होमपेज › Jalna › वॉटरग्रीडसाठी ९२ ग्रा.पं.नी ठराव सादर करावेत : लोणीकर

वॉटरग्रीडसाठी ९२ ग्रा.पं.नी ठराव सादर करावेत : लोणीकर

Published On: Mar 11 2018 1:29AM | Last Updated: Mar 11 2018 1:28AMजालना : प्रतिनिधी

मंठा, परतूर व जालना तालुक्यातील प्रस्तावित 92 गावांमध्ये उभारण्यात येणार्‍या वॉटरग्रीडसाठी संबंधित ग्रामपंचायतीने ग्रामसभेचे ठराव सादर करावेत, असे आवाहन पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केली आहे.

मंठा येथील सरस्वती मंगल कार्यालयात जालना, परतूर व मंठा तालुक्यांतील 92 गावांच्या वॉटरग्रीडद्वारे पाणीपुरवठ्यासाठीच्या ठरावाबाबत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत पालकमंत्री लोणीकर बोलत होते. व्यासपीठावर जि.प.चे माजी उपाध्यक्ष राहुल लोणीकर, भुजंगराव गोरे, पंजाबराव बोराडे, कैलास बोराडे, संभाजी खंदारे, पंचायत समितीच्या सभापती स्मिता म्हस्के, जिजाबाई जाधव, उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश इंगळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता अजय सिंग आदींची उपस्थिती होती.

पालकमंत्री लोणीकर म्हणाले, योजनेच्या माध्यमातून 92 गावांतील 1 लाख 3 हजार 255 लोकसंख्येला माफक दरामध्ये शुद्ध व स्वच्छ पाण्याचा पुरवठा होणार आहे. 

जालना, परतूर व मंठा या 176 गावांच्या वॉटरग्रीड योजनेबरोबरच मराठवाड्यातील शेतकर्‍यांच्या शेतीला, उद्योगाला व पिण्यासाठी एकत्रितरीत्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी मराठवाडा वॉटरग्रीड योजना साकारण्यात येत आहे. या योजनेचा डीपीआर करण्यासाठी इस्त्राइल देशाबरोबर करार करण्यात आला असून याचेही काम वेगाने सुरू आहे. ही योजना कार्यान्वित झाल्यास मराठवाड्यातील जनतेला मुबलक प्रमाणात स्वच्छ व शुद्ध पाण्याचा पुरवठा होणार असून सातत्याने टंचाईच्या झळा सोसणार्‍या जनतेला मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार असल्याचेही लोणीकर यांनी यावेळी सांगितले.

पतंगराव कदम यांना श्रद्धांजली

यावेळी माजी मंत्री स्व. पतंगराव कदम यांना पालकमंत्री लोणीकर यांच्यासह उपस्थितांनी श्रद्धांजली अर्पण केली.  महसूल विभागातील 27 सज्जे व 4 मंडळांतील मंडळ अधिकारी व तलाठ्यांना लॅपटॉपचे वितरण, मौजे उस्वद देवठाणा येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी अशोक राऊत यांच्या पत्नी सीमा अशोक राऊत यांना शासनाच्या वतीने 1 लक्ष रुपयाचा मदतीचा धनादेश व पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत लाभार्थींना गॅसशेगडीचे वाटपही पालकमंत्री लोणीकर यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.