Sun, Jun 07, 2020 12:39होमपेज › Kasturi › स्वयंपाक घरात शोधा शॅम्पू

स्वयंपाक घरात शोधा शॅम्पू

Last Updated: Mar 18 2020 7:50PM
मृणाल सावंत

शॅम्पू हा केसांसाठी उत्तम टॉनिक ठरतो. पण टी.व्ही.वरील जाहिरातींना बळी पडून शॅम्पूची निवड केली जाते. परिणामी केस गळणे, पांढरे होणे, कोंडा असणे या समस्या काही कमी होत नाहीत. पण आपल्याच स्वयंपाकघरात असे काही पदार्थ लपले आहेत, की त्यामुळे केसांना उत्तम टॉनिक मिळते. केस निरोगी आणि सिल्की होतात. तर शोधूया, असे काही पदार्थ आहेत ते..!  

तेलकट केसांसाठी घरच्याघरी काही साहित्य आणून शॅम्पू तयार करता येतो. दोन चमचे शिकेकाई पावडर, एक चमचा हिरव्या चण्याची पावडर, अर्धा चमचा मेथी पावडर एकत्र करून चांगले मिश्रण तयार करावे. केसांना लावायच्या आधी मिश्रणात अंड्याचा पांढरा बलक घालून तो केसांना शॅम्पूप्रमाणे लावावा. हा शॅम्पू केसांना लावल्यानंतर फेस येत नाही. पण केस स्वच्छ होतात. एक ग्लास रिठे, चार ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवावे. सकाळी हे पाण्यात कुस्करा व पाणी गाळून घ्या. या पाण्यात एक चमचा शिकेकाई पावडर मिसळून त्याने केस धुवा. केसांना चमक येईल. 

ग्लासभर पाण्यात एक मोठा चमचा लाल व्हिनेगर व चिमूटभर मीठ टाकून चांगले हलवा. या मिश्रणाने केसांच्या मुळांना हळुवार मसाज करा. एका तासाने केस धुऊन नंतर विंचरल्याने केस मऊ होतात.
कोरड्या केसांसाठीही घरात शॅम्पू करता येतो. एका ग्लासभर दुधात एक अंडे फेटून घ्या. मिश्रणात भरपूर फेस आल्यानंतर केसांना चांगल्या प्रकारे लावा. पाच मिनिटानंतर केस स्वच्छ धुवा. आठवड्यातून दोनवेळा हा प्रयोग नक्की करा. एका नारळाच्या दुधात दोन चमचे चण्याचे पीठ किंवा एक लहान चमचा शिकेकाई पावडर मिसळा. केस व केसांच्या मुळांना हे मिश्रण लावा. पाच मिनिटानंतर केस स्वच्छ धुवा. केस चमकदार आणि निरोगी होतील.

अशा प्रकारे केमिकलयुक्त शॅम्पूचा वापर टाळलाही जातो आणि घरातीलच काही घटकांमुळे केसांचे आरोग्यही जपता येते.