होमपेज › Jalna › खरिपाच्या तोंडावर पीककर्जाची प्रतीक्षा

खरिपाच्या तोंडावर पीककर्जाची प्रतीक्षा

Published On: May 26 2018 1:50AM | Last Updated: May 26 2018 12:04AMजालना : प्रतिनिधी

जिल्ह्यात खरीप हंगामाच्या तोंडावर पीककर्ज मिळण्यासाठी शेतकरी बँकेत चकरा मारत आहेत. कर्जमाफीचा घोळ अद्यापही न सुटल्याने बँकेचे शाखाधिकारी कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहेत. या सर्व प्रकारात या वर्षी पेरणीसाठी पैसे आणावयाचे कोठून?हा प्रश्‍न शेतकर्‍यांना पडला आहे. 

जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 अंतर्गत 2 लाख 14 हजार 750 कुटुंबीयांनी ऑनलाइन पद्धतीने कर्जमाफीसाठी  नोंदणी केली होती. त्यात 10 एप्रिल 2018 पर्यंत जिल्ह्यातील 20 बँकांच्या एकूण 162 शाखांमार्फत 1 लाख 23 हजार 851 शेतकर्‍यांच्या बँक खात्यात 593 कोटी 69 लाख 61 हजार रुपये जमा करण्यात आले. त्यात दीड लाखाच्या आतील थकबाकीदार 94 हजार 610 शेतकर्‍यांची रक्‍कम दीड लाखाच्या आत होती. नियमित परतफेड करणार्‍या 28 हजार 825 कर्जदार शेतकर्‍यांना प्रोत्साहन म्हणून 40 कोटी 74 लाखांची रक्‍कम शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. एकरकमी परतफेड योजनेचे 17 हजार 958 लाभार्थी असून, त्यांनी 1 लाख 50 हजारच्या वरील कर्ज रकमेचा भरणा 30 जून 2018 पर्यंत केल्यानंतर त्यांच्या कर्ज खात्यावर 1 लाख 50 हजारांची शासनाची रक्‍कम जमा होणार आहे. पिककर्ज माफीच्या क्‍लिष्ट प्रक्रियेमुळे कर्जमाफीत पारदर्शकता आली असली तरी या सर्व प्रक्रियेस कमालीचा उशीर होत असल्याने त्याचा परिणाम आगामी खरीप हंगामापूर्वी मिळावयाच्या पिककर्जावर झाला आहे. 

गतवर्षी लहरी निसर्गामुळे अनेक भागांत खरिपात पाऊस न पडल्याने शेतकर्‍यांना खरिपात कोणतेही उत्पन्‍न मिळाले नाही. उलट खरिपात अपुर्‍या पावसावर पेरणी केलेल्या शेतकर्‍यांवर दुबारा पेरणी करावी लागल्याने खिशातील पैसे गेले. बोंडअळी, शेतीमालाला भाव नसल्याने हतबल झालेल्या शेतकर्‍यांना बँकांनीही पिककर्जासाठी दरवाजे बंद केल्याने शेतकर्‍यांसमोर पेरणीसाठी पैसे आणावयाचे कोठून हा प्रश्‍न निर्माण झाला आहे.