Mon, Jul 06, 2020 04:09होमपेज › Jalna › जिल्ह्यावर घोंगावतेय पाणीटंचाईचे सावट 

जिल्ह्यावर घोंगावतेय पाणीटंचाईचे सावट 

Published On: Jan 31 2018 2:04AM | Last Updated: Jan 31 2018 12:34AMजालना : प्रतिनिधी

जिल्ह्यातील आठही तालुक्यांवर यावर्षी पाणीटंचाईचे गंभीर सावट निर्माण झाले आहे. टंचाईची दाहकता लक्षात घेऊन संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्ह्यासाठी जानेवारी ते मार्च 2018 या तीन महिन्यांसाठी 22 कोटी 48 लाख रुपयांचा संभाव्य आराखडा विभागीय आयुक्‍तांकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. 

जिल्ह्यातील जालना, बदनापूर, जाफराबाद, भोकरदन, अंबड, घनसावंगी, मंठा व परतूर तालुक्यावर पाणीटंचाईचे सावट घोंगावत आहे. अनेक गावांत पाणी उपलब्ध असतानाच त्या गावातील नळयोजना दुरुस्ती व पाइपलाइन दुरुस्ती नसल्याने टंचाईने भर घातली आहे. 938 गावे व 290 वाड्यांकरिता संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाच्या वतीने 22 कोटी 49 लाखांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. 

जालना तालुक्यातील 248 गावे व 142 वाड्यांकरिता 3 कोटी 59 लाख 18 हजार, बदनापूर तालुक्यातील 71 गावे 31 वाड्यांकरिता 91 लाख 40 हजार, भोकरदन तालुक्यातील 38 गावे व 18 वाड्यांकरिता 11 कोटी 52 लाख, जाफराबाद तालुक्यातील 81 गावांसाठी 48 लाख 40 हजार, परतूर तालुक्यातील 42 गावांकरिता 5 कोटी 95 लाख, मंठा तालुक्यातील 19 गावे व 99 वाड्यांकरिता 4 कोटी 97 लाख, अंबड तालुक्यातील 305 गावांसाठी 3 कोटी 84 लाख, घनसांवगी तालुक्यातील 134 गावांसाठी 1 कोटी 56 लाख असा 22 कोटी 48 लाखांचा आराखडा तयार करण्यात आला असून तो मंजुरीसाठी विभागीय आयुक्‍तांकडे पाठविण्यात आला आहे. ज्या तालुक्यात खासगी सेवाभावी संस्थांच्या वतीने नदी व नाला खोलीकरण व सरळीकरणाची कामे करण्यात आले आहेत. त्या परिसरात पाणीसाठा चांगला असल्याने टंचाईची दाहकता कमी आहे. या भागातील विहिरी व बोअरवेलला चांगले पाणी असल्याने पिकांसाठी पाणी कमी पडलेे नाही. मात्र ज्या तालुक्यात जलयुक्‍तची कामे झाली नाहीत त्या तालुक्यात टंचाईची दाहकता जास्त असल्याचे निदर्शनास येत आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा काटकसरीने वापर करण्यासाठी चळवळ उभी होणे, गरजेचे आहे.