Thu, Nov 14, 2019 07:05होमपेज › Kasturi › स्वच्छ किचन, सुंदर किचन

स्वच्छ किचन, सुंदर किचन

Published On: Jul 11 2019 1:20AM | Last Updated: Jul 10 2019 8:51PM
 विधिषा देशपांडे  

आपल्या सार्‍या स्वयंपाकघराची, व्यवस्थितपणाची आणि स्वच्छतेची पारख किचन सिंकवरून होते. ते सिंक स्वच्छ ठेवणे खरे फार अवघड नसते. फक्त ते कसे स्वच्छ ठेवायचे हे जाणून घ्यायला हवे. अनेकदा असे आढळते की, घराच्या स्वच्छतेचा विचार करताना प्राधान्याने हॉलचा किंवा दर्शनी खोलीचा विचार अधिक केला जातो. तोही विचार व्हायलाच हवाच; पण त्याचबरोबरीने स्वयंपाकघराची स्वच्छता हाही कळीचा विषय आहे. अधिक बारकाव्यांनिशी किंबहुना अधिक बारकाईने स्वयंपाकघराची, तिथल्या सिंकची स्वच्छता केली जायला हवी. अनेक घरांमध्ये भांडी घासण्याच्या स्पंजनेच बेसिन किंवा सिंक घासले जाते. खरे तर तसे ते घासू नये. सिंक स्वच्छ घासण्यासाठी एक वेगळा स्पंज ठेवावा. एवढेच नाही तर भांडी घासणे, बेसिन घासणे, सिंक घासणे, गाडी पुसणे, घरातील फर्निचर पुसणे, ओटा पुसणे, काचा पुसणे यासाठी स्वतंत्रच स्पंज असावेत. एकच स्पंज सर्वांसाठी असे करू नये. पिण्याच्या पाण्याची भांडी घासण्यासाठी स्वतंत्र स्पंज तर असायलाच हवा. सिंकची खालची नळी साफ करत जावी. कचरा काढत जावा. नळ गळत असल्यास तो तत्काळ दुरुस्त करावा. कारण गळक्या नळामुळेही गंज वाढू शकतो. सिंकमध्ये खरकटे गोळा करू नये. खरकटे गोळा करण्यासाठी एक मोठी स्वतंत्र गाळणी ठेवावी. आणि तो कचरा ओल्या कचर्‍यातच टाकावा.

एक गोष्ट सिंकमधला चिकटपणा, तेलकटपणा जाण्यासाठी जाणीवपूर्वक करायला हवी, ती म्हणजे सिंक घासून झाल्यानंतर कोमट वा गरम पाण्याने स्वच्छ धुवावे. हे पाणी थोडावेळ तुंबू द्यावे. त्याने सिंकमधला ओशटपणा, तेलकटपणा निघून जातो. यासाठी आणखी एक करता येते. कुकर झाल्यानंतर त्यातील गरम पाणी थेट सिंकमध्ये ओतावे. त्यानेही चिकटपणा कमी होतो. बेकिंग सोड्याने घासले तर सिंक लवकर स्वच्छ होते. सिंकमधून येणारा वासही निघून जातो.

स्वयंपाकघरासाठी योग्य साधनसाहित्याची निवड करणे आणि त्याद्वारे आपले स्वच्छतेचे काम अधिक सुकर करणेही आवश्यक असते. वस्तू घेताना चांगली दिसली तरी ती तशीच चांगली दिसावी म्हणून नंतर कितपत काळजी घ्यावी लागते याचा विचार खरेदीच्या वेळीच करणे आवश्यक आहे. जी साधने स्वच्छ ठेवण्यास सोपी आहेत अशांची निवड करावी. उदाहरणार्थ - पितळी बादल्या, घंगाळ, पाण्याची भांडी, डबे ही अवजड असतात व लवकर डागाळतात. म्हणून त्याऐवजी शक्य असेल तेथे स्टील, हिंदालियम, अ‍ॅल्युमिनियम, प्लास्टिक यांचा वापर करावा. साध्या साबणाने किंवा पावडरने घासून ही भांडी स्वच्छ राहतात. लवकर डागळत नाहीत. त्यामुळे स्वच्छ ठेवणे सोपे जाते. याशिवाय स्वयंपाकघरातील लाकडी फळ्यांना शक्यतो ऑईलपेंट लावावा. त्यामुळे फळ्या स्वच्छ ठेवणे सोपे जाते. फळ्या सलग लावलेल्या असाव्या म्हणजे झुरळे होत नाहीत. जोडाच्या असल्यास त्यात लांबी भरून झुरळे न होण्याची काळजी घ्यावी. भिंतीमधील कपाटात विशेषतः स्वयंपाकघरात कडापा बसवावा. त्यामुळे कपाटे धुऊन स्वच्छ ठेवणे सोपे जाते.

टेबले, कपाटांचे दर्शनी भाग यांना सनमायका लावावा. ते शक्य नसेल तर रेक्झीन किंवा प्लास्टिकचे आच्छादन घालावे किंवा कापडी आच्छादने घालावी. ओटा, खोलीतील फरशा, मोरी यांना योग्य उतार असावा. त्यामुळे धुण्याचे काम सोपे होते व स्वच्छता ठेवणे सोईचे जाते.

स्वयंपाकघरातला ओटा अधिकाधिक स्वच्छ कसा ठेवायचा असा प्रश्‍न अनेकांना सतावत असतो. त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, किचनओटा रोजच्या रोज घासण्याची गरज नाही. आठवड्यातून दोनदा किंवा गरज पडेल तेव्हा तो व्यवस्थित घासावा, धुवावा. एरवी ओल्या कपड्याने पुसून घेतला तरी चालतो. स्वयंपाक करताना शक्यतो किचनओटा, टाईल्स कमीत कमी खराब होतील असे पहावे. किचनओटा, किचनओट्याभोवतालच्या टाईल्स हे साफ करण्यासाठी कधीही भांड्यांचा डिटर्जंट अर्थात साबण वापरू नये. अनेकदा वाळल्यावर साबणाची पावडर तशीच राहते व ती हाताला, कपड्याला, भांड्यांना लागते. त्याऐवजी वॉशिंग पावडरचा फेस करून अथवा लिक्वीड सोपने किचनओटा, किचनओट्याभोवतालच्या टाईल्स साफ कराव्यात.