Fri, Jun 05, 2020 01:58होमपेज › Kasturi › मन की बात : अस्सा शेजार सुरेख बाई

मन की बात : अस्सा शेजार सुरेख बाई

Published On: May 16 2019 2:00AM | Last Updated: May 16 2019 2:00AM
स्नेहल अवचट

अन्न, वस्त्र व निवारा या मनुष्याच्या प्राथमिक गरजा आहेत. निवारा म्हणजे  संरक्षण. शत्रू, नैसर्गिक आपत्ती यापासून बचाव यासाठी एक सुरक्षित कवच. मग भले ती कोणाची झोपडी असेल किंवा महाल असेल. स्वतःच्या घरात सुखाची झोप लागणे यासारखे सुख नसते.

माणूस हा समाजशील प्राणी आहे. आपले पूर्वजदेखील कळपाने राहणेच पसंद करत. एकमेकांची मदत, काळजी यासाठी हा एकोपा माणसाला कायमच आवडतो. पुढे घर संस्कृती आल्यावर आपल्या हाकेला कोणीतरी ओ द्यावी, मदतीला धावून यावे यासाठी माणसाच्या शेजार्‍याचा जन्म झाला. सहवासाचे प्रेम वाढून घासातील घासाची देवाण-घेवाण, संकटात धावून मदत करणे हे शेजारधर्म वाढीला लागून परस्पर प्रेमाची देवाण-घेवाण सुरू झाली.

आपला भारत व महाराष्ट्रातील कित्येक शहरांची ओळख वाड्याच्या देखण्या वास्तूमुळे प्रसिद्ध आहे. मला वाटते, वाडा संस्कृतीतील घरगुतीपणा व एकोप्याचा अनुभव घेणारी आपली पिढी शेवटची असावी. मे महिन्याची सुट्टी म्हणजे सर्व स्तरांवर वार्षिक कामांचा सांघिक फडशा पाडणे असाच होता. प्रत्येक घरातील पदार्थाची चव ही सर्वांसाठीच असायची. उसने पासने, देणेघेणे सर्रास चालायचे. तेसुद्धा कोणताही कमीपणा न येता.

सार्वजनिक हळदी कुंकू,भोंडला, दिवाळीचा फराळ करणे आणि खाणे, उन्हाळी कामे, लग्नकार्याची खरेदी व तयारी, गणपती गौरीची सजावट, कोजागिरीच्या चांदण्यात केशर दुधाचा पेला यासाठी सब दरवाजे खुले असायचे. कोणीही कोणाकडेही जाऊन तोंडभर कौतुक करून खाऊन यायचे. येणारे पाहुणेरावळे पण मोकळेपणाने  शेजारच्या घरात ये-जा करत. बच्चे कंपनी तर जणू वानरसेना, सगळ्यात बरोबर. रात्रीच्या चांदण्यात अंगणातल्या गप्पा, भुतांच्या गोष्टी, गाण्याचा भेंड्या, तर दुपारी व्यापार, पत्ते यांना ऊत यायचा.  अंगत पंगत, यामध्ये गोपाळकाला असायचा. नुसत्या नावालाच भिंती असायच्या पण मनात मात्र कोणतेही आडपडदे नसायचे. सुखदुःखात कायमच भागीदारी असायची. कारण त्या वादात पण संवादच जास्त होता.

खूप सारे औद्योगिकीकरण व शहरीकरण यामध्ये वाडा संस्कृती इतिहासजमा झाली. त्यातून आधुनिक सुविधा असलेली फ्लॅट संस्कृती उदयास आली. पण जरी घरे बदलली तरी माणुसकी तशीच होती. ती फक्‍त कॉमन वाड्यातून स्वतंत्र फ्लॅटमध्ये आली. त्यामुळे दारावरची बेल ही सदैव अलार्मरिंगच राहिली आहे. काही टोलेजंग अत्याधुनिक कॉम्प्लेक्समध्ये मात्र घर व मनाचे दरवाजे फार उघडे राहत नाहीत एवढे मात्र अगदी खरे. इअरली पॅकेजद्वारे सर्व गोष्टीत बरोबरी, योग्यता मोजली जाते.

पण काही अपवाद सोडता आपण जिथे राहतो तिथे कोणीतरी शेजार, सोबत ही असतेच. मानसिक सोबत देणारे व प्रत्येक सुख दु:खात सहभागी असणारे, अडीअडचणीला धावून जाणारे कोणी आपटे, जोशी, देशपांडे, ठोंबरे, रानडे,भोसले, राजश्री, सुजाता, हे आमच्या  आयुष्यात कायमच आहेत. घरात केलेल्या ताजा पदार्थांची देवाणघेवाण अजूनही आमच्यात आठवणीने चालूच आहे. प्रत्येकाचे वाढदिवस लक्षात ठेवणार्‍या  व माझा आवाज व चेहेरा यावरून  काहीतरी प्रॉब्लेम आहे हे आईचा मायेने ओळखणार्‍या आमच्या आपटे काकू व काका ग्रेट आहेत.

माझी मुलगी श्रिया चालायला लागली तेव्हा पहिले घर त्यांचेच गाठले होते. रोज सकाळी काकूंच्या नाश्त्यातील गरम वरण-भाताचे दोन घास  श्रियाचे असायचे. सर्वांच्या घराचा  ताबा विश्वासाने  सांभाळायचे काम आम्ही नेटके करतो. सर्व मुले लहान असताना कोणी मोठे रागावले तर आम्हाला राग नसायचा. कुटुंबातील आजारपण, धावपळ, संकटसमयी याच लोकांचा आश्वासक हात पाठीवर असतो त्यामुळे लढाईला बळ मिळते. शेजार जसा मला हवा तसाच शेम टू शेम त्यालाही हवा असतो. दोन्ही हाताने टाळी वाजते, त्यामुळेच सहजीवन व माणुसकी जपण्याचे तत्त्व सहजपणे जगण्याचा मार्ग शिकवून जातात. धावपळीच्या जीवनात या सुंदर नात्याला  फुलवून बहराने जगवू, नात्यातील प्रेम, आदर, आधार, जिव्हाळा यातूनच या ऋणानुबंधाचा गाठी जपल्या जातील. शेजारी शेजारी आम्ही सख्खे शेजारी.