Wed, Jun 19, 2019 08:32होमपेज › Kasturi › गौरीपूजनातील आरोग्यदायी पत्री

गौरीपूजनातील आरोग्यदायी पत्री

Published On: Sep 13 2018 1:54AM | Last Updated: Sep 12 2018 8:22PMअपर्णा देवकर

गौरीच्या पूजेत विविध झाडांची पत्री वाहिली जाते. या पानांचे आरोग्याच्या द‍ृष्टीने खूप महत्त्व असते. समृद्धी आणि आरोग्य देणार्‍या गौरीचे थाटामाटात स्वागत करताना या गोष्टीचाही विचार करायला हवा. 

भाद्रपद महिन्यात घराघरात गणपतीची स्थापना होते. त्याचबरोबर माता पार्वतीची अर्थात गौरीचीही  स्थापना केली जाते. गणपती बसल्यानंतर साधारण तीन दिवसांनी गौरीचे आगमन होते. 

घरात येणार्‍या गौरीचे मोठ्या आनंदाने आणि वाजत-गाजत स्वागत  केले जाते. काहींकडे खड्याच्या गौरी असतात तर काहींकडे तेरड्याच्या रोपांचा मुखवटा बनवला जातो. काहींकडे उभ्या गौरी असतात. त्यांना सुबक, आकर्षक पितळाचे, शाडूचे, कापडाचे असे विविध मुखवटे लावले जातात. त्यांना साडी नेसवून, दागिने घालून सजवले जाते. त्यांच्याभोवती आकर्षक आरास केली जाते. भाद्रपद महिन्यात अनुराधा नक्षत्रावर येणारी गौरी ज्येष्ठा व कनिष्ठा म्हणूनही ओळखली जाते. 

गौरीची पूजा करताना तिला विविध पत्री वाहिली जाते. या पत्रीचे आयुर्वेदाच्या द‍ृष्टीने खूप महत्त्व आहे. पत्रीमध्ये साधारणपणे जाईपत्र, गोकर्ण, मरूपत्र, हादगा, मोगरा, दुर्वा अशा पानांचा समावेश असतो. या प्रत्येक झाडाच्या पानामध्ये औषधी गुणधर्म आहेत. जाईच्या पानांच्या काढा ताप आला असता देतात, तोंड आल्यावर जाईची पाने चावून खातात. जखम भरण्यासाठी या पाल्याचा लेप लावतात. तसेच कृमी विकार, दातांचे विकार, रक्‍तदोष, डोळ्यांचे आजार या आजारांवर गुणकारी ठरणार्‍या औषधी रसात व तेलामध्ये जाईच्या पानांचा वापर केला जातो.  पांढरी गोकर्ण तिखट, कडू, शीत, बुद्धी देणारी, डोळ्यांना हितकारक, विषनाशक, सूज, वेदना व कृमी नष्ट करणारी असते. निळी गोकर्ण कडू, स्निग्ध  असते. दमा, कफ, कृमी, त्वचाविकार, आमवात कमी करणारी असते. तसेच टॉन्सिल्स वाढल्यानंतर येणारा ताप, कान दुखणे, गर्भपात यातही गोकर्णाचा खूप फायदा होत असतो.

मरवा ही अतिशय सुगंधी अशी वेल असते. चवीला गोड-तुरट असून वात, कफ-पित्त दोष कमी करणारी असते. चक्‍कर येणे, हृदयरोग यावर गुणकारी आहे. याच्या पानांचा चहा पिल्यास खूप घाम येतो म्हणून सर्दीसाठी याचा उपयोग होतो. कानातून स्राव येत असल्यास मरव्याच्या पानांचा रस गुणकारी ठरतो. पोटदुखीसाठी वाळलेल्या पानांनी पोट शेकल्यास फायदा होतो. मासिकपाळी नियमित येण्यासाठी मरव्याचा काढा घेतला जातो. 

हादगा ही वनस्पती शारीरिक दुर्बलता, ताप येणे, नाक वाहणे यासारख्या आजारांवर गुणकारी ठरते. अर्धशिशीवर डोकेदुखीच्या दुसर्‍या बाजूस हादग्याच्या पानांचा रस सोडतात. सांधेदुखी असल्यास त्यावर पानांचा लेप लावतात. जखमेवर हा लेप लावला तर जखम लवकर भरते. लहान मुलांच्या पोटाच्या तक्रारीवर पानांचा रस गुणकारी ठरतो.

मोगरा हे सर्वत्र आढळणारे झाड. मोहक फुले व उष्ण, तिखट अशी याची पत्री असते. डोळ्यांच्या विकारांवर, त्वचाविकारांवर या पानांचा रस किंवा सिद्ध तेल गुणकारी ठरते. अशा प्रकारे पत्रींचा अनेक प्रकारे औषधी उपयोग होतो. यावेळी आपण कापूराची आरती करतो. कापूर जाळल्याने हवेतील जीवजंतू मरतात. वातावरण शुद्धी होते. अशा प्रकारे गौरी पूजन हे आनंदाचे, आपुलकीचे, समृद्धीचे आणि आरोग्याचे प्रतीक आहे. घराघरात स्थापन होणारी गौरी आपल्या भक्‍तांना सुख समाधानासोबतच आरोग्यही प्रदान करणारी असते.