Mon, Jan 20, 2020 09:52होमपेज › Kasturi › निसर्ग साज...

निसर्ग साज...

Published On: Sep 05 2019 1:45AM | Last Updated: Sep 04 2019 8:29PM
वैशाली जाधव

झुंजूमुंजू होते... पक्ष्यांचा हलकासा  किलबिलाट मध्येच कानावर पडतो...खिडकीतून डोकावून पाहताना बाहेर पडणारी नजर खिळून राहते हिरव्यागार गालिचावर... मध्येच पावसाची सर  पांढर्‍या रेषा उमटवीत पुढे निघून  जाते... आजूबाजूच्या मंदिरांतील घंटांचे नाद सुखावतात श्रवण इंद्रियांना... अंधुक प्रकाश आता लख्ख दिसू  लागतो.घराघातली लगबग जाणवू लागते.अंगणातल्या बागेतील फुलं उमलून डोलू लागतात. हलकासा गारवा स्पर्शून जातो तन आणि मनालाही..!

हिरवा गालिचा आता अधिकच गडद दिसू लागतो... एवढ्यात सूर्याची सुंदर सोनेरी  कोवळी किरणे डोकावतात... मन गुंतून जातं त्या किरणांत... तो मोहन मोहवित राहतो मनाला...एवढ्यात पावसाची सर येते अचानक. सोनेरी किरणांत झाकोळलेली ती सर विलोभनीय वाटू लागते.दूरवरून न्याहाळताना नजर आपल्यात सामावून घेते सप्तरंगी इंद्रधनू... वाटतं, जावं. पकडावं त्याला.ते सात रंग यावेत आपल्या तळहातावर...

आकाश आता निळा रंग पांघरतंय...आल्हाददायक घन बरसतोय अलवार...हिरव्यागार पर्णांवर... पांढर्‍या, निळ्या,  केशरी,  लाल फुलांची रांगोळीच जणू.हा चित्रकार कुंचले फिरवतोय... हा मोहमयी मोहन श्रावण...

क्षितिजावर पसरणारा गर्द जांभळा रंग बदलतोय आपल्या रंगछटा. मंदिरात घंटानाद निनादतोय... गायला जातोय शिवमहिमा...उजळतेय कर्पूर आरती.श्रावणसांज वळतेय कुशीवर. मनगाभार्‍यात भक्‍तीची ही श्रावणज्योत तेवत  राहते अविरत....