Sun, Aug 18, 2019 06:09होमपेज › Jalna › युतीसाठी लाचार नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

युतीसाठी लाचार नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

Published On: Jan 28 2019 6:52PM | Last Updated: Jan 28 2019 7:00PM
जालना : प्रतिनिधी

होय, युती आम्हाला हवी आहे; पण हिंदुत्व एकत्र राहावे म्हणून, भ्रष्टाचाराविरुद्धच्या शक्‍ती एकत्र राहाव्या म्हणून. युतीसाठी आम्ही लाचार होणार नाही. जो हिंदूविरोधी असेल, तो सोबत येणार नाही, बाकी सारे सोबत असतील, अशा आक्रमक शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीवर भाष्य केले.

जालना येथे भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीचा समारोप मुख्यमंत्र्यांच्या भाषणाने झाला. राज्यात पाच ठिकाणी झालेल्या पालिका निवडणुकांचे निकाल सोमवारी घोषित झाले. त्यापैकी चार ठिकाणी भाजपला बहुमत मिळाले, याचा संदर्भ देत ते म्हणाले की, जनता कोणाच्या पाठीशी आहे, हे महाराष्ट्रात झालेल्या प्रत्येक निवडणुकीने दाखवून दिले आहे. चार पालिका भाजपने मिळविल्या आहेत, यावरून भाजपसाठी अनुकूल वातावरण आहे. 

मुख्यमंत्र्यांनी काँग्रेससह राष्ट्रवादीवरही निशाणा साधला. सरकारच्या विरोधात हे दोन्ही पक्ष काढत असलेल्या यात्रांची नावे जनतेला माहीतही नाहीत, असे ते म्हणाले. जनतेच्या विकासासाठी भाजप वचनबद्ध आहे. आपला पक्ष कोणत्याही एका परिवाराचे समर्थन करीत नाही. कार्यकर्त्यांच्या जोरावरच पक्षाची वाटचाल सुरू आहे. माझ्यानंतर कोण? ही चिंता आपला पक्ष करीत नाही. आपण नेहमीच लोककल्याणाची काळजी करीत आलो आहोत, असे ते म्हणाले.

काँग्रेसचा बुरखा फाडल्याशिवाय राहणार नाही

गरिबी हटावच्या पोकळ घोषणा ते प्रत्यक्ष गरिबांच्या खात्यात पैसे जमा होण्यापर्यंतचा प्रवास आपण अनुभवतो आहोत, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या 60 वर्षांत काँग्रेसने केलेले खड्डे बुजवण्यास आता सुरुवात झाली आहे. खोटे बोल पण रेटून बोल, हेच काँग्रेसचे तंत्र आहे. खोटे बोलताना लाज वाटेल, तर ती काँग्रेस कसली? पण त्यांचा बुरखा फाडल्याशिवाय राहणार नाही. भाषणाच्या प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांचे स्मरण केले. जेथून जेथून परिवर्तन वा संघर्षयात्रा निघते, तेथे तेथे भाजप विजयी होते, असे ते म्हणाले.

भवितव्याची निवडणूक

मुख्यमंत्री म्हणाले, आगामी निवडणूक भारताच्या भविष्याची, भवितव्याची आहे. पूर्वी चीन भारताचा भूभाग बळकावत असे. आता चीनची भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमतही नाही. लोकसभा निवडणुकीच्या विजयानंतर आता पुन्हा कार्यकारिणीची बैठक होईल. भाजपच्या विरोधात सारे पक्ष एकत्र येत असले, तरी या आघाडीचा नेताही अजून ठरलेला नाही.