Sun, Jun 07, 2020 01:49होमपेज › Kasturi › आर्थिक आखणी कशी कराल ?

आर्थिक आखणी कशी कराल ?

Published On: May 16 2019 2:00AM | Last Updated: May 15 2019 8:51PM
अवंती कारखानीस

सामान्यत: असे आढळते की, महिला आर्थिक नियोजन या विषयाचा फारसा विचार करत नाहीत. ‘ते आपले काम नाही’ किंवा ‘ते आपल्याला कसे जमेल?’ असे आपल्यातल्या काहीजणींना वाटत असते. पण खरेतर तसे नाही. बचत आणि गुंतवणुकीची दिशा एकदा उमगली की, ते साध्य करणे ही फारशी अवघड गोष्ट राहत नाही. त्यासंदर्भात मार्गदर्शन करणारा हा लेख.

आपल्या जीवनातल्या विविध टप्प्यांवर बदलत्या गरजांना यशस्वीपणे सामोरे जाण्यासाठी आर्थिक पाठबळाची सर्वांनाच गरज भासते. ही गरज आपण कशी भागवतो हे आपल्या आर्थिक नियोजनाच्या कौशल्यावर अवलंबून असते. आर्थिक नियोजनात प्रामुख्याने आणि सर्वसामान्यत: बचत आणि गुंतवणुकीचा विचार आपल्याकडे प्राधान्याने केला जाताना दिसतो. सेव्हिंग किंवा बचतीसाठी विशिष्ट असा फॉर्म्युला नाही. पण साधारण कमीत कमी 10 टक्के तरी सेव्हिंग असायलाच हवे, असे तज्ज्ञ सुचवतात. दरमहा ठरावीक रक्कम आपण बँकेत किंवा घरी सुरक्षित ठेवावी जेणेकरून कधीही गरजेनुसार ती काढता/वापरता येऊ शकते. विशिष्ट रकमेचे रिकरिंग चालू करणेही सोयीचे ठरते. आपण बचत केलेल्या रकमेच्या रिटर्न्सबद्दल मात्र आजिबात विचार करू नये. ही शुद्ध साठवणूक आहे. आर्थिक गुंतवणुकीचा विचार मात्र परताव्याचा मुद्दा मनाशी ठेवूनच करायला हवा. प्रत्येकाचे आर्थिक नियोजन हे प्रामुख्याने वय, उत्पन्न, उद्दिष्टे, जोखीम घेण्याची क्षमता, अपेक्षित रिटर्न, उपलब्ध शिल्लक या बाबींवर अवलंबून असते. आपण आर्थिक नियोजन जितक्या लवकर करू तितका गुंतवणुकीसाठी जास्त कालावधी मिळत असल्याने कमी गुंतवणूक करून, उद्दिष्टपूर्तीसाठीची तरतूद करणे सोपे होते. नियोजनास उशीर झाल्याने बर्‍याचदा अपुर्‍या कालावधीमुळे उद्दिष्टपूर्तीसाठीची पुरेशी तरतूद करणे शक्य होत नाही. 

