Sat, Jul 04, 2020 04:16होमपेज › Jalna › पालखी महामार्गावरील पूल दोन तासांत कोसळला

पालखी महामार्गावरील पूल दोन तासांत कोसळला

Published On: Dec 28 2018 1:17AM | Last Updated: Dec 28 2018 1:03AM
तळणी (जि. जालना) : प्रतिनिधी

मंठा तालुक्यातील तळणी येथून जाणार्‍या शेगाव ते पंढरपूर पालखी महामार्गावरील पिंपरखेडा गावाजवळ असलेला छोटा उड्डाण पूल, बांधल्यानंतर अवघ्या दोन तासांत कोसळल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे मार्गावरील कामाच्या दर्जाबाबत प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे.

पिंपरखेडा व वायाळ सावरगाव या दोन गावच्या ग्रामस्थांना या पुलाखालून ये-जा करण्यासाठी रस्ता असावा, म्हणून या पुलाचे काम हाती घेण्यात आले होते. या पुलाचा स्लॅब बुधवारी दिवसभर टाकण्यात आला होता. रात्री बारापर्यंत हे काम चालू होते. स्लॅब जवळपास पाच फुटांपर्यंतच्या भरावाचा होता. लोखंडी पाईपवर मर्यादेपेक्षा जास्त वजन पडल्याने हा स्लॅब कोसळल्याचा अंदाज आहे. काम बंद ठेवण्याचे आदेश असतानाही ठेकेदार काम थांबवण्यास तयार नाही. या कामामध्ये वाळूचा कमी वापर करून दगडी कच, माती वापरण्यावरच ठेकेदाराचा कल असल्याचा आरोप आहे.
रात्रीच उचलले मटेरियल

स्लॅब पडल्यानंतर अस्ताव्यस्त पडलेले साहित्य व सिमेंटचा ढिगारा उचलण्याचे काम रात्रीच उरकण्यात आले. या घटनेत काही कामगार जखमी झाल्याचे समजते. परंतु, याबाबत कोणीही बोलायला तयार नाही. यासंदर्भात एमएसआरडीचे कार्यकारी अभियंता विक्रम जाधव म्हणाले की, स्लॅबखालील लोखंडी पाईपनी तग धरला नसल्यानेच घटना घडली आहे, असे वाटते. याची चौकशी केली जाईल.