवारी 24 तासांत उच्चांकी 55 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. एकाच दिवसात सर्वाधिक बाधित रुग्ण आढळल्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी एकाच दिवसात 53 रुग्ण आढळले होते. शहरात आणखी चार रुग्ण आढळून आले असून, शाहूवाडीत रुग्णसंख्या शंभरीपार गेली आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा जिल्ह्याचा आकडा रात्री 341 वर गेला. विशेष म्हणजे, हे सर्व बाधित जिल्ह्याबाहेरून रेड झोनमधून आलेले आहेत.

शनिवारी 286 पर्यंत गेलेल्या रुग्णसंख्येने काल दुपारी तीनशेचा टप्पा ओलांडला. दुपारी 593 अहवाल प्राप्‍त झाले. यापैकी 32 अहवाल पॉझिटिव्ह असल्याने रुग्णसंख्या 318 वर गेली. रात्री यामध्ये आणखी 23 नव्या रुग्णांची भर पडली. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 341 पर्यंत वाढला. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत चालल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोल्हापूर शहरात आज आणखी चार रुग्णांची भर पडली. यापैकी तिघेजण एकाच कुटुंबातील आहेत. मूळचे सोलापूर येथील आणि सध्या कनाननगर आणि फुलेवाडी परिसरात राहणार्‍या सातजणांच्या कुटुंबीयांपैकी 65 वर्षीय वृद्ध, 54 वर्षीय महिला आणि 7 वर्षांच्या बालकाला कोरोनाची लागण झाली आहे. अन्य लोकांचे अहवाल अद्याप प्राप्‍त झालेले नाहीत.

बाधितांसह हे सर्वजण सोलापूरहून परतलेले आहेत. वृद्ध व महिला कनाननगर परिसराजवळ डफळे कंपाऊंड येथे राहतात,  तर सात वर्षीय बालक फुलेवाडी दुसरा बसस्टॉप जवळ राहतो. बाधितांना यापूर्वीच इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईन करण्यात आले आहे. यामुळे ते राहत असलेला परिसर प्रतिबंधित केला जाणार नसल्याने परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, बाधित रुग्ण आढळल्याने प्रशासनाच्या वतीने या परिसरात पाहणी करण्यात आली. 

फुलेवाडीत काही काळ भीतीचे वातावरण

कोल्हापूर शहरात विशेषत: फुलेवाडीत रुग्ण आढळल्याची माहिती वार्‍यासारखी शहरात पसरली. या परिसरात राहणार्‍या नातेवाईक, मित्रांना अनेकजण मोबाईलवर याबाबत माहिती विचारत होते. रुग्ण कोण, कुठे राहतो, याची सायंकाळपर्यंत नेमकी माहिती परिसरातील नागरिकांना नव्हती, त्यातच पोलिस वाहनांनी परिसरात पाहणी केल्याने या ठिकाणी काही काळ नागरिकांत भीतीचे वातावरण होते. बाधित रुग्ण घराकडे आलेलाच नसल्याचे स्पष्ट होताच, सर्वांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला.