Mon, Jul 06, 2020 03:43होमपेज › Jalna › केवळ दोन पोलिसांवर 23 गावांची जबाबदारी

केवळ दोन पोलिसांवर 23 गावांची जबाबदारी

Published On: Jul 01 2018 1:52AM | Last Updated: Jul 01 2018 12:30AMरांजणी : प्रतिनिधी

घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथील पोलिस चौकीत केवळ दोन कर्मचार्‍यांवर 23 गावांची सुरक्षेची भिस्त आहे. दोन कर्मचारी इतक्या गावांचा भार कसा पेलू शकतील, हा प्रश्‍न तर आहेत; परंतु मोठी घटना घडल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न उद्भवू शकतो. 

प्रत्यक्षात एक पोलिस उपनिरीक्षक, दोन जमादार, दोन हवालदार असे सात कर्मचारी असावेत. रांजणी हे बाजारपेठेचे गाव आहे. तीन तालुक्यांच्या सीमेलगत तसेच लोहमार्गावरील हे गाव आहे. शुक्रवारी येथे मोठा आठवडी बाजार भरतो. शाळा, महाविद्यालय व ग्राहकांंची नेहमी वर्दळ असते. गावचा व परिसरातील खेडेगावांचा वावर, विविध गुन्ह्यांच्या घटना पाहता चौकीत पोलिस कर्मचारी असणे गरजेचे आहे. 

दोन जुन्या खोल्यांत हा कारभार सुरू आहे. गावात काही दिवसांपासून चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. येथील मंदिरातील मूर्ती चोरीस गेल्या आहेत. भुरट्या चोर्‍यांचे सत्र सुरूच असते. रांजणी व काही गावांत मटका, जुगार,पत्यांचे क्‍लब सुरू आहेत. या प्रकाराकडे पोलिसांचे दुर्लक्ष का होते असा प्रश्‍न ग्रामस्थांतून पडला असेल, मात्र येथे कर्मचार्‍यांचा अभाव असल्याने हे प्रकार घडत आहेत.

रांजणी चौकीअंतर्गत पाच ते सहा संवेदनशील गावांचा समावेश आहे. त्यात पारडगावसह रांजणी, चित्रवडगाव, देवडे, हातगाव, पांगरातांडा आदींचा समावेश आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न, तपास कामे, समन्स व बंदोबस्त आदी विविध कामे पाहता चौकीत कर्मचारी वाढविण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.