होमपेज › Kasturi › मन की बात : भागम्भाग

मन की बात : भागम्भाग

Published On: Jun 13 2019 1:28AM | Last Updated: Jun 12 2019 8:05PM
स्नेहल अवचट

माणसाच्या आयुष्यात चवीला फार महत्त्व असते.  प्रत्येक पदार्थाची चव, रंग, वास आपआपले काम चोख बजावत असतात. त्यात थोडे जरी कमीजास्त झाले की पदार्थाचा खेळखंडोबा हा ठरलेलाच. तसेच आपल्या आयुष्यात भावभावना, नाती, प्रेम या गोष्टी एकीकडे तर, त्या विरोधात पैसा एकटाच आपले अस्तित्व दाखवतच असतो. पैसा म्हणजे जणू कोणाला मिठासारखा गरजेचा वाटतो पण जरूरीपेक्षा जास्त झाला तर आयुष्य खारट करून जातो. तर कोणाला अगदी स्वीट डिशच! गोड, पण प्रमाणात असलेलेच बरे असते नाही? नाहीतर मधुमेह जसे शरीर पोखरतो तशीच पैशाची  अती  हाव, लोभ पण आयुष्य पोखरायला कारणीभूत ठरते.

     तर असा हा ‘मैं पैसा बोल रहा हूँ।’

 एन्‍रिक इब्सेन या नाटककाराने घोस्ट नावाचा त्याच नाटकात वाममार्गाने मिळवलेल्या पैशाने  तो कुटुंबप्रमुख त्याच्या परिवाराच्या र्‍हासाला कसा कारणीभूत ठरतो हे सांगितले आहे. पैसा, आवक, ऐशोआराम यामुळे आपण अगदी यशाची शिखरे चढत आहोत असा पोकळ भास असतो. पण नंतर आयुष्यातील शारीरिक, मानसिक, भावनिक स्तरांवर हरल्याची जाणीव झाली की माणूस एकटा, एकाकी होऊन जातो. याचीच दुसरी बाजू आपल्याच वाल्या कोळ्याची गोष्ट... आनंदात सगळेजण बरोबर पण दुःखात मात्र तूच तुझा भागीदार... ये पैसा बोलता हैं। पण तरी त्याच्यामागे भागणे मात्र थांबत नाही.

 पूर्वी चलन अस्तित्वात नव्हते तेव्हा देवाणघेवाण स्वरूपात सर्व व्यवहार चालत. माणुसकी जपणे हाच परमधर्म होता. विसाव्या शतकाच्या शेवटी समाजाने कात टाकली. देशासाठी चांगले असे उद्योगांना पोषक वातावरण निर्माण झाले त्यामुळे आर्थिक सुबत्ता आली. त्यामुळे चंगळवाद वाढून पैसा म्हणजे परमेश्वर व पैसेवाले म्हणजे सर्वेसर्वा हा आभास निर्माण झाला.व्यक्‍तीचा पुरुषार्थ त्याच्या संपत्तीशी जोडला जाऊ लागला. जेवढा पैसा जास्त तितकी प्रतिष्ठा व दबदबा या समीकरणामुळे गर्व, अहंकार, बडेजाव याचा सुळसुळाट वाढला.

पैशाच्या मागे धावता धावता आपले मागे राहून गेले हेपण उशिरा कळते. तो कधीच सैतान नसतो; पण त्याच्या अती हव्यासापोटी लोक मात्र सैतान होतात. पण आयुष्याच्या संधिकाली तुम्ही केलेल्या सत्कर्माची पुंजीच तुमच्याबरोबर असते. 

  जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी।

 कारण गैरमार्गाने आलेल्या संपत्तीला गैरमार्गाचेच फुटणारे पाय खूप असतात.

कधीकधी मुबलक पैसा असतो पण आपले हक्काचे कोणीच नसते. पैशाच्या गुर्मीने माणसाला वाटते आपण सगळी सुखे विकत घेऊ शकतो. जोवर दाम असतो तोवर खुशामत करणारे पुढेपुढे असतात. पण ज्या क्षणी ही चंचल लक्ष्मी तुम्हाला बाय बाय करते तेव्हा पाय लावून पळणारेच खूप असतात. स्वतःची भूक, आरोग्य, शांत झोप, इमानदारी, बुद्धी, खुशी, आनंद, प्रेम व जिवाला जीव देणारी नाती पैशापुढे कधीच नमते घेत नाहीत, ही आयुष्याची शोकांतिका आहे. पैशाप्रती ज्याचे शुद्ध भाव असतात व पैसा हे आयुष्य नसून गरजा पूर्ण करण्याचे एक माध्यम आहे हे जो जाणतो तोच शांत, सुखी, समाधानी आयुष्य जगतो. पैशाकडे बघण्याचा प्रत्येकाचा अंदाज वेगळा. श्रीमंत लोकांना वाटते गरीब म्हणजे आळशी, कामचुकार तर गरिबाला सर्व श्रीमंत हे लोभी व लालची वाटतात. पण व्यक्‍ती तितक्या  प्रवृत्ती असतात. आमिर हो या गरीब, मनाने दिलदार  व दुसर्‍यासाठी सतत काहीतरी करण्याची धडपड, तळमळ असणारे बडे दिलवालेपण खूप असतात. काहीवेळा मोजूनमापून मिळणारी आवक असेल तरी समोरच्याला आनंदी ठेवण्यासाठी झटणारे खरे संतुष्ट असतात हे त्रिवार सत्य आहे. देण्यातील आनंद अपरंपार असतो. सामान्यातून  असामान्यता जपणे सोपे नसतेच.

आपला प्रसिद्ध गौतम गंभीर आपली सारी कमाई शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणासाठी देतो. अक्षय कुमार पण त्याच लायनीत. छत्तीसगडचा सुरेश आपल्या बाईकला अम्ब्युलन्स बनवून कित्येक येणारी  बाळे व त्यांच्या आयांना प्रसूतीपूर्व सेवा देतो. कोणी परिवार अपघाती गेलेले असताना प्रवाशांना पाणी देऊन तृप्त करून आपले दुःख विसरते. कोणी लालचंदजी पत्नीचे दागिने गहाण ठेवून नदीवर लाकडी पूल बांधून मुले व वयस्क यांसाठी आनंदाचा ठेवा होतात. पंजाबमधील बलबीर स्वकष्टाने कोणाच्याही मदतीची  अपेक्षा न ठेवता लोकांसाठी एकटाच नदी साफ करून खराखुरा हिरो होतो. नारायण कृष्णन पंचतारांकित हॉटेलची नोकरी सोडून गरीब आजार्‍यांना पोटभर खाऊ घालण्याचे लाखमोलाचे काम करतो. दिल्लीचे अनुप खन्ना नोयडात 5/- रु. नि कित्येक गरिबांना रोज पोटभर खाऊ घालतात. राजस्थानचे डॉ. आर.  पी. यादव आपला जीपीफ तोडून गावातील मुलींचे पायी चालणे वाचावे म्हणून बस खरेदी करतात.

  असे कित्येक करोडपती आपल्याच आजूबाजूला नुसतेच वावरत  नसतात तर, असे समाजव्रत अंगिकारून खरेखुरे जगत असतात. त्यांचा बँक बॅलन्स शून्य किंवा कमी असला तरी तेच खरे गर्भश्रीमंत, समाधानी व संतुष्ट असामी असतात.

   जिने के तरीके में पैसे का प्यार तो हो।
   पर लेने से ज्यादा देने में खुशी ज्यादा हो॥