Sat, Jul 11, 2020 13:30होमपेज › Jalna › बसस्थानकाची अवस्था झाली उकिरड्यासारखी !

बसस्थानकाची अवस्था झाली उकिरड्यासारखी !

Published On: May 03 2018 1:28AM | Last Updated: May 03 2018 12:09AMजालना : प्रतिनिधी

येथील बसस्थानकाच्या नूतनीकरणाचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. मात्र जागोजागी तुटलेल्या बांधकामाचे ढिगार परिसरात साचल्याने बसस्थानकाची अवस्था उकिरड्यासारखी झाली आहे. बांधकामाच्या नूतनीकरणाची सूत्रे मुंबईहून हलत असल्याने काम रखडले आहे. ढिगार्‍यामुळे धूळ उडत असल्याने दररोज ये-जा करणार्‍या प्रवाशांना श्‍वसनासारखे आजार जडत आहेत. 

जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या जालना बसस्थानकात नूतनीकरण करण्याच्या नावाखाली सर्वत्र तोडफोड करण्यात आली आहे. नूतनीकरणाचे काम आज, उद्या म्हणत तब्बल तीन वर्षे उलटूनही सुरू न झाल्याने दररोज प्रवास करणार्‍या प्रवाशांना धूळ आणि मातीचा सामना करावा लागत आहे. जमिनीच्या फरशा काढण्यात आल्याने जोरदार हवा आल्यास स्थानक परिसर धुळीने माखून निघतो. एकीकडे खासगी प्रवासी बसेस चकाचक असताना दुसरीकडे एस. टी. च्या भंगार बसेसमध्ये बसून प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे.

वाट पाहीन पण एस. टी. ने जायीन, असे म्हणण्याची ताकद आता प्रवाशात उरली नसल्याने बहुसंख्य प्रवाशांनी खासगी प्रवासी वाहतुकीला जवळ केले आहे. बसस्थानकाच्या रखडलेल्या कामाची ठाम माहिती देण्यास कोणीही पुढे येत नसल्याचे दिसूून येते. या कामाची सूत्रे मुंबईमधून हलवली जात आहे. बसस्थानक परिसरात जागोजागी तोडण्यात आलेल्या मटेरियलच्या साचलेल्या ढिगार्‍यातून उडणार्‍या मातीच्या कणामुळे अनेकांना श्‍वसनासारख्या आजाराचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत विभागीय अधिकार्‍यांनीही वेळोवेळी पाठपुरावा केला. मात्र त्यानंतरही काम सुरू होऊ शकले नाही.