होमपेज › Kasturi › ‘श्रीदेवी हिटस्’ गाण्यांनी कस्तुरी मंत्रमुग्ध

‘श्रीदेवी हिटस्’ गाण्यांनी कस्तुरी मंत्रमुग्ध

Published On: May 01 2018 1:21AM | Last Updated: May 01 2018 1:21AMसातारा : प्रतिनिधी

‘मेरे हाथे में नौ नौ चुडियाँ है, जरा ठहरो सजन मजबुरियॉ है...’, ‘बिजली गिराने मैं हूँ आयी, कहते है मुझको हवाहवाई’ अशा अभिनेत्री श्रीदेवी यांच्यावरील एकसे बढकर एक श्रीदेवी हिटस् बहारदार गाण्यांनी दै. ‘पुढारी’च्या कस्तुरी क्लबच्या सदस्यांना मंत्रमुग्ध केले. हिंदी व मराठी गाण्यांच्या या बहारदार कार्यक्रमाने उपस्थित कस्तुरी भारावून गेल्या. दरम्यान, यावेळी घेण्यात आलेल्या दुग्धजन्य पदार्थांच्या पाककृती स्पर्धांना महिला व युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

दै. ‘पुढारी’च्या कस्तुरी क्लबच्या सदस्या महिलांसाठी येथील गजानन मंगल कार्यालय येथे बुधवारी वैशाली चंद्रसाळी थ्री स्टार्स ग्रुपच्या ‘श्रीदेवी हिटस्’ गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाने या कार्यक्रमाची रंगत उत्तरोत्तर वाढत गेली.  कार्यक्रमाचा प्रारंभ मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलनाने झाला. यावेळी  निसर्ग दूधचे राजकिरण जाधव,  बरडकर, राजेंद्र घुले, सुवर्णा राजे, सौ. अर्चना जाधव, कस्तुरी सल्लागार समिती सदस्या यांची प्रमुख उपस्थिती होती.

गणेशस्तवनाने  श्रीदेवी हिटस्चा प्रारंभ झाला.  वैशाली चंद्रसाली थ्री स्टार्स ग्रुपच्या  सदस्यांनी  एकसे बढकर एक हिंदी व मराठी गाणी सादर केली.  अभिनेत्री श्रीदेवी यांची गाजलेली गाणी या कार्यक्रमातून गायकांनी पेश केली. जणू काही त्यांनी श्रीदेवी यांना शब्द सूरांची आदरांजली वाहिली. वैशाली चंद्रसाली यांनी गायलेल्या ‘ए समा, समा... समा है प्यार का, किसी के इंतजार का, मिल ना सके...’, ‘तेरे मेरे ओठोंपे  मीठे मीठे गीत मीतवा..’, ‘सात समुंदर पार मैं तेरे पीछे पीछे आ गई...’, ‘रुपेरी वाळूत माडांच्या बना ये ना ...’, ‘अलगुज वाजं नभात भलतचं झालयं आज..’ ‘सैराट झालं जी..,  अधीर मनं झाले,’ ‘मधुर घनं आले...,  राजा ललकारी’ अशी मंत्रमुग्ध करणारी विविध गाणी सादर करताच उपस्थित कस्तुरींनीही ताल धरला. महिलांनी धरलेला ठेका कार्यक्रमाची रंगत वाढवत गेला.  कार्यक्रमाचे  प्रायोजक  फलटण येथील निसर्ग उद्योग समूह तर गिफ्टींग प्रायोजक पद्मनाभ अलंकार, कणक  ब्युटीपार्लर, निशा बुटिक, चाटे कोचिंग क्लासेस, सोमेश्‍वर शैक्षणिक सामाजिक संस्था हे होते.

निसर्ग दूधचे राजकिरण जाधव  यांनी निसर्ग दुधाबाबत माहिती दिली. ते म्हणाले, प्‍लास्टिक पिशवीतील भेसळयुक्त दूधव्दारे विविध आजारांचे संक्रमण शहरी नागरिकांमध्ये होत आहे. या संक्रमणावर आरोग्यवर्धक निसर्ग सेंद्रिय दूध उत्तम पर्याय असून या दूधाची पौष्टिकता, सकसता वाढवणे, दूधासाठी केल्या जाणार्‍या मुक्त संचार गोठा पध्दती, चारा निर्मितीपासून दूध संकलनापर्यंत घेतली जाणारी काळजी याबाबत माहिती दिली.  पूर्णत: सेंद्रिय चार्‍यावर पालन पोषण होणार्‍या गीर गाईंपासून मिळत असलेल्या या दूधाचे  आरोग्यासाठी  दीर्घकालीन फायदे होतात. निसर्ग सेंद्रिय दूध पुण्यासारख्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर वितरण होत असून लवकरच सातारा शहरातही विक्रीसाठी  उपलब्ध होणार असल्याचेही राजकिरण जाधव यांनी सांगितले.

चाटे कोचिंग क्लासेसविषयी बोलताना राजेंद्र घुले म्हणाले,  सातारा शहरात नवीन शैक्षणिक वर्षात सदर बझार येथे सुरु होत असलेल्या चाटे स्कूलमधून हुशार, कुशल व  विद्वत्तापूर्ण  विद्यार्थी घडवून शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या बौध्दिकतेच्या माध्यमातून चाटे स्कूल शैक्षणिक क्षेत्रात आपला ठसा उमटवेल,असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. सूत्रसंचालन तेजस्विनी बोराटे यांनी केले.