Wed, Feb 26, 2020 17:28होमपेज › Kasturi › मन की बात : आगे ही आगे बढाना है कदम...

मन की बात : आगे ही आगे बढाना है कदम...

Last Updated: Jan 22 2020 9:43PM
मन की बात : आगे ही आगे बढाना है कदम...
स्नेहल अवचट

माणसाचे आयुष्य हे सतत बदलते व प्रवाही असते. जर ते ठप्प झाले तर सगळीकडे नुसता हाहाकार माजेल. कारण आहे त्या परिस्थितीत काहीतरी प्रगती, बदल हा हवाच! आपण लहानाचे मोठे झालो, लग्न झाले व मूल होऊन आपल्याला आई-वडील झाल्याची जणू बढती किंवा उच्च पद मिळाल्याचे सुख मिळते. त्याचप्रमाणे नवीन नाती जोडताना पण सासर-माहेरच्या दोन्ही घरांत नात्यांच्या बाबतीतपण तेच होते. प्रत्येक गोष्टीतील  वयाच्या व नात्यांच्या बढतीची परिमाणे मात्र वेगवेगळी असतात. याच  सर्वबाबतीत पावले उलटी पडून पाय उतारपण होऊ शकतात.

रांगते लहान बाळ जेव्हा पहिले पाऊल टाकते ती जणू त्याची यशाची पहिली पायरी असते नाही! त्याची प्रत्येक टप्प्यावरील शैक्षणिक, मानसिक व भावनिक प्रगती ही खूप सुखावणारी असते. पण फक्त आई वडिलांनी खोटा अहंकार व बडेजाव यासाठी त्याच्याकडून अवास्तव अपेक्षा केल्या नाहीत तरच तुलना, स्पर्धा, कुरघोडी, अविश्वास यापायी हातातोंडाशी आलेली मुले आपल्यापासून दुरावतात किंवा नको ते मार्ग वापरतात व नात्यात प्रेमाची घसरण होते. आई-वडिलांनी व मुलांनी मिळून मिसळून सामंजस्याने चर्चा व मतांचा आदर करत घेतलेले निर्णय नात्यांना बढती मिळून कायमच जिंदगी के साथ असतात हेही तितकेच खरे.

नवीन सून घरात आल्यावर लवावे आणि लवून घ्यावे हा नियम तिने व सगळ्यांनीच पाळला, तर घराचे घरपण नक्कीच टिकून राहते. नवीन येणार्‍या बाळाची चाहुल ही नवीन पिढीला आई-बाबा व आधीच्या पिढीला आजी-आजोबांची बढती देऊन एक चक्र पूर्ण करते.

छोटे राग, भांडणे, गैरसमज, रुसवे, पैसा, संपत्ती,  माघार न घेण्याचा हट्ट यामुळे चढती कमान असलेली नाती खाली येऊन कायमची तुटण्याच्या मार्गावर येतात.   सारासार विचार न करणे, दूरदर्शीपणाचा अभाव यामुळे होत्याचे नव्हते होऊन चालत्या गाडीला जणू खीळ पडते. माघार, मध्य याचा विचार न करता मनमानी निर्णय घेऊन, दादागिरी, हमरीतुमरी, दुसर्‍यांचे नुकसान करण्यात कमालीची फुशारकी वाटते. आपल्या भारताची व राज्याची सद्य:स्थिती अशीच आहे... ना तुला ना मला. 

इतक्या प्रतिकूल परिस्थितीचे कारण म्हणजे  आपल्या देशाला लागलेली अजून एक कीड म्हणजे बढ़ती आबादी! जी खरोखर धोकादायक स्थितीवर आहे. खाणारी तोंडे जास्त, त्यामुळे सगळीकडेच ओव्हर-फ्लो असेच चित्र. शाळेची अ‍ॅडमिशन मिळणे म्हणजे एक रेस जिंकली. मग परीक्षा, मार्क, गुणवत्ता, डिग्री, आरक्षण  या रँट रेसमधूनपण चांगली नोकरी मिळेलच याची खात्री नसतेच. पण ती मिळाली तरच मग चक्र पूर्ण करण्यासाठी छोकरी मिळण्याची शक्यता असते.

नोकरी मिळाली तरी तिथल्या राजकारणाला प्रत्येकाला तोंड हे द्यावे लागतेच. सरकारी नोकरी असेल तर नियमानुसार मिळणार्‍या सवलती या काम करणार्‍याला मिळतात, तशाच न करणार्‍यालापण मिळून जातात. सरकारी जावई योग्य पाहुणचार घेऊनच मग शेवटी आपला पदभार त्यागतात. पण जर तुम्ही  खासगी नोकरीत असाल तर पुढे पुढे करणारे बर्‍याचदा पुढे जात राहतात. तुमची पगारवाढ हीच जणू तुम्ही केलेल्या कामाची पावती असते. कोणाच्या गुणांचे, कष्टाचे कधीतरी चीज होतही असते. तर कुठे मन लावून काम करणार्‍याला मात्र मनस्ताप, मानहानी, कारण नसताना डोळ्यावर धरणे, नाकारणे या गोष्टींनापण तोंड द्यावे लागते. मानसिक खच्चीकरण, क्लेश, दुःख, स्वतःचे वैयक्तिक प्रश्न हे विसरूनदेखील एखादा मनापासून जीव ओतून आपले सहकारी व क्लाएंट यांच्याशी हितसंबंध जोपासत काम करत असतो. पण  सततची नकारघंटा या सगळ्यांमुळे त्याचे मानसिक आरोग्य मात्र धोक्यात येऊ शकते. आपल्या कामाची पूर्णता ही द्रव्यरूपात असली तरी त्याची परिपूर्णता ही आपल्यामुळे समोरच्या चेहर्‍यावर फुललेले हसू, कोणाची छोटी शाबासकीची थाप व कामामुळे तयार झालेल्या मायेच्या हितसंबंधात गुंतलेली असते. सर्वच गोष्टींचे समाधान पैशात मोजून मिळत नाही.

या सगळ्या बढत्या या खरोखर त्रासदायक व फार समाधानकारक नाहीत, हे मात्र समजायला लागले; की जे आहे ते बरे, ही मनाची बढती आपल्याला जाणवू लागते.  जे दुखावतात त्यांना सोडून देणे (असेही आणि तसेही), संघर्ष व वाद घालणारे लय भारी व न बदलणारे याची समज येऊ लागते. वाईट, चुकीच्या गोष्टींना फार महत्त्व न देता आजूबाजूला जे जे उत्तम, उदात्त, उन्नत या गोष्टीत जीव रमवणे चालू होते. न पटणार्‍या गोष्टींवर नो कमेंट प्लीज, असे म्हणून लोकांवर किंवा त्यांच्या विचारांवर बंधने आणण्याची ऊरस्फोड करण्यापेक्षा स्वतःच्या मनावर बांध घालणे उत्तम. 

इतरांना कारण नसताना महत्त्व देत स्वतःचे आयुष्य दयनीय होण्यापेक्षा स्वतःच्या आनंदाचा ठेवा मन:शांती व समाधान उशिरा का होईना युरेकासारखा हाती लागून आपले स्थिर मन जणू त्या वाटेवरची एकएक पायरी वर चढत आहेत, याची जाणीव होऊन स्वानंदाची अनुभूती मिळते...

हर घड़ी बदल रही हैं रूप जिंदगी
छाँव हैं कभी कभी हैं धूप जिंदगी
हर पल यहाँ जी भर जियो 
जो हैं समा, कल हो ना हो...