Thu, Apr 25, 2019 11:15होमपेज › Kasturi › पावसाळ्यातील ‘मस्ट हॅव’

पावसाळ्यातील ‘मस्ट हॅव’

Published On: Aug 09 2018 1:39AM | Last Updated: Aug 09 2018 1:39AMपावसाळ्यात त्वचेची काळजी घेण्याच्या पद्धती बदलतात तसाच बदल आपल्या सौंदर्य प्रसाधनांमध्येही करायला हवा. त्याद्वारे पावसाळ्यात दमटपणा आणि वातावरणातील बदलांचा योग्य सामना करू शकाल. थोडक्यात आपल्या त्वचेची देखभाल करण्याच्या पद्धती आणि पावसाळ्यात काही गोष्टी आपल्या बँगमध्ये आवश्य बाळगाव्यात. पावसाळ्यात त्वचेची योग्य देखभाल करण्यासाठी कोणत्या सौंदर्य प्रसाधनांचा वापर करता येऊ शकेल, ते पाहूया -

बीबी क्रीम : पावसाळ्यात बीबी क्रीमचा वापर करावा. कारण बीबी क्रीम वॉटरप्रूफ असते अर्थात पाण्याचा, घामाचा काही परिणाम होत नाही. त्यात एसपीएफ हा घटकही असतो, ज्यामुळे सूर्याच्या हानीकारक अतिनील किरणांपासून बचाव होते. त्यामुळे खूप काळ बाहेर जात असाल तर फाऊंडेशनऐवजी बीबी क्रीमचा वापर करणे योग्य ठरते. 

क्लिंजर्स : पावसाळ्यात पर्समध्ये क्लिंजर आवश्य ठेवावे. क्लिंजर्समुळे त्वचेवरून धूळ आणि घाण दूर होते. तसेच त्वचा आरोग्यपूर्ण राहते. 

टोनर : सौंदर्य प्रसाधनांमध्ये ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्वचेची नैसर्गिक चमक टोनरमुळे कायम राहते. अल्कोहोल मिश्रित टोनर वापरायचे नसतील तर गुलाब पाण्याचा वापर केलेले टोनर वापरावे. टोनरमुळे त्वचा नेहमीच ताजीतवानी आणि टवटवीत राहते. 

लिप बाम : पावसाळ्यात ओठ दुंभगतात, फाटतात; कारण वातावरणात दमटपणा आणि उष्णता दोन्ही असतेच. त्याचा परिणाम त्वचेबरोबरच ओठांवरही दिसून येतो. ओठ सुरकुतात देखील. ओठ मुलायम आणि कोमल होण्यासाठी लिप बामचा नियमित वापर करावा. मॉन्सूनच्या दिवसांमध्ये एसपीएफ असलेले लिप बाम वापरावे. 

ऑईल अ‍ॅबसॉर्बिंग शीटस् : चेहर्‍यावरील अतिरिक्‍त तेल टिपून घेण्यासाठी ऑईल अ‍ॅबसॉर्बिंग शीटस्चा केला जातो अर्थात फक्‍त तेलकट त्वचा असणार्‍यांनीच याचा वापर करायचा असतो असे नसून त्याचा वापर कोणीही करू शकते. काहींना कपाळ, नाक हनुवटी हा भाग तेलकट वाटतो. त्यावेळी वाईप्सचा वापर करून अतिरिक्‍त तेल पुसून घ्यावे. हे शीटस किंवा फेस वाईप्स बाजारात उपलब्ध आहेत. त्याचा वापर करून त्वचा टवटवीत आणि चांगली राहते.

कंगवा किंवा ब्रश-  पावसाळ्यात भिजल्याने केस ओले होतात त्यावेळी केस गुंतू नयेत म्हणून कंगव्याचा किंवा ब्रशचा वापर करावा लागतो. कंगव्याच्या मदतीने आपण केस विंचरून ते नीट ठेवू शकतो. 

क्रीम किंवा लोशन - पावसाळ्यात क्रीम किंवा बॉडी लोशन लावणे खूप गरजेचे असते. कारण असे केल्याने त्वचा कोरडी पडत नाही. अगदीच क्रीम नाही, तरी पेट्रोलियम जेलीतरी आपल्या बँगेत असली पाहिजे. त्वचा कोरडी शुष्क वाटत असेल तर पेट्रोलियम जेली लावावी. रसायनांचा वापर केलेल्या क्रीमपेक्षा नैसर्गिक क्रीमचा वापर केला पाहिजे. पावसाळ्यामध्ये याचा जरूर उपयोग केला पाहिजे. 

वॉटरप्रूफ आयलायनर : पावसाळ्यात आयलायनर लावताना ते वॉटरप्रूफ आहे ना याकडे जरूर लक्ष द्या. वॉटरप्रूफ आयलायनरचा वापर करून मेकअप अधिक टिकू शकतो.

परफ्यूम : पावसाळ्यात घाम येत नसला तरीही परफ्यूम बँगमध्ये असणे ही गरज आहे. परफ्यूमच्या सुगंधामुळे ताजेतवाने वाटू लागते. पावसाळ्यात भिजल्याने कपड्यांना एक विशिष्ट प्रकारचा घाणेरडा वास येतो. अशा वेळीही परफ्यूम कामी येऊ शकतो.  

बेबी पावडर :  काही जणींना पावसाळ्यातही अधिक घाम येतो त्यांनी बेबी पावडरचा वापर करावा. त्यामुळे ताजेतवाने वाटते. बेबी पावडरचा उपयोग डोक्याच्या त्वचेसाठी करता येतो.  घामामुळे डोक्याला येणारी खाज यामुळे कमी होते.  

मेघना ठक्‍कर