Sat, Jul 04, 2020 20:43होमपेज › Jalna › सरसकट सर्वांना अनुदान वाटप होणार : आ. बबनराव लोणीकर 

सरसकट सर्वांना अनुदान वाटप होणार : आ. बबनराव लोणीकर 

Last Updated: Nov 11 2019 1:32AM

अतवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करताना आमदार बबनराव लोणीकर बदनापूर : प्रतिनिधी

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीची ताबडतोब पाहणी करून पंचनामे करून अहवाल शासनाला सादर करण्यात येणार आहे. त्यानुसार सर्व शेतकऱ्यांना अनुदान मिळणार असल्याचे आश्वासन आमदार बबनराव लोणीकर यांनी दिले. ते आज तालुक्यातील भराडखेडा येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले असता बोलत होते. त्यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, आ. नारायण कुचे उपस्थित होते. 

बदनापूर तालुक्यासह संपूर्ण जालना जिल्हयात परतीच्या पावसाचा जोरदार मारा बसलेला असून खरीपाचे काढणीस आलेले मका, बाजरी, सोयाबिन या पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. मराठवाडयाचे नगदी पिक असलेले कापूस या पिकाचेही नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांपुढे ऐन दिवाळी सणात अंधार निर्माण झाला आहे.

त्या अनुषंगाने तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाकडून व पिक विमा कंपन्यांकडून मदतीची अपेक्षा होती. दरम्यान ३० ऑक्टोबर रोजीच मुख्यमंत्रयांनी अतिवृष्टी भागाचे पंचनामे करून ताबडतोब नुकसान भरपाई देण्याचे आदेश प्रशासनास दिले होते. त्या अनुषंगाने आमदार बबनराव लोणीकर यांनी तालुक्यातील भराडखेडा, कडेगाव व सेलगाव येथील शेतीला भेटी दिल्या.

भराडखेडा येथील शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या शेतीत जिल्हाधिकारी व आ. लोणीकर यांना नेऊन शेतीची नुकसानी दाखविली. यावेळी मक्याच्या कणसाला कोंब येऊन कणसात मका उगवलेला दिसत होता. तर कापूसही पाण्यात भिजून काळाठिक्कर पडलेला दिसून आला. यावेळी आ. लोणीकर यांच्यासोबत जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, आ. नारायण कुचे, तहसीलदार छाया पवार, तालुका कृषी अधिकारी व्यंकट ठक्के आदींची उपस्थिती होती. शेतकऱ्यांनी थेट आ.लोणीकरानी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची कहाणी विषद केली.

यावेळी लोणीकर यांनी मी ही शेतकरी आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना मी जाणतो. सरकारनेही कोणत्याही प्रकारच्या पाहणीचा फार्स न करता सरसकट अनुदान देण्याचे धोरण ठेवलेले आहे. त्याप्रमाणे आज ही पाहणी होत असून सर्वच शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ होणार असल्याचे आश्वासन त्यांना शेतकऱ्यांना दिले. तर जिल्हाधिकारी विभागीय आयुक्तांना जालना जिल्हयाचा अहवाल सादर करणार असून शनिवार विभागीय आयुक्त कार्यालयात मराठवाडयात सर्वप्रथम जालना जिल्हयाचा अहवाल सादर होणार आहे. त्यानंतर तात्काळ शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याचबरोबर सरसकट सर्वांना अनुदान वाटप होणार असल्यामुळे ज्यांनी पिक विमा भरलेला नाही त्यांनाही दुष्काळी अनुदान देण्यात येईल असे आश्वासनही त्यांनी दिले.