Tue, Jun 18, 2019 13:21होमपेज › Jalna › १६ मेपासून अधिक मास सुरू

१६ मेपासून अधिक मास सुरू

Published On: May 12 2018 1:27AM | Last Updated: May 12 2018 1:27AMजालना : प्रतिनिधी

यावर्षी 16 मेपासून अधिक मास सुरू होत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या  विवाह सोहळ्याच्या मुहूर्तास ब्रेक लागणार आहे. शनिवार, दि. 12 ही विवाह सोहळ्यासाठी मुहूर्ताची शेवटची तारीख असल्याने सर्वत्र लग्नाची धूम दिसून येत आहे. 

दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या विवाह सोहळ्यासाठी मे महिन्यात मोजकेच मुहूर्त असल्याने, सर्वत्र लग्नाची धामधूम दिसून येत आहे. या महिन्यातील 12 मे हा शेवटचा मुहूर्त असल्याने मंगल कार्यालये, बस, रेल्वे यांसह खासगी वाहने फुल्ल झाली आहेत. एकाच गावात अधिक विवाह समारंभ असल्यामुळे पुरोहित, आचारी, मंडपवाले आदींची दमछाक होत आहे.

परंपरेनुसार कोणत्याही अधिक मासामध्ये विवाहाचे मुहूर्त नसतात. यामुळे विवाहांना अधिक मासामुळे ब्रेक लागला आहे. विशेष म्हणजे 12 मे रोजीच सर्व मुहूर्त संपणार आहेत. 

दरम्यान, तीन वर्षांतून एकदा येणारा अधिक मासला यंदा 16 मे रोजी प्रारंभ होत असून, या महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जावईबापूंसाठी अधिक मासमध्ये आमरसाच्या मेजवानीसह आहेर करण्याची परंपरा आहे.

मे महिन्यात मोजकेच मुहूर्त असल्याने, एकाच कुटुंबातील व्यक्तींना वेगवेगळ्या विवाह सोहळ्यास जाण्यासाठी नियोजन करावे लागत आहे. विवाहाचे ठिकाण लांब असल्याने, वर्‍हाड मंडळीची चांगलीच दमछाक होताना दिसत आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता राजकीय पुढार्‍याची विवाह सोहळ्यासाठी हजेरी लावण्यासाठी चांगलीच धावपळ सुरू आहे.