सर्वप्रथम जेव्हा कधीही आर्थिक विषय सुरू होतो तेव्हा हल्लीच्या काळात मुद्दा येतो तो गुंतवणुकीचा. गुंतवणूक कुठे आणि कशी करावी, हा प्रश्‍न यासंदर्भाने कळीचा ठरतो. त्याबाबतीत विचार करताना सर्वप्रथम उत्पन्न व खर्च यांचा विचार करून उपलब्ध शिल्लक किती असेल याचा अंदाज घ्यावा. त्यानंतर आपल्या नजीकच्या काळातील व दीर्घकालीन उद्दिष्टे/गरजा निश्चित कराव्यात. आणि त्यानंतर पुढील गोष्टी ध्यानात घेत आर्थिक आखणी आवश्यक आहे. आपली आर्थिक क्षमता, उद्दिष्टे, कौटुंबिक जबाबदार्‍या विचारात घेऊन त्यानुसार जोखीम घ्यावी. गुंतवणुकीची सुरुवात शक्य तितकी लवकर करावी व त्यात सातत्य राहील असे पहावे. सुरुवातीच्या काळात जोखीम समजून घेऊन गुंतवणूक करून जास्तीत जास्त रिटर्न मिळवावा; मात्र वाढत्या वयानुसार जोखीम असलेली गुंतवणूक कमी करत जावी. आपल्या गुंतवणुकीचा ठरावीक कालावधीनंतर आढावा (रिव्ह्यू) घ्यावा व त्यात योग्य ते बदल करावेत. गुंतवणुकीतील शेअर्स व म्युच्युअल फंड, युलिप यांचे प्रमाण 50 टक्क्यांपेक्षा जास्त असणार नाही तसेच सोने/चांदी यांतील गुंतवणूक एकूण गुंतवणुकीच्या 10 टक्क्यांपेक्षा जास्त होणार नाही, असे पहावे. रिअल इस्टेटमधील गुंतवणूक विचारपूर्वक व कमीत कमी कर्ज घेऊन करावी. कारण यातून मिळणारे भाड्याचे उत्पन्न कर्जाच्या हप्त्यापेक्षा बरेच कमी असते. अर्थात दीर्घकालीन द‍ृष्टीने अशी गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. अचानक मिळालेल्या रकमेतून जास्त व्याज असलेल्या कर्जाची परतफेड करण्याचा प्रयत्न करावा. क्रेडिट कार्डचा योग्य वापर करावा. अन्यथा त्यातून कर्जबाजारी होण्याची शक्यता असते. शक्यतो डेबिट कार्डच वापरावे. दुसर्‍याचे ऐकून गुंतवणूक करण्यापूर्वी त्यातील जोखीम व बारकावे समजून घ्या. एमएलएम आणि 12-13 टक्क्यांपेक्षा जास्त व्याजाच्या  गुंतवणूक योजना यासारख्या प्रलोभनांना बळी पडू नका. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, गुंतवणूक केवळ आयकर वाचविण्यासाठी करू नये. अशा गुंतवणुकीतून दीर्घकालीन उद्दिष्ट पुरे होण्यासाठी पीपीएफ, एसआयपी असे पर्याय निवडावे आणि करनियोजन करावे. आपल्यापैकी अनेक व्यक्‍ती इन्शुरन्स पॉलिसी आयकर बचतीच्या उद्देशाने घेतात. अर्थात इन्शुरन्स पॉलिसी घेताना तो प्रमुख उद्देश ठेवू नये. विमा संरक्षण या प्रमुख उद्देशानेच ती घ्यावी. त्यातही कमीत कमी प्रीमियम देऊन जास्तीत जास्त विमा कव्हर मिळेल असे पहावे.

सेवानिवृत्तीसाठीची तरतूद करण्यास चालढकल करणे अडचणीत टाकणारे ठरू शकते. त्यामुळे शक्यतो अशी तरतूद सुरुवातीपासूनच करावी. यामुळे अगदी कमी गुंतवणुकीतून आवश्यक तो रिटायरमेंट निधी जमा होऊ शकतो. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, एनपीएस किंवा म्युच्युअल फंडाचा त्या द‍ृष्टीने प्राधान्याने विचार करावा. यात नियमित केलेल्या 20-25 वर्षे गुंतवणुकीमुळे भरपूर निधी सहज जमा होऊ शकतो. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड हे खातं किमान 15 वर्षांचं असतं. यामध्ये वार्षिक रु. 1.5 लाख बचत करता येते. कुठल्याही राष्ट्रीयीकृत बँकेत किंवा पोस्टात पीपीएफचे खाते उघडता येते. आणि हो, सेवानिवृत्तीनंतर बहुधा मेडिक्लेम सुविधा चालू राहत नाही. या काळात आजारपण व हॉस्पिटलायझेशन यांवरील खर्च वाढण्याची शक्यता जास्त असते. त्या द‍ृष्टीने सेवानिवृत्तीपूर्वीच मेडिक्लेम पॉलिसी घेणे योग्य ठरते.