Mon, Jul 06, 2020 18:31होमपेज › Jalna › स्वतंत्र बचतभवनासाठी प्रयत्न करणार

स्वतंत्र बचतभवनासाठी प्रयत्न करणार

Published On: Jul 17 2018 1:34AM | Last Updated: Jul 17 2018 12:30AMजालना : प्रतिनिधी

बचतगटाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करण्यावर शासनाने भर दिला आहे. जिल्ह्यात बचतगटासाठी स्वतंत्र असे बचतभवन उभारणीसाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची ग्वाही पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली. मंठा तालुक्यातील तळणी येथे  महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने आयोजित तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत स्थापित मातोश्री रमाई लोकसंचलित साधन केंद्र यांच्या आठव्या सर्वसाधारण सभेस मार्गदर्शन करताना लोणीकर बोलत होते. यावेळी संदीप गोरे, स्मीता म्हस्के, संभाजी खंदारे, विष्णू फुफाटे, दत्तराव कांगणे, किशोर हानवते, नाथराव काकडे, निवास देशमुख, माउली वायाळ, दारासिंग चव्हाण, नितीन सरकटे, अनिल राठोड, नायब तहसीलदार श्रीमती कोटुरकर, गटविकास अधिकारी श्रीमती झरे, जिल्हा समन्वयक अधिकारी उमेश कहाते आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

पालकमंत्री लोणीकर म्हणाले की, महिलांचे बचतगटाच्या माध्यमातून सक्षमीकरण करण्यासाठी छोट्या छोट्या व्यवसायांसाठी विविध बँकांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.  जिल्ह्यात बचतगटांना व्यवसायासाठी 17 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले असून मंठा तालुक्यातील 180 बचतगटांना प्रत्येकी एक लाखाप्रमाणे 1 कोटी 80 लक्ष रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे.  बचतगटाच्या माध्यमातून जिल्ह्यातील जवळपास 38 हजार 313 कुटुंबांना उपजिविका मिळाली असल्याचे सांगत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत चालविल्या जाणार्‍या बचतगटांना शासनामार्फत अनुदान देण्यात येते. त्याचप्रमाणे महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत चालविल्या जाणाना गटांनाही अनुदान देण्यातबाबत शासनाकडे पाठपुरावा करीत आहे. निश्‍चितपणे जिल्ह्यातील बचतगटांना कशा पद्धतीने लाभ होईल, यासाठी आपण स्वतः प्रयत्न करत असल्याचे पालकमंत्री लोणीकर कार्यक्रमात सांगितले. 

शासनाच्या योजनाचा लाभ घ्या

शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आहेत. या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी शासनामार्फत प्रयत्न करण्यात येत आहे. बचतगटांनीही या योजना समजून घेत त्याचा लाभ घेऊन आपल्या जीवनात उन्नती साधण्याचे आवाहन केले. समाधान शिबिराच्या माध्यमातून 30 हजार बचतगटांना शासनाच्या योजनांचा लाभ देण्यात आला असल्याचे पालकमंत्री लोणीकर यांनी सांगितले.