Fri, Jun 22, 2018 03:15



होमपेज › Jalna › हरभरा खरेदीची मुदत आज संपुष्टात

हरभरा खरेदीची मुदत आज संपुष्टात

Published On: Jun 13 2018 1:33AM | Last Updated: Jun 12 2018 11:20PM



जालना : प्रतिनिधी

शासनाच्या हरभरा खरेदी प्रक्रियेची वाढवून दिलेली मुदत बधुवारी (दि.13) रोजी संपुष्टात येणार आहे. जिल्ह्यात नोंदणी केलेल्या 4 हजार 952 शेतकर्‍यांपैकी बुधवारी सायंकाळ 5 वाजेपर्यंत 2 हजार 500 शेतकर्‍यांच्या हरभरा खरेदी पूर्ण होण्याची शक्यता आहे. यामुळे 2 हजार 452 शेतकर्‍यांचा हरभरा खरेदीविना पडून राहण्याची शक्यता आहे. 

जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने जालना, भोकरदन, अंबड आणि परतूर हरभरा खरेदी केंद्रावर 9 एप्रिलपासून खरेदी सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीपासून हरभरा खरेदीकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. तूर खरेदीमुळे वखार महामंडळाचे गोडावून फुल्ल झाले आहे. परिणामी हरभरा साठविण्यासाठी जागा शिल्लक नाही. तसेच बारदानाही संपला आहे. यामुळे नाफेडच्या वतीने 12 मेपासून हरभरा खरेदी आठ दिवस बंद करण्यात आली  होती. परतूर व अंबड येथे तूर खरेदी संपल्याने तेथे हरभरा खरेदी सुरू होती. व्यापारी 3 हजार ते 3 हजार 300 रुपये प्रतिक्विंटलने हरभरा खरेदी करीत असतानाच नाफेडमधे 4 हजार 400 रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत असल्याने शेतकरी नाफेडकडे गर्दी करीत होते. मात्र विविध कारणांमुळे नाफेडचे केंद्र बंद-चालूच्या फेर्‍यात अडकल्याने शेतकर्‍यांना मनस्ताप सोसावा लागला. हरभरा खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणीसह अटी घालण्यात आल्यानंतरही भाव चांगला मिळाल्याने गर्दी केली. मात्र शेतकर्‍यांच्या घरात हरभरा पडलेला आहे. 

चारही खरेदी केंद्रात 4  हजार  952 शेतकर्‍यांनी ऑनलाइन नोंदणी केलेली आहे. नोंदणी केलेल्या शेतकर्‍यांपैकी  मंगळवारपर्यंत 2 हजार 100 शेतकर्‍यांकडून 24 हजार 458 क्विंटलची खरेदी करण्यात आली. अजूनही नोंदणी केलेले 2452 शेतकरी प्रतीक्षेत आहेत. नाफेडच्या हलगर्जीपणामुळे खरेदी केंद्र कित्येक दिवस बंद होते. यामुळे शेतकर्‍यांतून असंतोष व्यक्‍त होत आहे.